Pimpri : राष्ट्रवादीच्या माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गुन्हा

निवडणुकीत पैसे वाटल्याचा संशय

एमपीसी न्यूज – निवडणुकीत मतदारांना पैशांचे प्रलोभन दाखवत असल्याच्या संशयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी (दि.२९) दुपारी साडे चारच्या सुमारास पिंपरी लिंक रोड परिसरात आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केली.

या प्रकरणी माजी आमदार अण्णा दादू बनसोडे (५०, रा. चिंचवड) आणि रवींद्र हृदयनाथ दुबे (४६, रा. कामगारनगर, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक शरद निवृत्ती आहेर यांनी तक्रार दिली आहे.

बनसोडे आणि दुबे हे दोघेजण लिंक रोड परिसरात पैसे वाटप करून मतदारांना प्रलोभन दाखवत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावेळी पोलिसांना घटनास्थळी एका स्विफ्ट मोटारीत दोघे बसल्याचे दिसले. पोलिसांनी मोटारीची झडती घेतली असता मोटारीच्या डिकीमध्ये ४८ हजार ५०० रुपयांची रोकड मिळून आली. या पैशाबाबत विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.