Alandi News : कार्तिकी यात्रेनिमित्त आळंदीसह परिसरात संचारबंदी

पासधारक आणि अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना मुभा

एमपीसी न्यूज – संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा (कार्तिकी यात्रा) यावर्षी मर्यादित लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आळंदी आणि परिसरातील 12 गावांमध्ये आज (रविवारी, दि. 6 डिसेंबर) ते 14 डिसेंबर या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान समिती आणि प्रशासनाकडून देण्यात आलेल्या पासधारक आणि अत्यावश्यक सेवेतील लोकांना संचारास परवानगी देण्यात आली आहे.

यावर्षी 8 ते 14 डिसेंबर या कालावधीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा 724 वा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह आजूबाजूच्या राज्यातून सुमारे 500 दिंड्या आणि सुमारे पाच ते सहा लाख भाविक भक्त आळंदी शहरात येतात. लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात येतो. मात्र, यावर्षी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे.

या गावात संचारबंदी लागू

आळंदी, केळगाव, च-होली खुर्द, चिंबळी, वडगाव, घेनंद, कोयाळी तर्फे चाकण, धानोरे, सोळू, मरकळ, च-होली बुद्रुक, डुडुळगाव या गावांमध्ये संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

काय चालू, काय बंद

वरील गावांमध्ये धर्मशाळा, मठ, भक्त निवास, यात्री भवन, हॉटेल, लॉजेसमध्ये नागरिकांना वास्तव्यास प्रतिबंध आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान समिती आणि प्रशासनाकडून देण्यात आलेल्या पासधारक व्यक्तींना धर्मशाळा, मठ, भक्त निवास, यात्री भवन, हॉटेल, लॉजेसमध्ये राहता येईल.

एसटी महामंडळाची वाहने, महापालिकेची वाहने, खाजगी वाहने यातून येणा-या वारकरी आणि भक्तांना वाहतुकीस प्रतिबंध आहे. दरम्यानच्या कालावधीत सरकारी व खाजगी वाहतूक बंद करण्यात अली आहे.

इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास,स्नान करण्यास तसेच हातपाय धुण्यास देखील प्रतिबंध करण्यात आला आहे. आळंदी व आळंदी परिसरातील इंद्रायणी नदी पात्र, घाटावर नागरिकांना प्रवेश देखील बंद करण्यात आला आहे.

खालील बाबतीत संचारबंदी लागू होणार नाही

# अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरवणारी खाजगी, सरकारी रुग्णालये, दवाखाने, आरोग्य सेवा देणारे डॉक्टर, रुग्णवाहिका, वैद्यकीय सेवेशी संबंधित कर्मचारी व त्यांची वाहने

# अधिकृत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची वाहने

# कायदेशीर कर्तव्य बजावणारे शासकीय अधिकारी व कर्मचारी (उदा. महसूल, पोलीस, पाणीपुरवठा, अग्निशामक, विद्युत पुरवठा इत्यादी)

# जीवनावश्यक सेवेतील आस्थापना (उदा. दूध, फळे, भाजीपाला, किराणा दुकाने, पिण्याचे पाणी घरोघरी जारद्वारे पुरवठा करणारी यंत्रणा, घरगुती स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे सिलेंडर पुरवणारी यंत्रणा इत्यादी)

# प्रशासनाने आळंदी यात्रेनिमित्त परवानगी दिलेले पासधारक आणि त्यांची वाहने

# पोलीस बंदोबस्तासाठी आवश्यक असणा-या सुविधा पुरवणा-या यंत्रणांची वाहने (उदा. भोजनालय, पाणी पुरवठा इत्यादी)

# आळंदी शहरातील स्थानिक नागरिक यांची अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने. या वाहन चालकांच्या ओळखपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.