Dapodi news: जुन्या हॅरिस पुलाची डागडुजी, दुरुस्तीचे काम पूर्ण; आजपासून पूल वाहतुकीसाठी खुला

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला जोडणाऱ्या मुंबई – पुणे महामार्गावरील दापोडी येथे मुळा नदीवरील अस्तित्वात असलेल्या जुन्या हॅरिस पुलाची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज (गुरुवारी) पुलाचे लोकार्पण झाले असून पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पुण्याकडून मुंबईच्या बाजूस जाणाऱ्या वाहनांसाठी दोन लेन उपलब्ध होणार असल्याने वाहतूक सुरळीत होऊन दापोडीतील कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, अपक्ष आघाडीचे गटनेता कैलास बारणे, नगरसेविका माई काटे, नगरसेविका आशा शेंडगे, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबसे, प्रभाग अधिकारी संदीप खोत, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

मुंबई – पुणे महामार्गावरील दापोडी येथे मुळा नदीवरील हॅरिस पुलाची लांबी 214.68 मीटर तर रुंदी 7.50 मीटर आहे. पुणे बाजूकडील पोहोच रस्त्याची लांबी 11.60 मीटर, मुंबई बाजूकडील लांबी 15.70 मीटर आहे. मोटार वाहतुकीसाठी मार्गिका 7 मीटर आहे.

पुलाचे संरक्षक कटडे तुटले होते. पुलाची अवस्था बिकट झाली होती. दिशादर्शक फलक गायब झाले होते. महापालिकेने 6 मार्च 2019 रोजी पुलाच्या डागडुजीचे काम हाती घेतले होते. पुलाची दुरुस्ती, पुनर्वसनाचे काम पूर्ण झाल्याने पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

पुलाचे होणारे फायदे!
या जुन्या पुलाची दुरुस्ती व पुनर्वसन करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दुरुस्तीमुळे जुन्या पुलाचे आयुष्य वाढणार आहे. पुण्याकडून मुंबईच्या बाजूस जाणाऱ्या वाहनांसाठी दोन लेन उपलब्ध होणार असल्याने वाहतूक सुरळीत होऊन कोंडी सुटणार आहे. तसेच, इंधन बचत होणार असून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.