Dehugaon News: वारीचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केल्याशिवाय गप्प बसणार नाही : संभाजीराजे

एमपीसी न्यूज – ‘युनेस्को’मध्ये जागतिक वारसा हक्कमध्ये दोन प्रकार असतात. टॅनजीबल (मूर्त) वारसा आणि इनटॅनजीबल (अमूर्त) असे प्रकार आहेत. वारीची परंपरा 350 वर्षांहून अधिक आहे. वारीनिमित्त 20 लाख लोक एकत्र येतात. ती कशी येतात, याचा अभ्यास व्हावा. वारीच्या परंपरेचा अमूर्त जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश व्हावा, यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असून ते केल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे आषाढी वारीसाठी आज (गुरुवारी) देहूमधून प्रस्थान झाले. महाराजांच्या पादुकांची खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सपत्नीक महापूजा केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, मावळचे आमदार सुनील शेळके, पिंपरीच्या महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव उपस्थित होते.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले, युनेस्कोमध्ये जागतिक वारसा हक्कमध्ये दोन प्रकार असतात. टॅनजीबल (मूर्त) वारसा आणि इनटॅनजीबल (अमूर्त) असे प्रकार आहेत. महाराष्ट्रात तीन जागतिक वारसा हक्काची नोंद आहेत. त्यात एलिफंटा लेणी, अजिंठा वेरूळ लेणी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे टॅनजीबल वारसा हक्क आहेत. स्पर्श करता येत नाहीत अशांना इनटॅनजीबल म्हणतात. वारीची परंपरा 350 वर्षांहून अधिक आहे.

वारीनिमित्त 20 लाख लोक एकत्र येतात. ती कशी येतात, याचा अभ्यास व्हावा. वारीचा अमूर्त जागतिक वारसा हक्कात समावेश व्हावा. यासाठी दोन वर्षांपूर्वी मी हा मुद्दा देशाच्या संसदेत मांडला होता. रायगड किल्ल्यासह तीन ते चार किल्ल्याच्या जागतिक वारसा मूर्त स्थळांमध्ये नोंद व्हावी. यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्याचप्रमाणे तुकोबाराय आणि माऊली यांच्या वारीच्या परंपरेचा अमूर्त जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश व्हावा, यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. ते केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.

श्री संत तुकाराम महाराजांनी भक्ती दिली. या भक्तीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले. शिवाजी महाराजांनी तुकोबारायांना गुरुस्थानी मानले. तुकाराम महाराजांनी सांगितले जात, धर्माच्या पलिकडे आपण आपला समाज उभारला पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी, राजर्षी शाहू महाराज यांनी त्या पद्धतीनेच आपली भूमिका नियमित ठेवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याला जो मान दिला. खऱ्या अर्थाने तुकाराम महाराजांना अभिवादन करण्याची संधी मिळाली असे म्हटले तर चुकीचे होणार नाही, असेही ते म्हणाले.

भक्तांनी जिथे
असाल तेथूनच संतश्रेष्ठ तुकोबाराय, ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे दर्शन घ्यावे – संभाजीराजे

छत्रपती घराण्याची व्यक्ती केव्हाच साकडे घालत नाही. महामारी निर्माण झाली आहे. या संकटातून आपल्याला बाहेर पडायचे आहे.   पुढच्यावर्षी आपल्याला कोविड बरोबर पुढे जायचे नाही. सर्व भक्तांना विनंती आहे. आपण जिथे असाल तेथूनच संतश्रेष्ठ तुकोबाराय, ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे दर्शन घ्यावे. कोविडचा प्रसार होऊ नये, कोविडची महामारी अंगावर पडू नये. यासाठी यंदा घरी बसूनच संताना अभिवादन करा, आशीर्वाद घ्यावे. पुढच्यावर्षी 20 लाख नव्हे. तर, यापेक्षा जास्त संख्येने येऊन उत्सव साजरा करू, असे संभाजीराजे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.