Dehuroad : देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या भाजप नगरसेवकावर गोळीबार

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या भाजपच्या नगरसेवकावर गोळीबार झाला. ही घटना गुरुवारी (दि. 13) सायंकाळी साडेसातच्या सुमारास देहूरोड येथे घडली. विशाल उर्फ जिंकी सुभाषचंद्र खंडेलवाल असे जखमी नगरसेवकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासनगर देहूरोड येथे खंडेलवाल यांचे कार्यालय आहे. गुरुवारी सायंकाळी ते कार्यालयात आले. कार्यालयातील कामकाज आटोपून सायंकाळी साडेसातच्या सुमारास कार्यालयाच्या बाहेर त्यांचा चालक महंमद शेख व रमजान यांच्याशी उद्याच्या कार्यक्रमाची चर्चा करत होते. त्यावेळी दुचाकीवरून दोन हल्लेखोर आले. त्यातील एकाने दुचाकीवरून खाली उतरून खंडेलवाल यांना शिवीगाळ करून त्यांच्या दिशेने गोळीबार केला. खंडेलवाल मागे सरकल्यामुळे त्यांना गोळी लागली नाही. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे खंडेलवाल ओरडत पळत असताना पाय-यांवर पडले. यामध्ये त्यांच्या दोन्ही पायाला मार लागला.

दरम्यान, घटना घडल्यानंतर खंडेलवाल यांच्या ओळखीचे राजेश खंडेलवाल आरोपींच्या दिशेने पळाले असता आरोपींनी राजेश यांना पिस्तुलाचा धाक दाखवून दोन्ही आरोपी मोटारसायकल वरून पळून गेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.