Dehuroad News: देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या कचऱ्याला आग; उग्र वासाच्या धुरामुळे रूपीनगर, यमुनानगरवासीय त्रस्त

कचऱ्याला आग लावली जात असल्याचा नागरिकांचा आरोप

एमपीसी न्यूज – देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत निर्माण होणारा कचरा निगडीतील भक्ती-शक्ती चौकापासून जवळ असलेल्या लष्कराच्या माळरानावर टाकला जात असून या कचऱ्याला शनिवारी (दि.6) रात्री आग लागली होती. धुराचे लोट येत असून त्याचा उग्र वास येत आहे.

हवेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, निगडी गावठाण, रुपीनगर, यमुनानगर, त्रिवेणीनगर, सिद्धीविनायक नगरी या परिसरातील धुर पसरला होता. यामुळे नागरिकांना श्वासनाचा त्रास होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

देहूरोड बोर्डाच्या हद्दीत दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. हा कचरा बोर्डाच्या जकात नाक्यासमोरील माळरानावर आणून टाकला जातो. त्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. विल्हेवाटीसाठी कचऱ्याला आग लावली जाते, असा महापालिका हद्दीतील नागरिकांचा आरोप आहे. आग लावल्याने जळणाऱ्या कचऱ्यापासून मोठ्या प्रमाणात धूर निघतो. हा धूर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रुपीनगर, यमुनानगर आणि प्राधिकरण भागापर्यंत पोचत आहे.

या कचरा डेपोला शुक्रवारी सायंकाळी आग लागली. रात्री नऊनंतर आगीने उग्र रूप धारण केले. त्यामुळे धुराचे लोटच्या लोट बाहेर येत होते. रात्रभर आग धुमसत होती.

हा धूर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रुपीनगर, यमुनानगर, त्रिवेणीनगर, गणेशनगर आणि प्राधिकरण भागापर्यंत पोचत आहे. या परिसरात प्रचंड मोठा जनसमुदाय वास्तव्यास आहे. कचऱ्याच्या अशुद्ध हवेमुळे परिसरातील स्वच्छ हवा प्रदूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. याचा सर्वात जास्त त्रास लहान मुलं, वृद्धांना होत असून, श्वसनाची गंभीर समस्या उद्भवत आहे.

रुपीनगर येथील रहिवासी अमोल भालेकर म्हणाले, ”देहूरोड बोर्डाच्या हद्दीतील जकात नाक्यासमोरील माळरानावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. या कचऱ्याला आठ दिवसातून एकदा आग लागते. शुक्रवारी रात्री सात वाजता आग लागली. रात्रभर आग धुमसत होती. कचऱ्याचा विषारी धूर रुपीनगर, गणेशनगर, त्रिवेणीनगर, तळवडे या भागात येत होता. उग्र वासामुळे नागरिक हैराण झाले आहेत. बोर्डाने योग्य पद्धतीने प्रक्रिया करूनच कचऱ्याची विल्हेवाट लावावी. जेणेकरून महापालिका हद्दीतील नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही”.

प्रसाद सुतार म्हणाले, ”कचऱ्याला शुक्रवारी रात्री आग लागली. रात्री नऊनंतर धुराचे लोट येत होते. घराच्या बाहेर पडू शकत नव्हतो. एवढा धूर येत होता. श्वास घ्यायला नागरिकांना त्रास होतो. आग लागली नसून लावली आहे”.

देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल म्हणाले, ”कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यात येईल. त्यासाठी एखादी योजना आणावी लागेल. ऊन वाढत आहे. त्यामुळे कचरा डेपोला आग लागत असेल”.

याबाबत देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.