Dehuroad News : डोक्यात बरणी अडकल्याने सैरभैर झालेल्या श्वानाला स्केल्स अँड टेल्स टीमकडून जीवनदान

एमपीसी न्यूज – देहूरोड परिसरात अन्नाच्या शोधात निघालेल्या एका भटक्या श्वानाचे डोके बरणीत अडकले. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर श्वान सैरभैर झाला. दिवसभर धावपळ करून त्याने श्वास घेण्यापुरती कशीबशी बरणी कुरतडली. या श्वानाची माहिती मिळताच स्केल्स अँड टेल्स टीमच्या स्वयंसेवकांनी त्याला पकडून बरणी काढली.

देहूरोड मधील काकडे वस्ती येथे एक भटके श्वान शनिवारी (दि. 19) सकाळी अन्नाच्या शोधात फिरत होते. एका बरणीमध्ये काहीतरी खाद्यपदार्थ असल्याचे त्याच्या निदर्शनास आले आणि त्याने त्या बरणीत तोंड घातले. बरणीत असलेले अन्न खाल्ल्यानंतर त्याच्या लक्षात आले की, आपले डोके बरणीत अडकले आहे. मग त्याच्या इकडून तिकडे उड्या मारणे आणि धावपळ सुरु झाली.

सुरुवातीला हा प्रकार स्थानिक बघ्यांना गंमतीचा वाटला. परिसरात स्केल्स अँड टेल्स टीमचे काही सदस्य देखील राहत असल्याने त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. दरम्यान तो श्वान बरणीतून डोके बाहेर काढण्यासाठी इकडून तिकडे सैरावैरा पळत होते. टीमच्या सदस्यांनी बराच वेळ त्याचा शोध घेतला मात्र, श्वान मिळून न आल्याने त्यांनी शोध मोहिमेला विश्वांती दिली.

त्यानंतर टीमने सोशल मीडियावर बरणीत डोके अडकलेला श्वान कुठे दिसल्यास संपर्क करण्याचे आवाहन करणारी पोस्ट शेअर केली. सायंकाळी टीमला साईनाथ नगर येथून एक फोन आला आणि टीमचा जीव भांड्यात पडला. त्यांनतर साईनाथ नगर परिसरात जाऊन श्वानाला जाळी टाकून पकडले.

दरम्यान श्वानाने दिवसभर पळून पळून बरणी काही प्रमाणात कुरतडून श्वास घेण्यापुरती छिद्र केले होते. हा श्वान माणसांच्या अंगावर धावून येत होता. टीमच्या सदस्यांना देखील त्याने दोन तीन वेळा चावण्याचा प्रयत्न केला. आशिष चांदेकर, रितेश साठे, शुभांगी वाघचौरे, टिपू सुलतान, विशाल बोडके, निखिल कुंभार, आदित्य मोहिते, सिद्धेश मोहिते, स्वप्नील कुंभार या सदस्यांनी श्वानाचे डोके बरणीतून काढून त्याला रात्री साडेसात वाजताच्या सुमारास मोकळे केले.

सांगवी परिसरात एका भटक्या श्वानाला इमारतीच्या गच्चीवरुन फेकून देऊन त्याचा बळी घेतल्याची घटना मागील काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. काही संवेदनशील तरुणांनी पुढाकार घेऊन याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंदवला. याबाबत ‘एमपीसी न्यूज’ने सविस्तर वृत्त दिले होते. त्याची दाखल घेऊन भाजपच्या ज्येष्ठ नेत्या खासदार मेनका गांधी यांनी थेट दिल्ली येथून सांगवी पोलिसांना फोन करून तपासाच्या सूचना दिल्या होत्या.

एका बाजूला भटक्या श्वानासाठी संपूर्ण दिवस फिरून त्याला जीवनदान देणारे तरुण आणि दुस-या बाजूला इमारतीच्या गच्चीवरून फेकून श्वानाचा जीव घेणारे अज्ञात; हे समाजाच्या दोन टोकाच्या वृत्तीची उदाहरणे आहेत. स्केल्स अँड टेल्स टीमने केलेल्या या संवेदनशील कृत्यामुळे भूतदया अजूनही जिवंत असल्याचे दिसते. याच टीमने मागील आठवड्यात डांबरात फसलेल्या धूळ नागिणींना अथक परिश्रमाने जीवनदान दिले होते.

उघड्यावर कचरा टाकताना तसेच डबे, बरणी, भांड्यांमध्ये खाद्यपदार्थ ठेवताना त्यापासून मुक्या प्राण्यांना त्रास तर होणार नाही ना, याची खबरदारी नागरिकांनी घ्यायला हवी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.