Dehuroad News : मुस्लिम तरुणाची सामाजिक बांधिलकी ! वाहतूक पोलिसांना ‘बिसलेरी’, गोरगरिबांना अन्नदान

एमपीसीन्यूज : देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्ते अशरफ अत्तार यांनी रमजान महिना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांसह एकूण 120 गरजू नागरिकांना बिसलेरी पाणी बॉटल, सॅनिटायझर, मास्क आणि पुलाव वाटप केले.

आत्तार यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून सुमारे हा सेवाभावी उपक्रम राबविला. सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरु आहे. त्यात कोरोनाचे संकट गंभीर झाल्याने राज्यात 15  मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतही लॉकडाऊनची कडक अंमलबाजवणी सुरु आहे.

सध्या कडक उन्हाळा आहे. मे महिन्यातील वैशाख वणव्याने अंगाची लाहीलाही होत असतानाही वाहतूक पोलीस रस्त्यावर रखरखीत उन्हात आपले कर्तव्य बजावत आहेत. वाहतूक पोलिसांच्या या कर्तव्याला सलाम करीत अशरफ आत्तार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना थंडगार बिसलेरी पाणी बॉटल, सॅनिटायझर व मास्क वाटप केले. यावेळी देहूरोड वाहतूक विभागाचे प्रमुख किशोर यादव यांच्यासह वाहतूक पोलीस उपस्थित होते.

त्याचबरोबर देहूरोड शहरातील झोपडपट्टी भागातील गरीब नागरिकांना अन्नदान करण्यात आले. या नागरिकांनाही सॅनिटायझर व मास्क वाटप करून कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अब्बास शेख, कैलास करमारे, अमर केंजळे, जावेद शेख, असिफ शेख आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.