Devendra Fadnavis : आता बैलगाडा शर्यती कदापी बंद होऊ देणार नाही

एमपीसी न्यूज – राज्यातील बैलगाडा शर्यती (Devendra Fadnavis) सुरू झाल्या त्याचे श्रेय अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे आहे. ‘बैल पळू शकतो…’ असा अहवाल आम्ही तयार केला. त्याला सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळाला. त्यामुळे बैलगाडा शर्यत सुरू झाली. बैलागाडा शर्यती बंद झाल्यामुळे गावगाडा, शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. आता जीवाची बाजी लावू पण बैलगाडा शर्यत कदापि बंद होवू देणार नाही, असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व्यक्त केला.
भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने टाळगाव चिखली येथे  बैलगाडा शर्यत भरविण्यात आली. शर्यतीच्या अंतिम फेरीचा थरार अनुभवण्यासाठी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज (मंगळवारी) उपस्थित राहिले होते. यावेळी श्रीक्षेत्र नारायणपूरचे प. पु. अण्णा माऊली महाराज, आमदार राहुल कुल, प्रसाद लाड, समाधान अवताडे, नितेश राणे, सुनील शेळके, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, माजी आमदार नरेंद्र पाटील, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशा बुचके, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप बोदगे आणि पदाधिकारी, राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, पंजाब बैलगाडा संघटनेचे निर्मल सिंग, हरियाणाचे पवन कुंडू, पुणे जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रसिद्ध गाडामालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, देशातील सर्वांत मोठी शर्यत महेश लांडगे यांनी सुरू केली. अहोरात्र मेहनत घेवून मंत्रालय, सर्वोच्च न्यायालात परिश्रम घेतले. बैलगाडा शर्यती सुरू होण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अखिल भारतीय बैलगाडा संघटना, तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनीही बैलगाडा शर्यतीसाठी योगदान दिले.
आमदार लांडगे म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बैलगाडा शर्यतींचा आनंद घेता येत आहे. त्याचे श्रेय केवळ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच आहे. 2017 पर्यंत एकाही राज्यकर्त्याने बैलगाडा शर्यत सुरू व्हावी. याकरिता राज्य शासनाचा एक रुपयाही खर्च केला नाही. खंडोबाची शप्पत घेवून सांगतो… फडणवीस यांनी प्रत्येक सुनावणीला होणारा सुमारे 20 लाख रुपयांचा  खर्च कसा उभारायचा? असा प्रश्न होता. त्यावेळी फडणवीस यांनी शर्यतीच्या खटल्याचा खर्च राज्य सरकार करेल, असा निर्णय घेतला. कायदा करण्यासाठी आम्ही विधानभवनावर आम्ही बैलगाडा आंदोलन घेवून गेलो. त्यावेळी मुख्यमंत्री असलेले फडणवीस स्वत: निवेदन स्वीकारायला आले. पण, फडणवीस यांनी कधी श्रेय घेतले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.