Dighi crime News : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव खंडणी दरोडा विरोधी पथकाने उधळला

सहा जण पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – मोशी येथील काजळे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा डाव पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने उधळून लावला. तसेच सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून त्यांचे तीन साथीदार पळून गेले आहेत. ही कारवाई पोलिसांनी सोमवारी (दि. 21) रात्री पावणे दहा वाजता केली. दरम्यान, अटक आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांचा पोलीस कोठडी सुनावली आहे.

राहुल रमेश चव्हाण (वय 19, रा. कॉलनी नंबर 2, भारतमाता नगर, दिघी, पुणे), शेखर संभाजी जाधव (वय 21, रा. मु. पो. मोघा, ता. उदगिर, जि. लातुर), करण गुरुनाथ राठोड (वय 19, रा. लक्ष्मी ज्वेलर्स मागे, दिघी रोड, भोसरी पुणे), कृष्णा संजय तांगतोडे (वय 20, रा. पुणे फिरस्ता, मुळ रा. रोकडे चाळ, मारूती मंदिराजवळ मु.पो. पाथर्डी, ता. जि. नाशिक) यांना अटक करण्यात आली आहे. तर दोन 17 वर्षीय मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही इसम दुचाकीवर दिघी येथील पोलाईट पॅनोरमा बिल्डींगच्या जवळ असलेल्या पाण्याच्या टाकीच्या बाजूला मोकळ्या मैदानात संशयितरित्या थांबले आहेत. त्यांच्याकडे घातक शस्त्रे असून ते दरोडा घालणार आहेत, अशी माहिती खंडणी दरोडा विरोधी पथकातील पोलीस नाईक किरण काटकर व नितीन लोखंडे यांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी तिथे जाऊन पाहणी केली असता नऊजण संशयितरित्या थांबले होते. रात्री पावणेदहा वाजता पोलिसांनी सापळा लावून त्यांच्यावर छापा टाकला. सहा जणांना पकडले तर तिघेजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. ताब्यात घेतलेल्या सहा जणांमध्ये दोघेजण अल्पवयीन आहेत.

त्यांच्याकडून पोलिसांनी एक सुरा, पाच कोयते, एक मोबाईल फोन, दोन दुचाकी असा एकूण 90 हजार 550 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपींनी दुचाकींची ओळख पटू नये यासाठी नंबर प्लेटवर चिखल लावला होता.

_MPC_DIR_MPU_II

मोशी येथील काजळे पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. त्यांच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात सशस्त्र दरोडा घालण्याची पूर्वतायरीचा गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांचा पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी शेखर जाधव याच्यावर उदगीर शहर आणि उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात वाहनचोरीचे तीन तर भोसरी पोलीस ठाण्यात घरफोडीचे दोन गुन्हे दाखल आहेत.

आरोपी कृष्णा तांगतोडे याच्यावर नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहर, सिन्नर आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात तीन घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

आरोपी करण राठोड याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात मारहाणीचा एक गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी/दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उप निरीक्षक अनिकेत हिवरकर, पोलीस कर्मचारी अशोक दुधवणे, महेश खांडे, गणेश हजारे, उमेश पुलगम, किरण काटकर, नितीन लोखंडे, विक्रांत गायकवाड, निशांत काळे, आशिष बनकर, गणेश कोकणे, सागर शेडगे, राजेश कौशल्ये, प्रविण कांबळे व सुधीर डोळस यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.