Dighi crime News : टोमॅटोच्या उधारीच्या हिशोबावरून भाजी विक्रेत्याकडून एकाला मारहाण
एमपीसी न्यूज – टोमॅटोच्या उधारीचा हिशोब करण्यासाठी आलेल्या एकाला भाजी विक्रेत्याने बेदम मारहाण केली. ही घटना 8 ऑक्टोबर रोजी पुणे-आळंदी रोडवर वडमुखवाडी येथे जय मल्हार भाजी पाल्याच्या दुकानात घडली.
उलम साधुराम जगदाळे (वय 55, रा. कृष्णानगर, दिघी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत रविवारी (दि. 11) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बापू मांडे (रा. वडमुखवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मांडे याचे वडमुखवाडी येथे जय मल्हार नावाचे भाजी पाल्याचे दुकान आहे. फिर्यादी जगदाळे 8 ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वाआठ वाजता आरोपी मांडे याच्याकडे टोमॅटोच्या उधारीचा हिशोब करण्यासाठी आले होते. त्यावरून मांडे याने फिर्यादी यांच्याशी वाद घातला.
प्रथम हाताने मारहाण करून फिर्यादी यांना दुकानाच्या आत नेले. त्यानंतर दमदाटी करून लोखंडी पाईपने मारून जखमी केले. फिर्यादी यांच्या हाताला दुखापत झाली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.