Dighi : हरवलेल्या मुलीचा दोन तासात शोध

एमपीसी न्यूज – शाळेतून बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय मुलीचा दिघी पोलिसांनी दोन तासात शोध घेत पालकांच्या स्वाधीन केले. ही घटना रविवारी (दि. 16) दुपारी घडली.

ईश्वरी राम भागवत (वय सहा वर्ष) असे दिघी पोलिसांनी शोधलेल्या मुलीचे नाव आहे.

चित्रकलेची स्पर्धा असल्यामुळे ईश्‍वरी तिच्या शाळेत गेली होती. सकाळी साडेदहा वाजता परीक्षा संपल्यानंतर ती नेहमीप्रमाणे शाळेच्या बाहेर येऊन थांबली. परंतु, रविवार असल्याने तिला घ्यायला बस येणार नव्हती. ईश्वरी अर्धा किलोमीटर पुढे निघून गेली. तिला रस्ता समजला नाही. त्यामुळे ईश्वरी वेळेत घरी पोहोचू शकली नाही. दरम्यान तिचे वडील तिला घेण्यासाठी शाळेजवळ आले. मात्र ईश्वरी कुठेच दिसत नव्हती.

वडिलांनी तब्बल एक तास तिचा शोध घेतला. मात्र ईश्वरी सापडली नाही. अखेर त्यांनी दिघी पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी धाव घेतली. प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड, पोलीस अधिकारी अशोक तरंगे, महिला पोलीस अधिकारी कदम यांच्यासह 12 कर्मचाऱ्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. दुपारी एकच्या सुमारास ईश्वरी साई पार्क परिसरात सापडली. ईश्वरीला पाहताच आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.