Pimpri : ‘पेटीएम’ कंपनी पालिकेची ‘जावई’ आहे का?; राष्ट्रवादीचा सवाल

काही बँका मोफत कर भरण्याची सुविधा देत असताना पैसे भरुन पेटीएमद्वारे कर भरणा कशाला? 

एमपीसी न्यूज  – विविध बँका मोफत मिळकत कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देत असताना पालिका मिळकत कर भरण्यासाठी  ‘पेटीएम’ची सुविधा कशाला उपलब्ध करुन देत आहे. कर भरणा-या नागरिकांकडून ‘पेटीएम’ शुल्क वसूल करणार असून पेटीएम वॉलेटसाठी पाच रुपये शुल्क आकारले जाणार आहेत. हा  भूर्दंड नागरिकांना नाहक सहन करावा लागणार आहे. त्यामुळे याला विरोध दर्शवित ‘पेटीएम’ कंपनी काय पालिकेची जावई आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना मिळकत कर ‘पेटीएम’द्वारे भरण्याची सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता देखील दिली आहे. हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी महासभेसमोर ठेवण्यात आला आहे. परंतु, याला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. 

विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले, पेटीएमवर कर भरणा केल्यावर नागरिकांकडून पैसे घेतले जाणार आहेत. काही बँका मोफत मिळकत कर भरुन देतात. ‘पेटीएम’वर जमा होणारा कर त्याचदिवशी पालिकेच्या बँक खात्यात जमा करावा लागणार आहे. त्याचदिवशी जमा न झाल्यास 100 रुपयांसाठी प्रतिदिनी पाच रुपये व्याज आकारले जाणार आहे. कर भरणा-या नागरिकांकडून ‘पेटीएम’ शुल्क वसूल करणार आहे. नेटबँकिंगसाठी पाच रुपये शुल्क, क्रेडिट कार्डसाठी 0.80 टक्के शुल्क, डेबिट कार्डवरील दोन हजार रुपयांसाठी 0.50 व 0.75 टक्के शुल्क आकारले जाणार आहे. पेटीएम वॉलेटसाठी पाच रुपये शुल्क आकारले जाणार आहे. हा नागरिकांना भूर्दंड आहे. 

माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर म्हणाल्या, ‘पेटीएम’ कंपनी कर भरणा केल्याच्या बदल्यात शुल्क आकारणार आहे. विविध बँका मोफत कर भरणा करुन देतात. मग, पेटीएमद्वारे कर भरण्याचा अट्टाहास कशासाठी केला जात आहे. ‘पेटीएम’ कंपनी काय पालिकेची जावई? आहे काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

दरम्यान, भारत सरकारने ‘भीम अॅप’ विकसित केले आहे. या अपॅद्वारे मोफत कर भरणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. पालिकेने कर भरणा करण्यासाठी सरकारच्या मोफत अॅपचा वापर करण्याऐवजी खासगी कंपनी असलेल्या ‘पेटीएम’चा वापर करण्याचा घाट कशासासाठी घातला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.