Editorial: तपपूर्ती एमपीसी न्यूजची, तपपूर्ती मल्टिमीडिया पत्रकारितेची!

Editorial: 12 years of MPC News, 12 years of Multimedia Journalism! 198 देश, 6,620 शहरे आणि 88 लाखांहून अधिक युनिक व्हिजिटर्स, वाचक म्हणतात, #i_support_mpcnews

एमपीसी न्यूज (विवेक इनामदार) – भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून 12 वर्षांच्या कालगणनेला विशेष महत्त्व आहे. 12 वर्षे म्हणजे एक तप. पूर्वी ऋषीमुनी कठोर ध्यानधारणा, साधना करीत, त्याचा कालावधी सर्वसाधारणपणे 12 वर्षांचा असे. त्याला तपश्चर्या म्हणत. अनेक समस्या, अडी-अडचणी, संकंटे यांना तोंड देण्याची ती एक सत्त्वपरीक्षाच असे. उपलब्ध किमान साधने आणि प्रबळ इच्छाशक्ती यांची सांगड म्हणजे तपश्चर्या. ही तपश्चर्या पूर्ण केल्यानंतर  टिकून राहण्याचे आणि वाढण्याचे सामर्थ्य तपश्चर्या करणाऱ्या व्यक्तीला प्राप्त होते, असे म्हणतात. 12 वर्षांची सत्त्वपरीक्षा दिल्याने तावून-सुलाखून निघालेल्याला सोन्यासारखी झळाळी प्राप्त होते. काळाच्या कसोटीवर पारखून घेतलेल्या या शंभरी नंबरी सोन्याला आपोआप समाजमान्यताही प्राप्त होते.

‘स्मार्ट सिटी’ पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील स्मार्ट मीडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘एमपीसी न्यूज’ या शहरातील पहिल्या मराठी न्यूज पोर्टलने 12 वर्षांची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करून तेराव्या वर्षात पदार्पण केले आहे. दोन सर्वसामान्य पत्रकारांनी लावलेले हे रोपटे आता चांगलेच फोफावले आहे.

एखाद्या संस्थेच्या जीवनात 12 वर्षे हा काळ काही फार मोठा नसतो, याची आम्हालाही जाणीव आहे. पण या अल्पावधीत आपल्या सर्वांचा भक्कम पाठिंबा आणि शुभेच्छा यामुळे आम्ही पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची अत्याधुनिक मीडिया हाऊसची गरज पूर्ण करू शकलो, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

एमपीसी न्यूज तपपूर्ती विशेषांक पाहण्यासाठी येथे क्लिक करा!

मराठी वेबसाईटचा इतिहास साधारणतः सप्टेंबर 1996 पासून सुरू झाल्याचे दिसून येते. पहिले मराठी न्यूज पोर्टल 1998 मध्ये सुरू झाल्याची नोंद आढळून येते. फॉन्ट डाऊनलोड करावा लागणाऱ्या वेबसाईट, डायनॅमिक एनकोडिंगमधील वेबसाईट आणि युनिकोडमधील वेबसाईट अशी स्थित्यंतरे मराठी वेबसाईट्सच्या इतिहासात दिसून येतात.

बरोबर 12 वर्षांपूर्वी म्हणजे 22 जुलै 2008 ला आम्ही ‘माय पिंपरी चिंचवड डॉट कॉम’ या नावाने शहरातील पहिले सिटी न्यूज पोर्टल सुरू केले. त्यावेळी ‘ऑनलाईन मीडिया’ या शहरवासीयांसाठी पूर्णपणे नवीन होता. शहरात ऑनलाईन मीडिया रुजवण्यापासूनचे आव्हान तेव्हा आमच्यापुढे होते.

निर्भिड, निष्पक्षपाती आणि विश्वासार्ह पत्रकारिता करीत एमपीसी न्यूजच्या टीमने हे आव्हान केवळ स्वीकारलेच नाही तर समर्थपणे पेलले आहे. एमपीसी न्यूजचे अनुकरण करीत त्यानंतर शहरात सुमारे दोन डझन न्यूज पोर्टल सुरू झाली आहेत, हे ‘एमपीसी न्यूज’च्या यशाचे प्रमाण आहे, हे आम्ही नम्रतापूर्वक सर्वांच्या निदर्शनास आणू देऊ इच्छतो.

198 देश, 6,620 शहरे आणि 88 लाखांहून अधिक युनिक व्हिजिटर्स

पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ परिसरातील स्थानिक घडामोडींचा वेध घेणारे हे न्यूज पोर्टल इंटरनेटच्या जाळ्यातून जगभर पसरेल, याची पुसटशीही कल्पनाही आम्हाला 12 वर्षांपूर्वी नव्हती. शहर व जिल्ह्यातील लोकांना हव्या असणाऱ्या लोकल ब्रेकिंग न्यूज आम्ही देत गेलो. आणि या परिसराशी संबंधित मात्र जगभर विखुरलेले नेटीझन्स एमपीसी न्यूजला जोडले जाऊ लागले.

जगभरातील 198 देशांतील 6,620 शहरांमधील तब्बल 88 लाख 2 हजार 820 वाचकांपर्यंत (युनिक व्हिजिटर्स) पोहचण्याचे आणि त्यांच्या पसंतीस उतरण्याचे तसेच विश्वासास पात्र ठरण्याचे भाग्य एमपीसी न्यूजला मिळाले आहे. शहर व परिसराची बित्तंबातमी देणारी अग्रगण्य वृत्तसेवा म्हणून एमपीसी न्यूजचा नावलौकिक झाला आहे.

सुरूवातीला महिन्याला काही हजार हिट्स मिळायच्या आता महिन्याला काही कोटी हिट्स मिळतात, याचे सर्व श्रेय आम्ही आमच्या दर्शकांना देतो.

आधुनिकता आणि नावीन्याचा ध्यास घेऊन 2008 पासून शहरवासीयांची सेवा करणाऱ्या टीम एमपीसी न्यूजने मोबाईल क्रांतीनंतरची गरज लक्षात घेऊन एसएमएस न्यूज अलर्ट्‌स सेवा सुरू केली.

सोशल मीडियाचा प्रभावी वापर करीत फेसबुक पेज, व्हॉट्स अ‍ॅप बुलेटीन, ट्वीटर, यूट्यूबच्या माध्यमातून शहरातील ताज्या घडामोडींबाबत जगाला अपडेट ठेवण्याची कामगिरी केली. यावर्षी टेलिग्राम आणि इन्स्टाग्राम या प्लॅटफॉर्मवरही आपले स्थान निर्माण केले आहे.

बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन स्थानिक बातम्या देणारे एमपीसी न्यूज हे शहरातील पहिले मोबाईल अ‍ॅप्लिकेशन सुरू करण्याचा मानही आम्हाला मिळाला. आम्ही गेली दोन वर्षे सकाळी ताज्या बातम्या देणारे ऑडिओ बुलेटीन प्रसारित करीत असल्यामुळे बातम्यांचे श्रवण करण्याचा आनंदही आमच्या श्रोत्यांना उपलब्ध झाला आहे.

पॉडकास्ट आणि व्हिडिओ बुलेटीन

वाचकांच्या मागणीनुसार आम्ही आता दररोज सकाळी एमपीसी न्यूज पॉडकास्ट आणि रात्री दिवसभरातील ठळक घडामोडींचा धावता आढावा घेणारे व्हिडिओ बुलेटीन देखील तपपूर्तीच्या निमित्ताने सुरू केले आहे. मल्टीमीडियाचा वापर करून आम्ही दर्शकांना मोठ्या विश्वासाने ग्वाही देऊ इच्छितो, राहा एकदम अपडेट, कधीही, कुठेही!

_MPC_DIR_MPU_II

नागरिकांच्या सुख-दुःखात साथ देणारा हक्काचा सोबती, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराचा आरसा, कोणत्याही पुढाऱ्याचा अथवा राजकीय पक्षाचा नव्हे तर सर्वसामान्य जनतेचा आवाज असणारे ‘एमपीसी न्यूज डॉट इन’ हे न्यूज पोर्टल आता पुणे व पिंपरी-चिंचवडकरांचा जणू ऑनलाईन ‘जीवनसाथी’ बनले आहे, असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे होणार नाही.

हाडाच्या पत्रकारांनी सर्वसामान्यांसाठी सिटी न्यूज पोर्टल चालविण्याच्या या प्रयोगाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. एमपीसी न्यूज हे मंथन राष्ट्रीय पारितोषिक विजेते शहरातील एकमेव सिटी न्यूज पोर्टल आहे, ही बाबही अभिमानास्पद आहे.

गेल्या 12 वर्षांच्या काळात आम्ही पाच वेळा एमपीसी न्यूजला नवीन चेहरा दिला. अधिक आकर्षक मांडणी असलेले यूजर फ्रेंडली न्यूज पोर्टल विकसित करण्यासाठी आमचे सातत्याने नवनवीन प्रयोग सुरू असतात.

स्थानिक बातम्यांबरोबर राज्यातील व देश-विदेशातील ठळक घडामोडींचा आढावा देण्यास तसेच मनोरंजन, लाईफस्टाईल, क्रीडा, तंत्रज्ञान अशा जीवनाच्या विविध अंगांशी संबंधित लेख आणि माहिती देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे एमपीसी न्यूजच्या वाचकप्रियतेत अधिकच भर पडली आहे.

स्मार्ट सिटीमधील या स्मार्ट मीडिया हाऊसच्या यशामध्ये आपण सर्व वाचक, दर्शक, हितचिंतक, जाहिरातदार, तांत्रिक सल्लागार, पत्रकार सहकारी व अन्य टीम मेंबर असे आपण सर्वजण बरोबरीचे भागीदार आहात. आपल्या भक्कम पाठबळाशिवाय ही आव्हानात्मक वाटचाल केवळ अशक्य होती. त्यामुळे तपपूर्ती साजरी करीत असताना आपणा सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हे आमचे कर्तव्य आहे. आमच्यावरील आपला विश्वास आणि प्रेम असेच पुढे राहू देत.

कोरोना संकट काळातील आपला विश्वासू सहकारी

सध्याचा काळ हा सर्वांसाठीच आव्हानात्मक आहे. कोरोना महामारीच्या संकटात विश्वासार्ह ऑनलाईन मीडियाची गरज अधोरेखित झाली. या संकटकाळात ‘टीम एमपीसी न्यूज’च्या सर्व सदस्यांनी आपला जीव धोक्यात घालून समाजाला खात्रीशीर माहिती पुरविण्याचे तसेच जनजागृतीचे काम पूर्ण क्षमतेने केले.

सर्वसामान्य आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून ‘एमपीसी न्यूज’ने जबाबदारी पार पाडली. अनेक अडीअडचणीतील लोकांपर्यंत मदत पोहचविण्यात ‘टीम एमपीसी न्यूज’चा मोठा हातभार लागला, याचे आम्हाला मनोमन समाधान आहे.

कोरोना संकट आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे देशातील बहुतेक सर्वच मीडिया हाऊसचे अर्थकारण ढासळले आहे. कोरोनाने अनेक पत्रकारांच्या नोकरीचा पण बळी घेतला आहे. अनेक माध्यम संस्थांनी त्यांच्या पत्रकारांचे वेतन निम्म्यापर्यंत कमी केले आहे. या पार्श्वभूमीवर ‘एमपीसी न्यूज’ने मात्र कोणत्याही परिस्थितीत टीम मेंबरचे वेतन कमी न करण्याचा निर्णय घेतला.

लॉकडाऊनमुळे एमपीसी न्यूजच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे अशा परीक्षेच्या काळात आम्हालाही आपल्या पाठबळाची नीतांत गरज आहे. नेहमीप्रमाणे या संकट काळातही समाज आमच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील, याबाबत आमच्या मनात तीळमात्र शंका नाही.

आय सपोर्ट ‘एमपीसी न्यूज’ #i_support_mpcnews

आपली सेवा यापुढेही अशीच चालू राहण्यासाठी तसेच अधिक सक्षमपणे सेवा देण्यासाठी ‘एमपीसी न्यूज’च्या टीमचा विस्तार करण्याची योजना आहे. त्यासाठी आम्हाला आपल्या पाठिंब्याची गरज आहे. अर्थातच त्यासाठी कोणत्याही प्रकारची सक्ती असणार नाही. आपण दिवसाला एक रुपया याप्रमाणे एक वर्षासाठी किमान 365 रुपये इतकी ऐच्छिक वर्गणी एमपीसी न्यूजच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा करावी, असे आवाहन आम्ही या निमित्ताने करीत आहोत.

आम्ही गेल्या 12 वर्षांत प्रामाणिकपणे केलेल्या सेवेची दखल घेऊन तसेच यापुढे अधिक चांगली सेवा मिळावी यासाठी #i_support_mpcnews या मोहिमेत सहभागी व्हाल, असा विश्वास वाटतो.

वर्षाला 365 रुपये शक्य नसेल तर एक रुपयापासून कितीही ऐच्छिक रक्कम आपण आमच्या कामासाठी मदत म्हणून पाठवू शकता. आपला एक रुपया देखील आमच्यासाठी मोलाचा आहे. तो सत्कारणीच लागेल, याची खात्री आम्ही आपणास देतो.

वर्षाला 365 रुपयांपेक्षा अधिक सपोर्ट करण्याची इच्छा असणारे वाचक व हितचिंतक त्यांच्या इच्छेप्रमाणे अधिकची मदत देखील करू शकतात. आपणही मदतीचा हात पुढे करावा आणि आपल्या मित्रांनाही त्याबाबत सांगावे, असे आवाहन आम्ही या निमित्ताने करीत आहोत.

#i_support_mpcnews या मोहिमेअंतर्गत मदत करू इच्छिणाऱ्यांसाठी आपल्या न्यूज पोर्टलवरच ऑनलाईन पेमेंट जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. UPI, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अशा कोणत्याही माध्यमातून आपण आम्हाला सपोर्ट करू शकता.

आपण आतापर्यंत केलात त्यापेक्षा अधिक सपोर्ट आता आणि भविष्य काळात कराल आणि प्रामाणिक, सकारात्मक पत्रकारितेला सामाजिक व आर्थिक पाठबळ देखील द्याल, असा मनोमन विश्वास वाटतो. धन्यवाद!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.