Hinjawadi : कोरोना काळात सोसायटीच्या आवारात स्पीकर लाऊन धिंगाणा घातल्याप्रकरणी आठ जणांना अटक

एमपीसी न्यूज – कोरोना काळात सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता सोसायटीच्या आवारात स्पीकर लाऊन धिंगाणा घालणा-या आठ जणांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 16) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास एक्झरबिया सोसायटी येथे घडली.

माधव यशवंत काळे, निखील भीमा बनसोडे, अथर्व मनोज मुसमोड, अभिजित सुरेंद्र आमले, मयूर कैलास गोरे, रवींद्र अशोक गरदरे, संकेत पंढरीनाथ भगत, प्रतिक महेश ढोकचौळे व इतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी सुधीर दत्तात्रय शिंदे (वय 29, रा. दत्तवाडी, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुंजी येथील एक्झरबिया सोसायटीमध्ये एका सलून दुकानासमोर आरोपींनी सार्वजनिक शांततेचा भंग करून स्पीकरवर मोठमोठ्या आवाजात गाणी लाऊन धिंगाणा घातला. कोरोना साथीच्या काळात कोणत्याही प्रकारची काळजी न घेता कोरोनाचा प्रसार करण्यास पोषक वातावरण निर्माण केले.

याबाबत फिर्यादी शिंदे यांनी आरोपींना हटकले. यावरून आरोपी माधव याने हॉकी स्टिकने तर अन्य आरोपींनी फिर्यादी यांचा मित्र आकाश प्रधान यांना हाताने मारहाण करून जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.