Pimpri : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी आठ कर्मचा-यांची नियुक्ती
चिखली पोलीस ठाण्यासाठी 22 कर्मचा-यांची बदली

एमपीसी न्यूज – नव्याने सुरु होत असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी वरिष्ठ अधिका-यांपासून ते कर्मचा-यांपर्यंत नियुक्त्या करण्यात येत आहेत. पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, पोलीस उप आयुक्त, पोलीस निरीक्षक यांच्या बरोबरच पोलीस कर्मचा-यांची देखील नियुक्ती करण्यात येत आहे. आज (शुक्रवारी) पुणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस फौजदार पदावरील 235 कर्मचा-यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आठ पोलीस कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलीस आयुक्तालयासोबत नव्याने सुरु होत असलेल्या चिखली पोलीस ठाण्यात 22 कर्मचा-यांची बदली करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध कक्षांसाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या एकूण 4 हजार 840 पदांची आवश्यकता आहे. त्यापैकी पुणे पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणकडून 2 हजार 207 पदे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात येणार आहेत. उर्वरित 2 हजार 633 पदे नव्याने भरती करण्यात येणार आहेत. त्याबाबत बदली, नियुक्ती प्रक्रिया जोरात सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर आठ कर्मचा-यांची नियुक्ती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयात करण्यात आली आहे.
पोलीस शिपाई एच सी गायकवाड, विशाल माने, अमोल रावते, व्ही. आर. सानप, महिला पोलीस शिपाई आर जी खोमणे, के. डी. धोंडगे, पोलीस हवालदार आर. बी. मारेणे, ए. बी. जगताप यांची त्यांच्या विनंतीवरून नियुक्ती करण्यात आली आहे.
नव्याने सुरु होत असलेल्या चिखली पोलीस ठाण्यासाठी शंकर आवताडे यांना बढती देत वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर या पोलीस ठाण्यासाठी 22 पोलीस कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पाच पोलीस हवालदार, नऊ पोलीस शिपाई, एक महिला पोलीस शिपाई, चार पोलीस नाईक आणि एक महिला पोलीस नाईक यांची त्यांच्या विनंतीवरून नियुक्ती करण्यात आली आहे.