Eknath Pawar: एकनाथ पवार यांना लोहा कंधारमधून विधानसभेसाठी संधी मिळणार का? विधानसभेसाठी सोडले शहराचे राजकारण

एमपीसी न्यूज – पक्षात घुसमट होत असल्याने आणि (Eknath Pawar) विधानसभा लढण्याची संधी नसल्याने अखेर भाजपचे माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. भोसरीतून विधानसभेत जाण्याची संधी नसल्याने पवार यांनी आपले गाव बरे म्हणत नांदेडला जाण्याचा मार्ग स्वीकारला. लोहा-कंधारमध्ये ताकद असलेल्या ठाकरे गटात प्रवेश करत नवीन राजकीय श्रीगणेशा केला. त्यामुळे भोसरीतून विधानसभेत जाण्याची हुकलेली संधी पवार यांना लोहा कंधारमधून मिळणार का? हे पाहणे औत्युस्क्याचे ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात भाजप टिकऊन (Eknath Pawar) ठेवण्यात एकनाथ पवार यांचे योगदान आहे. पक्षात कोणी येत नसताना संघर्ष करत पक्षाचे अस्तित्व ठेवण्यासाठी धडपड केली. मास लिडर नसले तरी संघटनेतील कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. 2014 मध्ये मोदी लाट आल्यानंतर शहर भाजपला अच्छे दिन आले. 2014 मध्ये भोसरीतून दुस-या क्रमांकाची मते घेतलेल्या पवार यांना 2019 मध्ये आपणच आमदार होणार असा विश्वास असतानाच अपक्ष असलेले आमदार महेश लांडगे भाजपमध्ये आले आणि तिथेच माशी शिंकली. पवार यांची विधानसभेची संधी हुकली.

Chinchwad : अवजड वाहनांना प्रवेश बंदीचे सूचना फलक न दिसणाऱ्या ठिकाणी

महापालिकेत 2017 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर पवार यांना सभागृह नेतेपद मिळाले. पण, तीन वर्षेच हे पद ठेवले. शेवटच्यावर्षी स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. पण, ती फोल ठरली. दुस-या पक्षातून आलेल्यांना पदे मिळतात. आपल्याला डावलले जात असल्याची त्यांची भावना झाली. तसेच भोसरीतून निवडणूक लढण्याची संधी नसल्याने त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्या पक्ष सोडण्याचा भाजपवर मोठा परिणाम होईल असे दिसत नाही. पण, भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा संदेश मात्र जनतेत गेला.

विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत भाजपकडून पवार यांचा थोड्या मतांनी पराभव झाला. दुस-या क्रमाकांची 52 हजार मते घेतली. पवार यांचे विधानसभेत जाण्याचे स्वप्न आहे. 2024 ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी मूळगावी नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधारमध्ये संघटना बांधण्याचे काम सुरु केले. मतदारसंघ पिंजून काढत व घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत मोठी तयारी करत आहेत. भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने वेळीच सावध होत तिथे ठाकरे गटाची ताकद असल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळावी या अटीवरच त्यांनी प्रवेश केल्याचे सांगितले जाते.

लोहा-कंधारवासीय स्वीकारणार का?

लोहा-कंधार या मतदारसंघातून 2019 मध्ये भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे मेहुणे व सेवानिवृत्त अधिकारी श्यामसुंदर शिंदे हे अपक्ष म्हणून विजयी झाले होते. त्यामुळे खासदार चिखलीकर यांनी त्यांची ही हक्काची जागा सोडण्यास नकार दर्शविला. चिखलीकर यांच्या कन्या प्रणिता देवरे- चिखलीकर अथवा भगिनी म्हणजे आमदार शिंदे यांच्या पत्नी या ठिकाणी निवडणूक लढण्याची तयारी करीत असल्याचे समजते. त्यामुळे पवार यांना खासदारासह विद्यमान अपक्ष आमदारांचे आव्हान असणार आहे. त्यांच्यावर मात करत एकनाथदादा पवार विधानसभेत जाणार का याकडे पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष राहील.

गावकी-भावकीच्या राजकारणातून विधानसभेची संधी हुकली?

पिंपरी-चिंचवड शहरात आजही गावकी-भावकीचे राजकारण चालताना दिसते. या राजकारणात बाहेरुन आलेल्यांना महापालिकेपर्यंतच मर्यादित रहावे लागत आहे. विधानसभा, लोकसभेत जाण्यात अडथळे निर्माण केले जात असल्याचे दिसून येते. त्यामुळेच विधानसभेत जाण्यासाठी पवार यांना गावाकडचा मार्ग स्वीकारावा लागल्याची चर्चा आहे. शहराचे राजकारण दादा या टोपण नावाभोवती फिरते. 15 वर्षे अजितदादा पवार यांनी राज्य केले. मागील 5 वर्षे भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे महापालिकेची कारभारी होते. एकनाथ पवार यांना ही दादा म्हटले जाते. आता त्यांनी गावचा मार्ग स्वीकारल्याने शहराच्या राजकारणातून एक दादा बाहेर गेल्याची चर्चा आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.