Lonavala News : एक्सप्रेस गाड्या लोणावळा रेल्वे स्थानकात थांबल्याच पाहिजेत : भाजपा

लोकल सेवा सुरू करण्याची मागणी

एमपीसी न्यूज : लोणावळा रेल्वे स्थानकावर थांबणार्‍या एक्सप्रेस गाड्याचा थांबा बदलून तो खंडाळा रेल्वे स्थानकावर नेहण्यात आल्याने प्रवाश्यांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. याकरिता तात्काळ हा थांबा पुन्हा लोणावळा रेल्वे स्थानकावर सुरू करावा अशी मागणी लोणावळा शहर भाजपाच्या वतीने लोणावळा स्टेशन मास्तर यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच लोणावळा पुणे ही लोकल सेवा लवकरात लवकर सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

याविषयी बोलताना नगराध्यक्षा सुरेखा जाधव व भाजपा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल म्हणाले पुर्वी लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना लोणावळ्यात थांबा होता, तो खंडाळ्यात नेण्यात आला आहे. यामुळे गुजरात, राजस्थान ,उत्तर प्रदेश इ. उत्तर भारतातील राज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना खाजगी अथवा भाड्याच्या वाहनांनी खंडाळा येथे गाडी पकडण्यासाठी जावे लागते. यामध्ये अनेकदा वाहतुक कोंडीमुळे लोकांची गाडी सुद्धा चुकते त्यांना  शारीरिक, आर्थिक व मानसिक मनस्ताप होतो आहे.

वृद्ध, लहान मुले व अपंग व्यक्तींना होणारा त्रास रोखण्यासाठी लांब पल्ल्यांच्या गाड्यांना पुन्हा लोणावळा येथे हॉल्ट सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच लोकल गाड्या सुरू न केल्यामुळे, सिजन तिकीट (मासिक पास) देणे बंद केलेले असल्यामुळे दहा-बारा हजार रुपयांवरती पुणे, चिंचवड पिंपरी या शहरात रोज ये-जा करून नोकरी करणाऱ्या तरुणांना आपली नोकरी टिकविण्यासाठी रोज सरासरी दोनशे रुपये खर्च करून कामावरती जावे लागते.

त्यांची या समस्येतून सुटका करण्याकरता लोकल ट्रेन चालू होणे आवश्यक आहे तसेच मासिक पास देणे लवकर सुरू केले पाहिजे या मागण्यांकरीता भारतीय जनता पार्टी, लोणावळा तर्फे आंदोलन करून स्टेशन मास्तरांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.