Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे अग्निशमन सेवेतील रिक्त पद भरा

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेतील अग्निशमन सेवेतील रिक्त असलेली शासकीय 4 फायरमन, 3 ड्रायव्हरपदे भरण्यात यावी या मागणीबाबतचे निवेदन संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व तळेगाव नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब भेगडे यांच्या वतीने, आरोग्य व स्वच्छता समिती सभापती किशोर भेगडे यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांना दिले.

यावेळी बांधकाम खात्याचे अधिकारी मल्लीकार्जुन बनसोडे, माजी उपनगराध्यक्षा विद्यमान नगरसेविका वैशाली दाभाडे,  मंगल भेगडे, संगीता शेळके, ज्योती शिंदे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस विशाल वहिले, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल कार्याध्यक्ष अतुल राऊत, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस   अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष आफताब सय्यद, मावळ ता रा कॉ ओबीसी सेल उपाध्यक्ष सोमनाथ धोंगडे उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथील लोकसंख्या सुमारे एक लाखाच्या वर असून येथील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आजूबाजूच्या ग्रामीण भागाकरिता अग्निशमन सेवा देण्याची जबाबदारी तळेगाव नगरपरिषदेकडे येते. तळेगाव शहराच्या 30 किमी आजूबाजूच्या क्षेत्रात इतर नागरिकांच्या सेवेसाठी यंत्रणा उपलब्ध नाही. सद्यस्थितीत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत अग्निशमन यंत्रणेत अपुरे मनुष्यबळ असल्याने अतिरिक्त ताण येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

आग विझवण्याबरोबर इतर आपत्ती व्यवस्थापनेचे काम अग्निशमन विभागात येत आहे. शहराच्या व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी आपणाद्वारे शासनाच्या नगरविकास खात्याच्या विभागाशी पाठपुरावा करून येथील शासकीय रिक्त असलेली कुशल 4 फायरमन, 3 ड्रायव्हर पदे भरण्यात यावी अशी विनंती ही निवेदनात करण्यात आली आहे.

सदर निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे  उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, मावळचे आमदार व जिल्हाधिकारी, पुणे यांना देखील मेलद्वारे पाठविण्यात आल्या  आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.