Pimpri News: भरलेली कचरा गाडी खाली करुन शोधून दिले मौल्यवान दागिने!

सफाई कर्मचा-यामुळे कच-यात गेलेले दागिने सापडले!

एमपीसी न्यूज – नेहमीप्रमाणे घंटागाडीत त्यांनी घरातील कचरा टाकला…, त्यात दागिन्यांची छोटी बॅगही चुकून टाकली….. थोड्या वेळाने बॅग गाडीत टाकल्याचे त्यांच्या लक्षात आले…,दागिने कचऱ्यात गेल्याने त्यांचा धीर सुटला …..पण पालिकेच्या  घंटागाडीवरील कर्मचा-यांनी संपूर्ण कचरा जमिनीवर टाकला अन् दागिने शोधून दिले. कर्मचा-यांच्या सहकार्यामुळे दागिने मिळाल्याने त्यांच्या चेह-यावर पुन्हा हास्य फुलले! पिंपळेगुरव येथे हा प्रकार रविवारी (दि.8) घडला.

पिंपळेगुरव येथे राहणा-या एका महिलेने रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे कचरा गाडीत कचरा टाकला. मात्र, त्याचबरोबर नजरचुकीने सोन्याच्या दागिन्यांची बॅगही घंटागाडीत टाकली गेली. घंटागाडी पुढे गेल्यानंतर थोड्याच वेळात त्यांना कचऱ्यासोबत दागिन्यांची बॅगही टाकली गेल्याचे समजले. दागिने कचऱ्यात गेल्याने त्या घाबरल्या होता.

त्यांनी नगरसेविका निर्मला कुटे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ही गोष्ट पालिका अधिका-यांच्या कानावर घातली. त्यानंतर ट्रक मोशीतील कचरा डेपोवर गेला. तेथे, संपूर्ण ट्रकमधील कचरा जमिनीवर टाकण्यात आला. सफाई कर्मचारी हेमंत लखन यांच्यासह दोन कर्मचा-यांनी कचरा निवडण्यासाठी परिश्रम घेऊन दागिन्यांची पिशवी शोधून काढली.  दागिने सुरक्षित हाती मिळाल्याने त्यांनी पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

याबाबत पालिकेचे सफाई कर्मचारी हेमंत लखन म्हणाले, चुलत भावाच्या मित्राच्या आईची बॅग होती. कचरा गाडीमध्ये दागिने असलेली बॅग पडल्याचे सांगितले. त्यानंतर आम्ही गाडी मोशी कचरा डेपोला घेवून गेलो. कच-याने भरलेल्या गाडीतून बॅग शोधणे सोपे नव्हते. त्यामध्ये हॉटेल, मंडई, कोविडचा कचराही होता. तरीही रिस्क घेवून संपूर्ण ट्रकमधील कचरा जमिनीवर टाकण्यात आला.  त्या महिलाही मोशी डेपोत आल्या.

त्यांच्यासमोर मी आणि दोन कर्मचा-यांनी ढीगामध्ये उभे राहून बॅग शोधायला सुरुवात केली. अथक परिश्रम घेवून दागिन्यांची पिशवी शोधून काढली. दागिन्यासोबत त्यांची किंमत नव्हती. भावना जोडल्या होत्या. सुनेसाठी त्यांनी दागिने केले होते. दागिने सापडेल की नाही या तणावत त्या होत्या. दागिने सापडल्यानंतर त्या खूश झाल्या. त्यांच्या चेह-यावर हास्य फुलले. नागरिकांच्या चेह-यावरील हास्य हेच आमच्या  कामाचे यश आहे. कच-याचा वास येत असतानाही ते शोधून दिले. नागरिकांना त्रास होवू नये, ते समाधानी रहावते हेच आमचे कर्तव्य आहे. ते पालन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतो, असेही ते म्हणाले.

दागिने परत मिळालेल्या महिला म्हणाल्या, घंटागाडीत चुकून पिशवी पडली होती. पिशविला चैन लावलेली होती. पण, आतमधील छोटी बॅग पडल्याचे माझ्या नंतर लक्षात आले. त्यानंतर नगरसेविका निर्मला कुटे यांच्याशी संपर्क साधला. दागिने थोडे होते. पण, कष्टाचे होते.  पालिकेच्या सफाई कर्मचा-यांनी प्रामाणिकपणे शोधून दिले. सहकार्य केले. त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभारी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.