कात्रजमध्ये दरोडेखोरांकडून हवेत गोळीबार, सराफाला लुटण्याचा प्रयत्न फसला

एमपीसी न्युज : पुण्याच्या कात्रज परिसरातील दत्तनगर येथील एका सराफा दुकानावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी हवेत गोळीबार केला. चोरट्यांनी सराफाच्या दुकानात प्रवेशही केला मात्र अलार्म वाजल्याने चोरटे पळून गेले. जाता जाता त्यांनी हवेत गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री कात्रज येथील दत्तनगर परिसरात हा प्रकार घडला. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दत्तनगर परिसरात श्री मल्हार ज्वेलर्स नावाचे सोन्या चांदीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करून दुकान मालक घरी गेले होते. दरम्यान रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दुकानावर दरोडा टाकण्याच्या हेतूने दुचाकीवरून दोघेजण त्या ठिकाणी आले. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोघांनी दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानातील अलार्म वाजल्याने परिसरातील नागरिक सतर्क झाले हे चोरट्याच्या लक्षात आले.
त्यानंतर चोरट्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. मात्र पळून जात असताना त्यांनी हवेत गोळीबार केला. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.