Vadgaon Maval news : वडगावात कोरोनाचे नियम पाळत मानाच्या गणपतींसह सर्व मंडळे, घरगुती गणेश विसर्जन!

एमपीसी न्यूज – वडगाव शहरात मानाचे गणपती, सर्व गणेश मंडळे आणि घरगुती गणेश विसर्जन कोरोना नियमांचे पालन करत आनंदाने करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे सातव्या दिवशी गणेश विसर्जन करण्यात आले. मिरवणुका न काढता आल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर नाराजी होती, परंतु नियमांचे पालन करायचे असल्याने भक्तीभावपूर्ण वातावरणात सर्वांनी श्री गणेशाला निरोप दिला.

ग्रामदैवत श्री पोटोबा देवस्थान व जय बजरंग तालीम मंडळ या मानाच्या गणपतींचे विसर्जन देवस्थानचे विश्वस्त व तालीम मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

तसेच शहरातील कानिफनाथ तरुण मंडळ, सिद्धिविनायक मित्र मंडळ, मोरया मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, साईनाथ मित्र मंडळ, नवचैतन्य मित्र मंडळ, जयहिंद मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ,  योगेश्वर प्रतिष्ठान, श्रीराम मित्र मंडळ, माळीनगर मित्र मंडळ, जय मल्हार मित्र मंडळ, बालविकास मित्र मंडळ, ओंकार मित्र मंडळ, दिग्विजय मित्र मंडळ, गणेश तरुण मंडळ, पंचशील मित्र मंडळ, मयुरेश्वर मित्र मंडळ, इंद्रायणी मित्र मंडळ, भैरवनाथ मित्र मंडळ, वक्रतुंड मित्र मंडळ, जय जवान जय किसान मित्र मंडळ, शिवशंभो मित्र मंडळ, विजयनगर मित्र मंडळ, एकविरा मित्र मंडळ, शितळादेवी मित्र मंडळ, पंचमुखी मित्र मंडळ, माळीनगर मित्र मंडळ आदी मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन आनंदाच्या वातावरणात करण्यात आले.

दरम्यान यावर्षीही कोरोनाचे संकट व शासनाचे निर्देश कायम असल्याने मिरवणुका काढता न आल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली. कुठलाही डामडौल न करता गणपतींचे विसर्जन करण्यात आले. पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

घरगुती गणपतींना उत्साहात निरोप !

वडगाव शहरातील घरगुती गणपतींना आज सातव्या दिवशी उत्साही वातावरणात निरोप देण्यात आला. वडगाव नगरपंचायतच्या वतीने माळीनगर, विजयनगर, केशवनगर, प्रभाग 16 मधील पाण्याच्या टाकीजवळ, संतोष खैरे यांच्या निवासस्थानजवळ व वडगाव नगरपंचायत जुनी इमारत समोर या सात ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौद तयार करण्यात आले होते.

वडगावकर नागरिकांनी संबंधित हौदामध्ये तसेच इंद्रायणी नदी, खापरे ओढा याठिकाणी उत्साही वातावरणात गणपतींचे विसर्जन केले, बालचम्मुंनी गणपतीचा जयजयकार करत वातावरण दुमदुमून टाकले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.