Pune News : माजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन

एमपीसी न्यूज :  महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी मोदी सरकार आणि भाजपने चालवलेले सुडाचे राजकारण थांबवून, सध्याची कोरोना साथीची चिंताजनक स्थिती लक्षात घेऊन, लोकांचे जीव वाचवावेत असे कळकळीचे आवाहन माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना केले आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचे भाजप नेत्यांचे प्रयत्न फसले. त्यानंतर नैराश्यातून मोदी सरकार आणि भाजप नेत्यांनी सूडाचे राजकारण करुन सरकार बदनाम कसे होईल असे उद्योग चालवले आहेत. केंद्र सरकारकडून निधी वाटपात महाराष्ट्रावर अन्याय झालेला आहे.

_MPC_DIR_MPU_II

कोवीड नियंत्रणासाठी लसीकरणाचा वेग वाढवावा असे पंतप्रधान मोदी म्हणतात मात्र महाराष्ट्राला लसीचा पुरवठा अपुरा केला जातो आणि इथल्या सरकारची कोंडी केली जाते. व्हेंटिलेटर, पीपीई किट आदी वैद्यकीय साहित्य पुरविण्याची नेमका महाराष्ट्रावरील केंद्र सरकारने अन्याय केलेला आहे.

महाराष्ट्राला औषधे, इंजेक्शन्स पुरविल्यास कारखान्यांना टाळे ठोकू असा इशारा औषधे उत्पादक कंपन्यांना आणि पुरवठादारांना केंद्र सरकारने दिला आहे हा प्रकार धक्कादायक आणि घृणास्पद आहे असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर अन्याय करण्याच्या नादात महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय होत आहे. येथील जनता वेठीस धरली जात आहे. कोवीड साथ उच्चांक गाठत असताना भाजप नेत्यांनी सुडाचे राजकारण थांबवावे जनतेला वेठीस धरण्याऐवजी, लोकांचे जीव वाचवण्यासाठी सहकार्य करावे. महाराष्ट्राला, केंद्र सरकारकडून जास्तीतजास्त मदत मिळवून द्यावी, असे माझे कळकळीचे आवाहन असल्याचे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.