Talegaon Crime News : पहिल्या पत्नीच्या संमतीशिवाय पतीने केले दुसरे लग्न; सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – पहिली पत्नी हयात असताना तिच्या संमतीशिवाय पतीने दुसरे लग्न केले. तसेच पती, दीर, जाऊ, नणंद यांनी संगनमत करून विवाहितेचा छळ केला. तिचा गर्भपात करून त्याबाबत कुणाला काहीही न सांगण्याची धमकी दिली. हा प्रकार तळेगाव दाभाडे येथे घडला असून याप्रकरणी विवाहितेने पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात सासरच्या लोकांविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हसीना हुसेन शेख (रा. तळेगाव दाभाडे) यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी पती राजमोहम्मद शेख, दीर रसूल शेख, जाऊ यास्मिन शेख, नणंद सुलताना शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

हसीना शेख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हसीना यांचा मे 2016 मध्ये राजमोहम्मद शेख यांच्याशी विवाह झाला. विवाहात हसीना यांच्या आईने अडीच ते तीन तोळे सोने, लग्नाचा खर्च केला आहे. राजमोहम्मद यांनी हसीना यांना दीड वर्ष नांदवले. त्यानंतर हुंड्यासाठी वारंवार त्रास दिला.

पती राजमोहम्मद यांचे नात्यातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे हसीना यांना समजले. त्याबाबत विचारणा केली असता पतीने हसीना यांना मारहाण केली. हसीना गरोदर असताना पती आणि जावेने त्यांना गर्भपाताच्या गोळ्या देऊन त्यांचा गर्भपात केला. याबाबत हसीना यांना काहीही कल्पना दिली नाही. याबाबत कुणाला काहीही सांगू नको, तर तुला नांदावतो अशी हसीना यांना धमकी दिली. दीर रसूल आणि नणंद सुलताना यांनी देखील हसीना यांना माहेरहून पैसे आणण्यासाठी त्रास दिला.

हसीना यांच्या पतीने त्यांच्या संमतीशिवाय दुसरे लग्न केले. याबाबत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी हसीना यांनी केली आहे. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पाठपुरावा केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.