Wakad : वाकड-हिंजवडी रस्ता रुंदी करणाचा मार्ग मोकळा

रस्त्याच्या कामासाठी 20 कोटीच्या खर्चाला स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज – वाकड येथे देहूरोड – कात्रज बाह्यवळण महामार्गावरील पुलापासून हिंजवडीपर्यंत रस्ता रूंदीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी 19 कोटी 58 लाख रूपयांचा खर्च अपेक्षित असताना जादा दराची आलेली निविदा स्वीकरत रुंदीकरणासाठी 20 कोटी 55 लाख रुपयांचा खर्चाला आज (मंगळवारी) झालेल्या स्थायी समितीत मान्यता देण्यात आली.

वाकड येथे देहूरोड – कात्रज बाह्यवळण महामार्गावरील पुलापासून हिंजवडी येथे पिंपरी महापालिका हद्दीपर्यंत बीआरटी कॉरिडॉरवर रस्ता रूंदीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिकेतर्फे ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. या रस्ता रूंदीकरणासाठी 19 कोटी 58  लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यामध्ये रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग शुल्क वगळून 19 कोटी 46 लाख रूपये दर ठरवून निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार, तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या होत्या.

त्यापैकी कृष्णाई इन्फ्रा या ठेकेदाराने सुरूवातीला निविदा दरापेक्षा 9 टक्के जादा दराने निविदा सादर केली. इतर ठेकेदारांपेक्षा त्यांचा दर लघुत्तम होता. त्यामुळे त्यांना आणखी दर कमी करण्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी 4.95  टक्के जादा सुधारीत दर सादर केला. सन 2018-19 च्या एसएसआर दरानुसार प्राप्त निविदा स्विकृत योग्य दरापेक्षा 7.11  टक्क्याने कमी येत आहे. प्राप्त निविदा मंजुर दराने म्हणजेच 20 कोटी 42  लाख रूपये अधिक रॉयल्टी चार्जेस 11 लाख रूपये, टेस्टींग चार्जेस 1 लाख 68 हजार रूपये असे 20 कोटी 55 लाख रूपयांपर्यंत काम करून घेण्यात येणार आहे.

म्हणजेच या कामासाठी तब्बल एक कोटी रूपये जादा खर्च होणार आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 29 डिसेंबर रोजी या कामांची निविदा स्विकारण्यास मान्यता दिली आहे. एक वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानुसार, या ठेकेदारासमवेत करारनामा करण्यात येणार असून या विषयाला आज झालेल्या  स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.