Tussle Between Kangana & Tapasee: घराणेशाहीवरुन आता कंगना आणि तापसीमध्ये शाब्दिक युद्ध

From the dynasty to the literal war between Kangana and Tapasee करण जोहर मला आवडतो असं मी कुठेही म्हटलं नाही. त्याचप्रमाणे करण जोहरचा मला राग येतो असंही मी म्हटलं नाही.

एमपीसी न्यूज – आपल्या बिनधास्त वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध असलेल्या कंगना रानावतला आता बॉलिवूडमधल्या आणखी एका बिनधास्त अभिनेत्रीने चॅलेंज दिले आहे. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन बॉलिवूडमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. त्यात आता तापसी पन्नूने उडी घेतली आहे. कंगनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तापसी पन्नूला ‘बी ग्रेड’ अभिनेत्री म्हणून हिणवलं. त्यानंतर तापसीनेही तिला सडेतोड उत्तर दिलं आहे.

तापसीने ट्विटरवर म्हटलं, ‘बारावी आणि दहावीनंतर आता आमचेसुद्धा निकाल समोर आले आहेत, असं मी ऐकलंय. आमचं ग्रेड सिस्टिम आता अधिकृत झालंय का? आतापर्यंत तर नंबर सिस्टिमवर एखाद्याचं महत्त्व सिद्ध व्हायचं, असा उपरोधिक टोला लगावत तापसीने कंगनाची शाळा घेतली आहे.

नेपोटिझमवरुन सुरु झालेल्या शाब्दिक चकमकींबद्दल बोलताना कंगनाने आपल्या सडेतोड वृत्तीनुसार मते मांडली. ती म्हणाली, ‘या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये मी फक्त गमावू शकते. कारण मला माहितीये, उद्या ही मूव्ही माफिया गँग बाहेरुन आलेल्या तापसी पन्नू, स्वरा भास्कर यांसारख्या २० कलाकारांना समोर आणेल. आणि हे कलाकार फक्त कंगनालाच घराणेशाहीचा त्रास होतो. पण आमचं करण जोहरवर प्रेम आहे असं म्हणतील.

जर तुम्हाला करण जोहर इतका आवडतो, तर तुम्ही बी ग्रेड अभिनेत्री का आहात? तुम्ही तर आलिया भट्ट आणि अनन्या पांडेपेक्षा चांगले दिसता. तुम्ही चांगल्या अभिनेत्री आहात. तरी तुम्हाला काम का मिळत नाही. तुमचं पूर्ण अस्तित्वच घराणेशाहीचा पुरावा आहे.

या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही खूष आहात हे मला का सांगताय? मला माहितीये की भविष्यात असंच होईल आणि संपूर्ण सिस्टिम मला वेडं ठरवेल’, असं कंगना या मुलाखतीत म्हणाली.

मात्र ‘हिंदुस्थान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तापसीने कंगनाच्या प्रत्येक वक्तव्यावर उत्तर दिलं आहे. ‘करण जोहर मला आवडतो असं मी कुठेही म्हटलं नाही. त्याचप्रमाणे करण जोहरचा मला राग येतो असंही मी म्हटलं नाही. मी तर त्याला हाय, हॅलो, थँक्य यू, या संवादाशिवाय ओळखतसुद्धा नाही.

माझं अस्तित्व माझ्या दिसण्यावरुन आहे असा विचार मी अजिबात करत नाही. मीसुद्धा संघर्ष केलाय पण फक्त त्याची मार्केटिंग कधी केली नाही. गेल्या तीन वर्षांपासून मी दर वर्षी किमान चार चित्रपटांत काम केलंय.

नुकतीच माझ्या पाच आगामी चित्रपटांची घोषणा झाली. कोण म्हणतंय की मला काम मिळत नाही? मी कंगनाची साथ देत नाही म्हणून ती आणि तिची बहीण माझ्यावर असले आरोप करतेय. माझ्या आतापर्यंतच्या कोणत्याच चित्रपटांची निर्मिती कंगना म्हणते त्या माफिया गँगने केली नाही.

आगामी चित्रपटसुद्धा त्यांच्यासोबत करत नाहीये. मग माझं अस्तित्व हा घराणेशाहीचा पुरावा कसा असू शकतो? स्वत:च्या स्वार्थासाठी मी एखाद्याच्या मृत्यूचा फायदा उचलू शकत नाही.

या इंडस्ट्रीने मला माझी ओळख आणि पोट भरण्यासाठी खूप काही दिलंय. त्यामुळे या इंडस्ट्रीसोबत मी इतक्या कटू पद्धतीने वागू शकत नाही’, असं ठाम उत्तर तापसीने कंगनाला दिलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.