Gaja Marne : मुळशीच्या छोट्या गावातील तरुण ते कुविख्यात गुन्हेगार

एमपीसी न्यूज : पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे (Gaja Marne) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका शेअर मार्केटिंग व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याच्याविरोधात मोक्का कायद्यानुसार कारवाई केली आहे. रविवारी त्याला सातारा जिल्ह्यातील वाई परिसरातील एका फार्म हाऊसवरून अटक करण्यात आली आहे. तर गुंड गजानन मारणे कुविख्यात कसा बनला त्याचीच ही गोष्ट.

गजा उर्फ महाराज उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे हा मुळशी तालुक्यातील एका छोट्या गावात जन्मलेला तरुण आहे. मुळशीतून काही वर्षांपूर्वी त्याचे कुटुंब पुण्यातील कोथरूड परिसरातील शास्त्रीनगर परिसरात राहण्यासाठी आले. तिथे आल्यानंतर गजा मारणे गुन्हेगारीकडे वळला आणि त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. खून, मारामारी, खंडणी यासारख्या गुन्हातून त्याची गुन्हेगारी जगतात एन्ट्री झाली. यातूनच तो पुढे चालून कुख्यात गुन्हेगार बनला.

गजा मारणे याच्या गुन्हेगारी कारवायाची (Gaja Marne) सुरुवात शास्त्रीनगर पासून सुरू झाली. एकमेकांचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी खून करण्यापर्यंत त्याची मजल गेली. याशिवाय खंडणी ताबेमारी यासारखे गुन्हे देखील त्यांनी सुरूच ठेवले. आपल्या गुंडगिरीच्या माध्यमातून त्याने मुळशी तालुक्यात स्वतःचे बस्तान बसवले. कालांतराने त्याची मारणे टोळीच अस्तित्वात आली. या टोळीचा म्होरक्या होता गजा मारणे. आजवर या टोळीवर 23 होऊन अधिक गुन्हे दाखल आहेत.

एकेकाळी जिवलग मित्र असणारे गजा मारणे आणि निलेश घायवळ एकमेकांचे कट्टर शत्रू बनले. निलेश घायवळ हा गजा मारणे टोळीतील सदस्य होता. मात्र वर्चस्ववादातून त्यांच्यात वाद सुरू झाले. आणि दोघेही एकमेकांच्या जीवावर उठले. गजा मारणेच्या साथीदारांनी निलेश घायवळ याला ठार मारण्यासाठी त्याच्यावर हल्ला देखील घडवून आणला. मात्र, सुदैवाने निलेश घायवळ बचावला. मध्यंतरी हे दोघेही कारागृहात बंद होते.

दरम्यान गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांची एका खून प्रकरणात निर्दोष सुटका झाल्यानंतर तळोजा कारागृहापासून पुणे मुंबई महामार्गावर त्यांनी काढलेली रॅली चर्चेचा विषय ठरली. या घटनेपासून तो सेलिब्रिटी गुंड म्हणून परिचित झाला. तर दुसरीकडे पुणे शहरात पोलीस आयुक्त म्हणून असलेल्या अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्याचा जणू विडाच उचलला होता. या घटनेनंतर गजा मारणे याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. त्यानंतर तो एक वर्ष तुरुंगात होता.

Pune Crime : यु-ट्युबवर व्हिडिओ पाहिला, स्वतःचीच प्रसूती केली अन् बाळाला दिले फेकून

एक वर्षानंतर तुरुंगातून बाहेर पडल्यानंतरही गजा मारणे शांत बसला नाही. वीस कोटीच्या खंडणीसाठी त्याने शहरातील एका शेअर मार्केट व्यावसायिकाचे अपहरण केले होते. या प्रकरणात पुणे पोलिसांनी त्याच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई केली आहे. त्यानंतर फरार झालेल्या गजा मारणे याला अखेर सातारा जिल्ह्यातील वाई येथून अटक करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.