Pune Crime : यु-ट्युबवर व्हिडिओ पाहिला, स्वतःचीच प्रसूती केली अन् बाळाला दिले फेकून

एमपीसी न्यूज : पुणे (Pune Crime) शहरातील कोंढवे धावडे परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका अल्पवयीन मुलीने युट्युब वर व्हिडिओ पाहून स्वतःचीच प्रसुती केली आणि त्यानंतर जन्मलेल्या बाळाला इमारतीवरून खाली फेकून दिले. या संपूर्ण घटनेची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून या घटनेत दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रूपाली चाकणकर यांनी केली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कोंढवे धावडे परिसरातील एका घरात एक सतरा वर्षी अल्पवयीन मुलगी आणि तिची आई असे दोघेजण राहतात.  ते चार महिन्यांपूर्वी हे दोघे मायलेक घराजवळच असणाऱ्या एका खाजगी दवाखान्यात गेले होते. यावेळी तपासल्यानंतर डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असण्याची शक्यता व्यक्त करत सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी आईने व मुलीने डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आणि मुलीच्या गर्भपिशवीला सूज असल्याने तिच्या पोटात दुखत आहे असे शेजारी आणि घरमालकीनीला सांगितले होते.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर, ही आई आणि मुलगी ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणी राहणाऱ्या महिलेने सांगितले की हे दोघेजण काहीतरी लपवत असावेत असा आम्हाला आधीपासूनच संशय होता. त्यानंतर रविवारी सोसायटीच्या आवारात नवजात बाळ आढळून आल्याने सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर चर्चा सुरू असतानाच रात्रीच्या सुमारास एका ॲम्बुलन्समधून सोसायटीतल्या एका मुलीला बेशुद्ध अवस्थेत नेण्यात आले. हा संपूर्ण प्रकार पाहून सोसायटीतील नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली.

इंद्रायणी नदीत आढळलेल्या महिलेचा खून, आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

यानंतर पोलिसांनी या मुलीकडे चौकशी केली असता तिने युट्युबवर व्हिडिओ पाहून स्वतःची प्रस्तुती केली आणि त्यानंतर बाळ फेकून दिल्याची धक्कादायक कबुली दिली. याप्रकरणी उत्तम नगर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आयोगाने देखील या घटनेची गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.