Ganeshutsav 2020 : गणेशोत्सव काळात कोरोनाची संक्रमण साखळी तोडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा- विनायक ढाकणे

नियम पाळणाऱ्या सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा योग्य सन्मान केला जाईल.

एमपीसीन्यूज : कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने आणि शांततेत पार पडण्यासाठी सहकार्य करा. समाजाभिमुख उपक्रम राबवा. नियम पाळणाऱ्या सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा योग्य सन्मान केला जाईल. गणेशोत्सव काळात कोरोनाची संक्रमण साखळी तोडण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करावी, असे आवाहन परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी केले.

तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे आणि शिरगाव पोलीस चौकी यांच्या हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, तळेगावचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, किशोर म्हसवडे, प्रदीप लोंढे, देहूरोड -तळेगाव वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश पवार, उद्योजक किशोर आवारे, माजी नगराध्यक्षा मीरा फल्ले, माया भेगडे, नगरसेवक अरुण माने, रोहित लांघे, नगरसेविका शोभा भेगडे, रुपाली दाभाडे, संगीता कदम, मंदा गायकवाड, संतोष परदेशी यांच्यासह विविध गावचे पोलीस पाटील, महिला दक्षता समिती सदस्य आणि शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी घ्यावयाची काळजी यावर विनायक ढाकणे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

संजय नाईक पाटील म्हणाले, कोरोनाच्या महामारीत प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी. शासकीय नियमाचे पालन करावे गणेशोत्सव काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला जाईल.

यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी मनोगत व्यक्त केले.

यावर्षी विसर्जन मिरणवूक नसल्याने भाविकांच्या सोयीसाठी नगरपरिषदेच्या वतीने ‘मूर्ती दान’ उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी झिंजाड यांनी सांगितले.

अमरनाथ वाघमोडे यांनी प्रास्ताविकात गणेशोत्सव काळात राबविण्यात येणारी आदर्श आचारसंहिता यावर प्रकाशझोत टाकला. सतीश पवार यांनी आभार मानले.

गणेश उत्सवातील मार्गदर्शक सूचना

गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाची पूर्वपरवानगी घ्यावी.

मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारावेत.

साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करावा.

सजावटीत भपकेबाजी नसावी.

श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४फूट तर घरगुती गणपतीसाठी २फूट उंचीची मर्यादा.

पारंपारिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू अथवा संगमरवरी मूर्तीचे पूजन करावे.

शाडू अथवा पर्यावरण पूरक मूर्तीचे विसर्जन घरीच करावे.

सांस्कृतीक कार्यक्रम घेऊ नये.

आरती, भजन, कीर्तन हे धार्मिक विधी करतांना ध्वनी प्रदूषण तसेच गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.

आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नये.

कोविड १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.