Akurdi : तोडफोड प्रकरणी टोळक्यांना शस्त्रासह तासाभरात अटक

निगडी पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – आकुर्डी परिसरातील वाहनांची तोडफोड करत लुटमार करून दहशत पसरविणा-या नऊ जणांच्या टोळक्याला निगडी पोलिसांनी गजाआड केले. चार लोखंडी कोयते, दगड, दांडकी, तीन दुचाकी असा दोन लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. 

विशाल उर्फ आप्पा नंदकुमार ठाकूर (वय 33, रा. आकुर्डी),  ओंकार उर्फ मोन्या लालासाहेब काटे (वय 19, रा. बिजलीनगर, चिंचवड), राजरत्न उर्फ सोन्या बाबासाहेब सोनटक्के (वय 19, रा. विठ्ठलनगर, पिंपरी), ऋतिक उर्फ सोन्या रविंद्र रुपटक्के (वय 19, रा. आकुर्डी), प्रणव उर्फ पण्या सुरेश कांबळे (वय 19, रा. गुरुदेवनगर, आकुर्डी), आमन शंकर पुजारी (वय 21, रा. आकुर्डी), हर्षल उर्फ मन्या संजय लोहार (वय 22, रा. स्वप्ननगर, तळेगावदाभाडे),  शुभम मोहन सोनवणे (वय 19, रा. कर्जत, रायगड) आणि प्रज्वल संतोष मोरे (वय 20, रा. मोरेवाडी. ता. जावली. सातारा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींनी रुपेश श्रीराम काळभोर (वय 36, रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी) यांचे घड्याळ आणि पाकीट बळजबरीने  हिसकावून घेतले. त्यांच्या गाडीची काच फोडली. तसेच सिद्धांत अशोक उस्थवान (वय 28, रा. हडपसर) याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करुन जखमी केले.

रुपेश काळभोर शुक्रवारी मध्यरात्री विठ्ठलवाडी, आकुर्डी येथे चारचाकी वाहन पार्क करत होते. त्यावेळी त्यांची तोंड ओळख असलेला आरोपी आमन पुजारी आणि त्याच्यासोबत आठ ते दहा जण हातामध्ये कोयते, लाकडी दांडके घेऊन तिथे आले. या टोळक्याने रुपेश यांना लाकडी दांडक्याच्या दाखल दाखवून त्यांच्या हातातील घड्याळ आणि पाकीट हिसकावून घेतले. तसेच त्यांच्या नवीन स्वीफ्ट कारची काच फोडली. त्याचबरोबर आजुबाजूच्या 15 ते 20 वाहनांच्या काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. तर,  सिद्धांत उस्थवान याला लाकडी दांडक्याने डोक्यात मारुन जखमी केले.

निगडी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्याच्यांकडे दाखल गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चार लोखंडी कोयते, दगड, दांडकी, तीन दुचाकी असा दोन लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. निगडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.