Pimpri: ‘मी कोणाला पैसे कमवून दिले, त्याचे पुरावे द्या’; आयुक्तांचे विरोधकांना खुले आव्हान 

एमपीसी न्यूज – मी नियमाप्रमाणेच काम करत आहे. कोणालाही पैसे कमवून देत नाही. मी कोणाला पैसे कमवून दिले असतील तर विरोधकांनी त्याचे पुरावे द्यावेत, असे खुले आव्हान महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आज (सोमवारी)विरोधकांना दिले आहे.

वाकड परिसरात पाण्याची मोठी टंचाई आहे. विस्कळीत पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठ्यामध्ये कोणत्याही सुधारणा केल्या जात नाहीत. असे असताना महापालिकेने अचानक नवीन बांधकामांना पाणीपुरवठ्याची ना हारकत प्रमाणपत्र(एनओसी)देण्यास सुरुवात केली होती. पाणीपुरवठ्यात सुधारणा झाली नसताना एनओसी देण्यास का सुरुवात केली? तसेच परवानगी  का बंद केली होती? याचे उत्तर प्रशासनाला देता येत नसून महापालिका आयुक्त ‘एनओसी’ देण्याचे चालू बंद करुन सत्ताधा-यांना ‘इलेक्शन’ फंड जमा करुन देत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी केला होता. तसेच आयुक्त कोणाच्या सांगण्यावरुन असे निर्णय घेत आहेत, असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला.

या आरोपांबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना आज पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, वाकड परिसरात पाणी टंचाई असल्यानेच व्यावसायिक बांधकामांना पाणीपुरवठ्याचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्याचे बंद केले होते. कार्यकारी अभियंत्याने स्वत:च्या अधिकारात एनओसी देण्यास सुरुवात केली होती. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांच्याकडून खुलासा मागविला आहे. खुलासा आल्यानंतर योग्य ती कारवाई केले जाईल. तसेच आपण कोणालाही पैसे कमवून देण्यासारखे काम करत नाही. मी कोणाला पैसे कमवून दिले आहेत. त्याचे विरोधकांनी पुरावे द्यावेत, असे खुले आव्हानच त्यांनी विरोधकांना दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.