Pune News :  ‘पत्र घ्या पत्र….’, पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पोलिसांकडून ‘जागतिक पोस्टमन दिन’ साजरा

एमपीसी न्यूज : 9 ऑक्टोम्बर हा दिवस ‘जागतिक पोस्टमन दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून सिंहगड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस अधिकारी देविदास घेवारे आणि इतर कर्मचाऱ्यांनी  हिंगणे खुर्द येथील पोस्ट ऑफिसला भेट दिली. पोस्टातील प्रत्येक अधिकारी व पोस्टमन यांना गुलाबाचे फुल आणि कॅडबरी देऊन त्यांचा सत्कार करून त्यांनी  समाजाप्रती केलेल्या कार्याचा बहुमान केला.

सिंहगड पोलिसांनी राबवलेल्या या उपक्रमाद्वारे पोस्टमन इंदुलकर यांना पोलीस स्टेशन येथे गार्डन एरियात बोलावून त्यांना मिठाईचा बॉक्स देऊन त्यांचा गौरव केला. मिठाईचा बॉक्स देताना “डाकिया डाक लाया, खुशी का संदेश लाया” हे राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेले डाकिया चित्रपटातील गाणे दोन वेळेस वाजवून त्यांचे मनोबल वाढवले.

या प्रसंगी बोलताना देविदास घेवारे म्हणाले, पूर्वीच्या काळात दूरवर राहणारा नातेवाईक असो किंवा एखादी महत्वाची माहिती मिळविणे असो पोस्टमन शिवाय ती माहिती आपणास मिळत नसे. त्यासाठी प्रत्येक व्यक्ती चातकासारखी पोस्टमनची वाट पहात असे. परंतु आजच्या व्हाट्सअप आणि इमेल च्या जमान्यात पोस्टमन समाजातून दुर्लक्षित झालेला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करावा या उद्देशाने सिंहगड पोलीस स्टेशनच्यावतीने आज जागतिक पोस्टमन दिवसाचे औचित्य साधून आमच्या भागातील हिंगणे पोस्ट ऑफिस मधील सर्व स्टाफचा सत्कार आणि प्रातिनिधिक स्वरूपात आजही प्रत्येक नागरिकांचे पत्र त्याच्या घरी पोहचविण्यासाठी दिवसभर ऊन पावसाची तमा न बाळगता स्वतः सायकल वर फिरून फ्लॅट संस्कृती मध्ये पत्र पोहचवणारे श्री इंदुलकर यांना मिठाईचा बॉक्स देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला आहे.

जागतिक पोस्ट दिनाची आठवण ठेवून पोलीस दलाकडून पोस्ट विभागाचा अशा अनोख्या पद्धतीने झालेला सन्मान पाहून सर्व पोस्ट विभागातील अधिकारी व पोस्टमन भारावरून गेले. त्यांनी या सुखद अनुभवाबद्दल पोलीस दलाचे आभार मानले. तसेच या प्रसंगी पोस्टात आपल्या कामा निमित्त आलेल्या ग्राहकांनी सुद्धा पोलीस दलाने राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.