Pimpri News : विविध धार्मिक कार्यक्रमाद्वारे शहरात गुरूनानक जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले धर्मगुरू गुरूनानक यांची जयंती आज (शुक्रवारी, दि.19) विविध धार्मिक कार्यक्रमातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहरातील सर्व गुरूद्वारे हार-फुलांनी सजवण्यात आले होते. सकाळपासूनच शहरातील गुरूद्वारांमध्ये शिख व सिंधी बांधवांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

पिंपरी येथील साई चौकातील श्री गुरूनानक गुरूद्वारासह येथील नऊ गुरूद्वारा व वाल्हेकरवाडी येथील श्री वाहेगुरू गुरूनानक मानसरोवर आश्रम गुरूद्वारांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली होती. हार, फुल, धूप व अगरबत्तींचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. गुरूवारी (दि. 18) मध्यरात्री पासून गुरूद्वारांमध्ये भजन, किर्तनाला सुरूवात झाली होती. रात्री दीड नंतर गुरूनानक जन्म सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी गुरू ग्रंथ साहिबचे पठण करण्यात आले.

आज पहाटे पाच वाजल्यापासून गुरूद्वारांमध्ये गुरूनानक किर्तन व भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सर्व अबालवृध्दांनी नवनवीन कपडे परिधान केले होते.तसेच ‘वाहेगुरू वाहेगुरू’ अशा प्रार्थनेने सर्वांनी लंगर भोजनाचा आनंद घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.