Hadapsar Crime News : तीन महिलांसह 6 जणांची टोळी गजाआड, 22 लाखाचा गांजा जप्त

एमपीसीन्यूज : अंमली पदार्थ विरोधी पथकाने हडपसर परिसरातून सहा जणांच्या टोळीला जेरबंद केले आहे. या टोळीकडून पोलिसांनी 21 लाख 60 हजार रुपये किमतीचा 68 किलो गांजा जप्त केला आहे.

दीपक भीमराव हिवाळे (वय 23), आकाश सुनील भालेराव (वय 27), आदित्य दत्तात्रय धांडे (वय 19), हिराबाई संतोष जाधव (वय 40), सरूबाई रतन पवार (वय 65) आणि पार्वती सुरेश माने (वय 57) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण जालना येथील रहिवासी आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हडपसर परिसरातील श्रीनाथ वॉशिंग सेंटर समोर सार्वजनिक रस्त्यावर एक चारचाकी गाडी संशयास्पदरीत्या उभी होती. या परिसरात गस्त घालणाऱ्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर त्यांनी गाडीत बसलेल्या तीन पुरुष आणि तीन महिलांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर पोलिसांचा संशय अधिकच बळावला.

पोलिसांनी त्यांच्या चार चाकी गाडीची झडती घेतली असता कारमधील सीटच्या खाली दोन आणि मागच्या सीटच्या खाली दोन अशा एकूण चार पोत्यांमध्ये गांजा आढळला. त्यानंतर पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यांनी विक्रीसाठी हा गांजा आणल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्‍मण बराटे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, उपनिरीक्षक अमोल गवळी, पोलीस कर्मचारी संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, चेतन गायकवाड, संतोष जाचक, संदीप शेळके, साहिल शेख, अजीम शेख, महेश साळुंखे, नितीन जगदाळे, दिनेश बास्तेवाड, दिशा खेवलकर, कल्याणी आगलावे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.