Pune News: ‘आत्मनिर्भर दिव्यांग प्रकल्पांतर्गत’ महाराष्ट्रातील 1 हजार दिव्यांगांना मदतीचा हात

एमपीसी न्यूज : महा एनजीओ फेडरेशनच्या पुढाकाराने व क्लिन सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी प्रा. लि यांच्या सहयोगाने महाराष्ट्रातील 1 हजार पेक्षा अधिक दिव्यांग बांधवांना त्यांचे आयुष्य सुखकर करणाऱ्या साहित्यांचे वितरण करण्यात आले. यामध्ये तीन चाकी प्रवास वाहन व वस्तू विक्री वाहन, व्हील चेअर, अंधांना काठी व अस्थी व्यंगांना बूट अशा साहित्याचे वितरण करण्यात आले. दिव्यांगांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल व्हावी, यादृष्टीने हा प्रयत्न आहे.

पुण्यामध्ये महा एनजीओ फेडरेशनचे मुख्य कार्यालय असले, तरी महाराष्ट्राच्या विविध भागात सामाजिक कार्य सुरु आहे. दौंड येथे आयोजित या कार्यक्रमाला क्लिन सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी प्रा. लि. चे प्रतिनिधी सुहास अहिरराव, महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, दौंड विधानसभा क्षेत्राचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश अप्पा थोरात, दिव्यांग संघटनचे प्रमुख बाळसाहेब नारनवर, माहिती अधिकार कार्यकर्ते प्रकाश लाड, महा एनजीओ फेडरेशन कार्यकारी संचालक ह.भ.प. अक्षयमहाराज भोसले, मुकुंद शिंदे, गणेशदत्त बाकले, अमोल उंबरजे, पाटस ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच आदि सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

शेखर मुंदडा म्हणाले, दिव्यांगांच्या पाठीशी उभे राहत त्यांच्या रोजच्या जीवननात गरजेच्या असणाऱ्या वस्तू त्यांना उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महा एनजीओ फेडरेशनने या प्रकल्पाचे आयोजन केले आहे. या प्रकल्पासाठी कृष्णकुमार बूब यांनी क्लीन सायन्सच्या माध्यमातून दिलेले पाठबळ मोठे आहे.

ह.भ.प.अक्षयमहाराज भोसले म्हणाले, नैतिकता आणि समान वागणुकीचे भान जर आपल्याला आले, तर सर्वांना अपंग व्यक्तीं प्रतीच्या कर्तव्याची जाणीव होईल. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. या समाजात सर्व प्रकारच्या व्यक्ती एकत्र राहतात. त्यामध्ये जर आनुवांशिकतेने किंवा अपघाताने कोणालाही अपंगत्व आले असेल तर नातेवाईकांनी आणि शेजारील लोकांनी मोठ्या मनाने त्याचा स्वीकार करणे गरजेचे आहे. समाजसेवी संस्थाना दिव्यांगांप्रती आपुलकीची भावना ठेऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम केले पाहिजे.

महाराष्ट्रातील 1 हजार दिव्यांग बांधवांना त्यांच्या गरजेनुसार इलेक्ट्रिक तीन चाकी सायकल, अंधासाठी काठी (व्हाईट केन), व्हील चेअर व ऑर्थोपेडीक बूट या साहित्याचे वितरण करण्यात आले. यामध्ये बहुसंख्य दिव्यांग दौंड तालुक्यातील होते. उपस्थित दिव्यांगाना रोजच्या उपयोगातील साहित्यांचे वाटप करण्यात आले. इलेक्ट्रिक तीन चाकी सायकलच्या मदतीने दिव्यांग बांधव आपला स्वतःचा रोजगार करून आत्मनिर्भर होतील. त्यांना स्वयंपूर्णतेकडे नेण्यासाठी आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत हा विश्वास या कार्यक्रमातून उपस्थित दिव्यांग बांधवांना देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.