Hinajwadi : शॉक लागून तीन कामगारांच्या मृत्यू प्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – शॉक लागून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी दोन जणांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 30) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हिंजवडी फेज तीन येथील भोईरवाडी, जय गणेश कॉलनी येथ घडली.

सुधाकर विठ्ठल तळवार आणि देवेंद्र प्रकाश बाबर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संगीता राजू परांडेकर (वय 20, रा. शिवाजी नगर, बिजलीनगर, चिंचवड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजू शिवकुमार पारंडेकर (वय 25), सागर शिवकुमार पारंडेकर (वय 20), सागर आयप्पा माशाळकर (वय 20) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. सुधाकर तलवारे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी फेज तीन येथे गणेशनगर ते भोईरवाडी या दरम्यानच्या रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ खांबांवर दिवे लावण्याचे काम सुरु आहे. फिर्यादी संगीता यांचे पती राजू, त्यांचा भाऊ सागर आणि मित्र सागर माशाळकर हे तिघेजण एका ठेकेदाराकडे हे दिवे लावण्याचे काम करत होते. शिडीच्या साहाय्याने कामगार खांबांवर दिवे लावत होते. दुपारी साडेपाचच्या सुमारास कामगारांची दिवे लावण्याची शिडी एका विद्युत प्रवाह सुरु असलेल्या तारांना चिकटली.

तारांचा विद्युतप्रवाह शिडीमध्ये उतरला आणि शॉक लागून तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर एक कामगार गंभीर जखमी झाला. आरोपींनी इलेक्ट्रिक कामाच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी न घेतल्याने कामगारांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.