Pimpri : पॉलिटिकल फ्लॅशबॅक 2019

(गणेश यादव)

एमपीसी न्यूज – सन 2019 या वर्षाला आपण आज निरोप देणार असून नवीन 2020 या वर्षाचे स्वागत करणार आहोत. नवीन वर्षात पदार्पण करीत असताना सरत्या वर्षात पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय पक्षांमध्ये काय घडलंय, बिघडलंय याच्यावर एक फ्लॅशबॅक…….

सरत्या वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये शिवसेनेचा एक आणि राष्ट्रवादीचा एक खासदार झाला आहे. भाजपची ताकद वाढत शहरात दोन आमदार झाले आहेत. तर, काँग्रेस, मनसे या पक्षांनी विविध प्रश्नांवर आंदोलने करत आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवले आहे.

मावळते वर्ष भाजपसाठी ‘थोडी खुशी थोडा गम’!

पिंपरी-चिंचवड शहर भाजपसाठी सरते वर्ष ‘थोडी खुशी थोडा गम’ असेच गेले म्हणावे लागेल. कारण, भाजपचा शहरातून एक अधिकचा आमदार निवडून आला आहे. कमळाच्या चिन्हावर लक्ष्मण जगताप पुन्हा आणि महेश लांडगे पहिल्यांदा असे दोघे निवडून आले आहेत. परंतु, दुसरीकडे राज्यातील भाजपची सत्ता गेली आहे. त्यामुळे शहराला मिळालेली राज्यमंत्री दर्जाची तीनही पदे गेली आहेत.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे सदाशिव खाडे यांचे अध्यक्षपद, राज्य लेखा समितीचे अॅड. सचिन पटवर्धन यांचे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अमित गोरखे यांचे अध्यक्षपद गेले आहे. तीनही राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेली पदे गेली आहेत. त्यामुळे राज्यातील सत्ता गेल्याचा शहर भाजपला मोठा फटका बसला आहे. तसेच ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी देखील पक्षाची साथ सोडली आहे. त्यामुळे महापालिकेची आगामी निवडणूक भाजपसाठी खडतर असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेससाठी लाभदायक ठरले मावळते वर्ष

राष्ट्रवादी काँग्रेससाठी सरते वर्ष लाभदायक ठरले आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे खासदार म्हणून निवडून आले आहेत. तर, पिंपरीतून अण्णा बनसोडे देखील आमदार म्हणून निवडून आले आहेत. राज्यातील सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस आहे. नेते अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. राज्यात सत्ता आल्याने शहरातील पदाधिका-यांनी महामंडळ मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. तसेच महापालिकेची आगामी निवडणूक वॉर्ड पद्धतीने होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.

शिवसेनेचे नुकसान

मागील वर्षात शहर शिवसेनेचे सर्वाधिक राजकीय नुकसान झाले आहे. मावळ मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे निवडून आले ही एकाच जमेची बाजू आहे. शिरुरमधून शिवाजीराव आढळराव यांचा पराभव झाला. तर, विधानसभेला पिंपरीतून गौतम चाबुकस्वार यांचा आणि चिंचवडमधून बंडखोरी करत निवडणूक लढविलेले महापालिका गटनेते राहुल कलाटे यांचा देखील पराभव झाला आहे. पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. दरम्यान, राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिका-यांना महामंडळ मिळण्याची आशा आहे.

काँग्रेस, मनसे यांनी राजकीय अस्तित्व टिकवून ठेवले

महापालिकेत एकही नगरसेवक नसलेल्या शहर काँग्रेसने विविध प्रश्नांवर आंदोलन करुन आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवले आहे. केंद्र आणि तत्कालीन राज्य सरकारच्या विरोधात आंदोलने केली आहेत. आता राज्यातील सत्तेत काँग्रेस सहभागी आहे. त्यामुळे आगामी काळात शहर काँग्रेसला अच्छे दिन येण्याची अपेक्षा आहे. तर, मनसे आपले अस्तित्व टिकवून आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मनसेने राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.