Hinjawadi : पेट्रोल भरण्याच्या निमित्ताने गेलेला कारचालक दीड लाखांचा ऐवज घेऊन पसार

एमपीसी न्यूज – समोर पोलीस असल्याचे कारण सांगत कार चालकाने दोन प्रवाशांना कारमधून उतरवले. त्यानंतर चालकाने समोरच्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून येण्याचे कारण सांगत प्रवाशांनी कारमध्ये ठेवलेला दीड लाखांचा ऐवज घेऊन धूम ठोकली. ही घटना शनिवारी (दि. 9) सकाळी आठच्या सुमारास बेंगलोर-मुंबई महामार्गावर वाकड ब्रिज येथे घडली.

सजरूनिसा हाफिजउल्ला खान (वय 65, रा. आंबेठाण, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अब्दुल्ला (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याची विराधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी आठच्या सुमारास फिर्यादी खान मुंबई-बेंगलोर महामार्गावरून मुंबईकडे एम एच 46 / पी 7271 या कारमधून जात होत्या. वाकड ब्रिजजवळ कार आली असता आरोपी चालकाने खान यांना आणि त्यांच्या सहप्रवाशाला खाली उतरवले. ‘पुढे पोलीस आहेत. मी बाजूच्या पेट्रोल पंपावरून डिझेल भरून येतो’ असे सांगून चालक कार घेऊन निघून गेला.

त्यावेळी खान यांचे कारमध्ये सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, कपडे, कागदपत्रे असा एकूण 1 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज होता. आरोपी कार चालक डिझेल भरण्यासाठी गेला तो परत आलाच नाही. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.