Hinjawadi : जमिनीच्या वाटणीवरून चौघांना मारहाण; पाच जणांना अटक

Hinjawadi: Four beaten up over land dispute; Five arrested

एमपीसी न्यूज – अडीच एकर शेती वाटण्याच्या कारणावरून 13 जणांनी मिळून चार जणांना मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 17) सकाळी साखरेवस्ती, हिंजवडी येथे घडली. हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणातील पाच जणांना अटक केली आहे.

अशोक पांडुरंग साखरे (वय 50), अमित अशोक साखरे (वय 31), संभाजी पांडुरंग साखरे (वय 42), सोमनाथ बाबुराव साखरे (वय 37), शिवाजी बाबुराव साखरे (वय 36, सर्व रा. साखरेवस्ती हिंजवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यांच्यासह अंजनाबाई साखरे, अश्विनी साखरे, वैष्णवी साखरे, अलका साखरे, अनिता विठ्ठल साखरे, समिंद्रा साखरे, अनिता शिवाजी साखरे, बाबुराव साखरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राजेंद्र ज्ञानोबा साखरे (वय 39) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास आरोपी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या घराचे लोखंडी गेट तोडून घरात आले. आरोपींनी लाठ्या, लोखंडी रॉड, ब्लॉक यांच्या सहाय्याने तसेच हातापायाने फिर्यादी, त्यांचे चुलते तुकाराम साखरे, गणेश साखरे आणि फिर्यादी यांची पत्नी महानंदा साखरे या चौघांना मारहाण केली. तसेच आरोपींनी फिर्यादी यांच्यासह चौघांना सार्वजनिक रस्त्यावरून जाण्यास मज्जाव केला.

फिर्यादी राजेंद्र आणि त्यांचे चुलते तुकाराम यांना त्यांच्या वाट्याला असलेल्या अडीच एकर शेतीच्या वाटणीवरून आरोपींनी मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.