Hinjwadi: वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शरद पवार यांचा पुढाकार; मुख्यमंत्र्यांसोबत घेणार बैठक

एमपीसी न्यूज – हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. आयटीपार्क येथे होणा-या वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, पीएमआरडीए, एमआयडीसी, पोलीस, दोन्ही पालिकेचे आयुक्त, आयटी पार्कचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक यांच्यासोबत पुढील आठवड्यात शरद पवार संयुक्त बैठक घेणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी दिली.

हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत नगरसेवक कलाटे यांनी शिष्टमंडळासह शरद पवार यांची भेट घेतली. हिंजवडीत होणा-या वाहतूक कोंडीची सद्यस्थिती सांगितली. तसेच दीर्घकालीन तोडगा काढण्याबाबत निवेदन दिले. त्यावर पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अधिकारी, पदाधिका-यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले. शिष्टमंडळात हिंजवडीचे माजी सरपंच सागर साखरे, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत जाधव होते.

हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हिंजवडीत प्रचंड वाहतूक कोंडी होत असून वाहनांच्या लांबचलांब रांगा लागत आहेत. यामुळे वाहतूक समस्या गंभीर झाली आहे. आयटीयन्सना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मयूर कलाटे म्हणाले, ” हिंजवडी आयटी पार्कची स्थापन पवार साहेबांनी केली आहे. त्यांच्यामुळे हिंजवडी गावाचे नाव जगाच्या नकाशावर उमटले आहे. त्यांना हिंजवडीतील वाहतूक कोंडीची सद्यस्थिती सविस्तर सांगितली. त्यानंतर पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पीएमआरडीए, एमआयडीसी, पोलीस, दोन्ही पालिकेचे आयुक्त, आयटी पार्कचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक यांच्यासोबत पुढील आठवड्यात संयुक्ती बैठक घेण्यात येईल, असे पवार साहेबांनी सांगितले. तसेच यामध्ये शरद पवार संयुक्त बैठक घेणार आहेत. आयटीपार्क येथे होणा-या वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन प्रभावी तोडगा काढण्यासाठी या बैठकीत उपाय काढण्यात येईल”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.