वार्षिक राशी भविष्य 2019-20

(ज्योतिष भास्कर उमेश स्वामी) 

हिंदू ज्योतिष पद्धती ही हिंदूची प्राचीन काळापासून ग्रह नक्षत्र च्या स्थितीवर असणारे शास्त्र आहे. ज्योतिष या शब्दाचा स्त्रोत हा मुळ संस्कृत शब्द असून ज्योती म्हणजे प्रकाश देणारी वस्तु. माणसाच्या जन्मवेळीच आकाशातील ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी आकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचा संयुक्त परिणाम माणसाच्या जीवनावर होत असतात असे मानून त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे फलज्येतिष शास्त्र होय. ज्योतिष शास्त्रात एकूण बारा राशी आहेत. एकंदरीत राशीनुसार त्या व्यक्तीची आवड-निवड, स्वभाव वेगवेगळा असू शकतो. तर एकंदरीत या वर्षी ग्रहगोचरनुसार प्रत्येक राशीला चालू वर्ष कसे राहील, ते पाहू.

मेष रास – सर्वच क्षेत्रात नेत्रदिपक यश मिळेल.

राशीचक्रातील मेष रास ही पहिली रास असून साहसी, आत्मविश्वासू, पुरूषस्वभावी, हिंडण्या-फिरण्याची आवड सदैव गतिमान, सतत उत्साही, स्वभावात व बोलण्यात आक्रमकपणा, स्पष्टवक्तेपणा, हट्टीपणा, लवकर राग येण्याची वृत्ती पण तितक्याच लवकर शांत होतात. या राशीचे चिन्ह मेंढा असून या राशीत जन्मलेल्या व्यक्ती अत्यंत चपळ, कामाचा उरक लवकर असतो. आपल्या स्वभावात ऊर्जा, क्रियाशिलता, स्पष्टवक्तेपणा, अष्टपैलूपणा हे गुण प्रकाशाने जाणवतात. अशा व्यक्ती कुटूंबातील प्रिय व्यक्ती, मित्र, हितचिंतक. यांच्याजवळ आपली भावना व्यक्त करताना नेहमी काळजी घ्यावी. हे उत्तम प्रशासक होऊ शकतात तर कोणतेही परिस्थितीत  जिद्द ठेवून राहणारी शुर, महत्वाकांक्षी राशीचे चालू वर्ष पाहू.

आपल्या राशीच्या भाग्यातून गुरूचे भ्रमण होत असून भाग्याला झळाळी मिळण्याचे काम होईल. तिर्थयात्रा, दूरवरचे प्रवास, प्रसिद्धी, घरामध्ये मंगलकार्य होईल. लेखक असणाऱ्या व्यक्तींना आपल्या लिखाणाची प्रसिद्धी होऊन पुरस्कार मिळतील. विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी परदेशगमन होण्याचे संकेत दर्शवितात. शारीरिक व मानसिक क्षमता यामध्ये प्रबलता वाढेल. आयुष्याचा सुखद अनुभव घ्याल. धार्मिक कार्य हातून होईल. नातेवाईक भाऊ-बहिणीचे संबंध दृढ होतील. गुरू-हर्षल नवपंचम योगामुळे अचानक उत्पन्न वाढेल. शेअर्स व्यवसायासारख्या क्षेत्रातून उत्पन्न वाढेल. प्रेम, विवाह इच्छुकांचे विवाह संपन्न होतील. संतती सौख्य उत्तम मिळून त्यांचा नावलौकिक होईल. कलाकार, पत्रकार, दळणवळण क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्ती, साहित्यिक यांना हे गुरूचे भ्रमण मोठे यश व प्रसिद्धी मिळवून देईल. राशीच्या दशम स्थानातून होणारे शनिचे भ्रमण होत असून शश नावाचा राजयोग होत असून आपल्या कामाचा व्याप वाढेल. उद्योगधंद्यामध्ये स्थैर्य प्राप्त होईल. नोकरीमध्ये प्रमोशन बढती होईल. राजकारणामध्ये मोठे यश मिळून मोठया पदावरती नियुक्ती होईल. सामाजिक क्षेत्रात मानाचे पद मिळेल. घरातील ज्येष्ठ व्यक्ती, आई, आजी यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कोर्ट-कचेरी, कर्ज यांची कामे सहज होतील. जुनी येणी वसूल होतील. मात्र शेतीविषयक कामे, जमीन जुमला या विषयासारखी कामामध्ये शारीरिक, मानसिक त्रास होईल. राशीच्या तृतीय व भाग्यातून राहू-केतूचे भ्रमण होत असून कर्तृत्व सिद्ध करण्याचा काळ राहील धाडसी निर्णय यशस्वी होतील. धार्मिक व गुढ शास्त्रामध्ये रूची वाढेल. आपले या काळात नावलौकिक वाढेल. आपले तर्क-वितर्क अचूक ठरतील. हर्षलचे आपल्या राशीतून भ्रमण, नेपच्यूनचे लाभातून भ्रमण, भाग्यातून प्लुटोचे भ्रमण होत असून स्वभावामध्ये लहरीपणा वाढला तरी हाती घेतलेल्या कामातून यश मिळेल. जुने दुखणे यांपासून त्रास दर्शवितो. सामाजिक, राजकिय जीवनात मोठे यश मिळून कर्तृत्व सिद्ध कराल. एकंदरीत या वर्षी नशिबाची साथ उत्तम राहून प्रगती व नावलौकिक होईल असे दर्शविते.

उपासना –

आपण ‘गणपती’ उपासना, मारूती उपासना केल्यास अनुकूल राहिल. त्याचबरोबर केतु शांती, कवच पौर्णिमा व्रत, श्रीदत्त अभिषेक केल्यास उत्तम राहिल.

शुभरंग –

लालसर गुलाबी, पिवळा, डाळिंबी रंगाचा वापर केल्यास उत्तम राहिल.

भाग्यरत्न –

पिवळ्या रंगाचा पुष्कराज धारण केल्यास उत्तम राहिल.

शुभदिनांक –

कोणत्याही महिन्याचा ९, ०८, २७

शुभकारक वर्षे –

१२, १५, २१, ३०, ४८, ५७, ६२, ६९

०००

वृषभ रास – नवीन यशस्वी कालखंड

ही राशी चक्रातील द्वितीय राशी असून स्त्री स्वभावी पृथ्वी तत्वाची स्थिर प्रवृत्तीची रास आहे. सौंदर्य, तेजस्वी, दिर्घ उद्योगी, बोलण्यात लाघवीपणा, जबरदस्त आशावादी, जगातील सर्व सुखसोयींची लालसा बाळगणारी, हुशार असा स्वभाव असतो. वृषभ राशीच्या स्त्रिया खुप सुंदर व हुशार असतात. या राशीच्या व्यक्तींना नवनवीन कपडे, शोभीवंत वस्तु, घर, वाहन यांची मनापासून आवड असते. रसिकता हा मुख्य गुण आपल्यात जाणवतो. आळसी कमीतकमी श्रमात जास्त मोबदला घेण्याची स्थायी वृत्ती या राशीच्या व्यक्तींमध्ये असते. विशेष करून मधुर बोलण्याची व चतुराईने इतर व्यक्तींवर छाप पाडून आपले काम करून घेण्यात या व्यक्ती पटाईत असतात. कुठल्याही समस्येवर उपाय या व्यक्ती चांगल्याप्रमारे शोधु शकतात. तर हुशार व कुशल, लाघवी स्वभावाच्या वृषभ राशीचे चालू वर्ष कसे जाईल ते पाहू.

राशीच्या अष्टमातून गुरूचे भ्रमण होत असून आर्थिक स्थितीमध्ये चांगला बदल होईल. अनपेक्षित उत्पन्न वाढेल, स्थावर प्रॉपर्टी, वडिलार्जित धन, कौटुंबिक संपत्तीचे लाभ होईल. कुटूंबामध्ये सुखद घटना होतील. आपल्या आरोग्याविषयीच्या तक्रारी दुर होतील. मोठे प्रवास होतील, घर, प्रॉपर्टी खरेदी होण्याचे योग आहेत. घरात धार्मिक कार्य होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षेमध्ये विशेष परिश्रम घेऊन यश मिळवावे लागेल. ज्येष्ठ व्यक्तींना व्यवसायात कष्ट व दगदग वाढेल. राशीच्या भाग्यातून शनिचे भ्रमण जानेवारी २०२० पासून होणार असून चालू असलेल्या अडचणीतून मार्ग मिळण्यास प्रारंभ होईल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. आर्थिक ताळमेळ यांची सांगड घालण्यात यशस्वी व्हाल. नोकरीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना रखडलेली प्रमोशन बदल, बदली होईल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना महत्वाचे व प्रसिद्धी मुख्य पद मिळेल. नेतृत्व करण्याची संधी प्राप्त होईल. कोर्ट-कचेरी, वाद-विवाद यामध्ये आपली सरशी होईल. मात्र मित्रमैत्रिणी लहान भावंडे, नातेवाईक यांच्यामध्ये गैरसमज होणार नाही याची दक्षता घ्या. महत्वाचे पत्रव्यवहार करताना सर्व कागदपत्रे तपासूनच सही अथवा दस्तावेज केल्यास उत्तम राहिल. राशीच्या धन स्थानातून व अष्टम स्थानातून राहू-केतूचे भ्रमण होत असून पुर्वाजित इस्टेट पासून लाभ मिळतील. मात्र कौटुंबिक खर्च यांचे प्रमाण आपोआपच वाढत राहिल. कुटुंबातील व्यक्तींशी विचार जुळतीलच असे नाही. ज्यांची वये ३६ ते ४२ या वर्षामधली आहेत त्यांना नशिबाची साथ उत्तम मिळेल. चैनीचे जीवन जगता येईल. अष्टमात गुरू केतु युती असल्यामुळे शास्त्रज्ञ व शोध-संशोधन करणाऱ्या व्यक्तींना वैभवशाली हे वर्ष राहिलृ त्याचबरोबर मोठे निर्णय घेताना ज्येष्ठांचे व तज्ञांचे मार्गदर्शन घेतल्यास उत्तम राहिल. राशीच्या व्ययस्थानात हर्षल, दशमात नेपच्यून व अष्टमात प्लुटोचे भ्रमण होत असून मोठया लोकांकडून फसवणूक अथवा अपमानाचे प्रसंग उद्भवतील सामाजिक कार्यात बदनामीचे प्रसंग अथवा विरोध यांचा सामना करावा लागेल.

उपासना –

आपण महालक्ष्मी उपासना केल्यास उत्तम राहिल त्याचबरोबर गाईला मसुर डाळ व देवी मंदिरात केळी दिल्यास आत्मिक बल वाढेल.

शुभरंग –

हिरवा, पांढरा

भाग्यरत्न –

निलम व डायमंड या रत्नाचा वापर केल्यास भाग्याची साथ मिळेल.

शुभदिनांक –

कोणत्याही महिन्याच्या ६, १५, २४

भाग्यकारक वयोवर्ष –

१७, २८, ३५, ४४, ५३

०००

मिथुन रास – उद्योग-व्यवसायात वाढ होईल.

राशीचक्रातील ही तिसरी रास असून, वायु तत्वाची द्विस्वभावी, उत्तम स्मरणशक्ती असणारी, बौद्धिक कामे बुद्धी चातुर्याने करणारी, संगीत कलाक्षेत्र यामध्ये विशेष आवड असणारी, सतत प्रवासाची आवड असणारी, विचारांची देवाणघेवाण करताना हसत हसत कामे करून घेणारी, कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेणारी, बोलणे, कधी-कधी थापेबाजपणा, हजरजबाबी, परखड, लहरी, बडबडी अशा स्वभावाच्या व्यक्ती असू शकतात. हस्तकला, चित्र, फोटो, पेंटींग यांची आवड असणारी, साधु-संत यांचा आदर करणारे, सेवा वृत्ती असणारी संधी साधु धुत्र-चाणाक्ष, आपले विचार प्रकट करताना हातवारे करण्याची सवय असणारी तर अशा तीक्ष्ण बुद्धी व रसिक स्वभावाची असणाऱ्या व्यक्तीचे चालु वर्ष कसे जाईल ते पाहू.

राशीच्या सप्तम स्थानातून गुरूचे भ्रमण होत असून नववर्षात विवाह इच्छुकांचे विवाह पार पाडतील. वैवाहिक सौख्यात शुभघटना घडतील. नोकरीमध्ये बढती प्रमोशन होईल घरामध्ये फर्निचर, रंगरंगोटी, रीन्युएशन यांसारखी कामे पार पडतील. सामाजिक क्षेत्रात महत्वाचे पद मिळेलृ नोकरीमध्ये वरीष्ठांचे सहकार्य प्राप्त होऊन आपल्या मताला प्राधान्य मिळेल. धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना हे वर्ष मोठे प्रसिद्धीचे व लाभाचे राहिल. नैसर्गिक स्थळांना भेटी, सहली यांचे नियोजन करून ते पूर्णत्वास न्याल. संगीत, कला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना यश प्राप्त होईल. राशीच्या अष्टम स्थानातून शनिचे भ्रमण होत असून जानेवारी २०२० नंतर अडथळयाची शर्यत संपेल. कोर्टकचेरीमध्ये कामे पूर्ण होतील. कायदेशीर प्रॉपर्टी, स्थावर मालमत्ता यांसारख्या कामातून फायदा होईल. नोकरीमध्ये श्रम व कष्ट वाढले तरी आर्थिक उत्पन्न वाढेल. व्यवसायामध्ये मनासारखे बदल होऊन प्रगती साधाल. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता राहिल. घरगुती समस्या, कटकटी, वाद-विवाद चव्हाटयावर येणार नाहीत याची दक्षता या. विद्यार्थ्यांना मोठे यश मिळवताना कष्टाची सांगड व तज्ञांचे मार्गदर्शन घेतल्यास फायदा होईल. राशीच्या लग्नातून व सप्तमातून राहू-केतूचे भ्रमण होत असून मानसिक स्थिती गोंधळणार नाही याची काळजी घ्या. माहिलांच्या बाबतीत कौटुंबिक व गृहस्थी जीवन मोठया अडचणींचा सामना करून यशस्वी करावे लागेल. व्यवसायात कष्ट वाढतील. उष्णतेचे विकार उद्भवतील. त्याचबरोबर गुप्त विद्येबद्दल आवड, व्यायामाची आवड निर्माण होईल. राशीच्या लाभातून हर्षलचे भ्रमण, भाग्यातून नेपच्यूनचे भ्रमण व सप्तमातून प्लुटोचे भ्रमण होत असून आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. शेअर्स सारख्या व्यवसायात लाभ होतील. नवीन अनपेक्षित बदल जीवनात होतील. विद्याव्यासंगी, लेखक यांना आपली इच्छा अनपेक्षित पूर्ण होण्याचा काळ राहिल. मात्र ऐनवेळी गोंधळ मन:स्ताप ही संभवतो.

उपासना –

विष्णु, राधा-कृष्ण यांची उपासना केल्यास उत्तम रा‍हिल. तसेच दर मंगळवारी मसुर डाळ व केळी मंदिरात दान दिल्यास उत्तम.

शुभरंग –

चमकदार पोपटी, फिकट गुलाबी

भाग्यरत्न –

पाचू हे रत्न वापरल्यास यशकारक राहिल.

शुभदिनांक –

कोणत्याही महिन्याच्या ५, १४, २३

भाग्यकारक वयोवर्ष –

१७, २६, ३५, ४४, ५३, ६२

०००

कर्क रास – नोकरीमध्ये मोठा अधिकार मिळेल.

राशीचक्रातील ही चौथी रास असून, जलतत्वाची, स्त्री राशी असून संवेदनशीलता, संस्कारक्षम, सात्विक, शांत, सोज्वळ, एकांतप्रिय, कुटुंब वत्सल, आत्मकेंद्रीत, ऐषोआरामी, चंचल, लोकप्रिय, राजकारणाची आवड, धर्मात्मा, मनमिळाऊ स्वभावाची, प्रभावी आवाज असणारी, समाजप्रिय व सामाजिक कार्याची आवड असणारी, एैश्वर्य, वाहनसौख्य यांची आवड झोपप्रिय, काल्पनिक विश्व, रसिक असणारे, समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींशी मैत्रीपुर्ण संबंध असल्यामुळे आपण समाज प्रिय बनता. त्यामुळे नेतृत्वगुण हे आपण उत्तमरित्या सांभाळता. आपणास कौटुंबिक जीवन जास्त आवडते. वाचन, ध्यानधारणा, तिर्थक्षेत्राची आवड, प्रवासाची आवड आपणास असते. चविष्ट पदार्थ मनापासून बनवण्यात रस असतो. मानसिक चंचलता, काल्पनिक रमणे, अति हळवेपणा, भावनेच्या आहारी जाणे हेही गुण दिसून येतात. आपण एखाद्यावर विश्वास टाकल्यास तो व्यक्ती आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे म्हणून स्विकारता तर सदैव काम करणारे, कौटुंबिकप्रिय एखाद्या विचारांशी चिकटून राहण्याचा स्वभाव असणाऱ्या कर्क राशीच्या व्यक्तींचे चालु वर्ष कसे जाईल ते पाहु.

राशीच्या षष्ठातून गुरूचे भ्रमण होत असून नातेवाईकांकडून मदत मिळेल. महत्वाची कामे मार्गी लागतील. कोर्टकचेरीमध्ये यश मिळेल. बँक विमा व मुदत ठेवीवरील व्याज अशा पैशातून आर्थिक उत्पन्न वाढेल. कौटुंबिक समस्या सुटतील नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना झगडून यश मिळवावे लागेल. नवीन व्यवसायात यश सहज प्राप्त होईल. शेअर्स व्यवसायातून अचानक धनप्राप्ती होईल. अपेक्षित यश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. त्याचबरोबर धार्मिक गोष्टीतून मन खंडीत होईल. साधु-सतांचा अथवा धार्मिक गुरूंचा सहवास लाभेल. राशीच्या सप्तमातून शनिचे भ्रमण जानेवारी २०२० पासून होत असून आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. कायदेशीर कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनातील वाद-विवाद संपुष्टात येतील. भागीदारीत व्यवसायमध्ये नवीन प्रोजेक्ट काम मिळेल. रखडलेली कामे पुर्ण होतील. मानसिक ताणतणाव कमी होईल. आवडीचे प्रवास घडतील. शेती-व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना तसेच खनिज, लोखंड, स्फोटक पदार्थ इत्यादी क्षेत्रात कम करणाऱ्या व्यक्तींना आर्थिक प्रगती होऊन कामाचा व्याप वाढेल. राशीच्या व्यय व षष्ठातून राहु-केतुचे भ्रमण होत असून अनावश्यक खर्च वाढेल. कमी श्रमात आर्थिक लाभ होतील. नातेवाईकांच्या बरोबर झालेले गैरसमज दूर होतील. हितशत्रूंचा नाश होईल. चतुराईने व हुशारीने संकटावर मात कराल. गुप्त विद्या शिकण्याची आवड निर्माण होईल. खेळ-स्पर्धा यांमध्ये यश प्राप्त होईल. राशीच्या दशमातून हर्षल, अष्टमात नेपच्युन व षष्ठ स्थानी प्लुटोचे भ्रमण होत असून मोठे निर्णय घेताना विचारपुर्वक घ्यावेत. नोकरीमध्ये अचानक मोठा अधिकार मिळेल. राजकीय क्षेत्रात शत्रुंवर विजय मिळवाल.

उपासना –

शिवशंकर उपासना, गणपती उपासना केल्यास उत्तम राहिल. तसेच घरामध्ये रूद्राभिषेक अथवा शिवपुजा केल्यास अडचणीतून मार्ग मिळेल.

शुभरंग –

पांढरा, आकाशी

भाग्यरत्न –

पांढरा पुष्कराज व पांढरा प्रवाळ

शुभदिनांक –

कोणत्याही महिन्याच्या २, ११, २९

भाग्यकारक वयोवर्ष –

१२, १६, २१, ३१, ४८, ५९, ६६

०००

सिंह रास – पदवी पुरस्कार मिळतील.

राशीचक्रातील पाचवी रास असून, अग्नितत्व, पुरूष स्वभावी, स्थिर वृत्तीची, अतिशय आत्मविश्वासू, कुशाग्र बुद्धीमत्ता, स्वाभीमानी स्वतंत्र वृत्तीची, धाडसी, करारी, वक्तशीर मेहनती, न्यायप्रिय, हुकूम सोडण्याची आवड, रागीट, शिस्तबद्धता, मानी, सरंक्षणकर्ता, मुत्सद्दी, राजकारणी, दिखाऊपणा, नेतृत्वगुण असणारी, स्तुतीप्रिय, पुढारपण गाजवणारी, गर्विष्ठ, आक्रमण, खिलाडीवृत्तीने बिकट परिस्थितीवर विजय मिळवणारी. अनेक मोठमोठया व्यक्तींचा सहवास या व्यक्तींना लवकर करतो. नेतृत्व करण्याची संधी या व्यक्ती अजिबात सोडत नाही. मुळात तुमच्या उर्जेने इतर लोक प्रभावित होतात. आपली उत्सुकता, स्पष्टवक्तेपणा, बुद्धीचा वापर करून उत्तमरित्या विजयाचा ध्वज खेचून आणता. दिनदुबळयांचा रक्षक म्हणून आपण समाजात प्रिय होता. तुमचे रुबाबदार व्यक्तिमत्व, संघर्षाच्या ठिकाणी स्पष्टवक्तेपणा व कर्तव्यासाठी कठोर होऊन निर्णय घेण्यात पटाईत असता. तुमची मोठी ताकद म्हणजे तुमचा आत्मविश्वास, हजरजबाबीपणाने परिपूर्ण कामे करून घेण्यात आपला हातखंडा असतो तर अशा अधिकाराची आवड असणाऱ्या सिंह राशीचे चालू वर्ष कसे जाईल ते पाहू.

राशीच्या पंचमातून गुरूचे भ्रमण होत असून नशिबाची साथ उत्त्तम राहिल. संतती सौख्याच्या दृष्टीने आनंदाची बातमी मिळेल. स्पर्धा परीक्षा यामध्ये यश प्राप्त होईल. कमी श्रमात आर्थिक प्राप्ती होईल. तिर्थयात्रा, मंगलकार्य होईल. मित्रांचे सहकार्य उत्तम राहून त्यांची मदत प्राप्त होईल. विवाह इच्छुकांचे मनपसंत जोडीदार मिळेल. एकंदरीत गुरूचे भ्रमण आपणास शुभ असून विवाह, संतती, पदवी पुरस्कार या सारख्या घटना जीवनात प्राप्त होतील. महत्वाची कामे विनाअडथळे पूर्ण होतीलृ राशीच्या षष्ठातून शनिचे भ्रमण होत असून नोकरीमध्ये मोठया जोमाने काम कराल.

वरीष्ठ अधिकारी आपल्यावर खुश होऊन नवीन जबाबदारी देतील. नोकरी व्यवसायानिमित्त प्रवास घडतील. नवीन कर्ज मंजुरी प्रकरणे अथवा कर्ज मुक्ती होईल. नोकर-चाकर यांचे सहकार्य उत्तम राहिल. दिर्घकाळचे आजार यावर प्रभावी औषध मिळेल. एकंदरीत शनिचे भ्रमण आपणास शुभ राहून मानसिक स्थैर्य प्राप्त होऊन सुखद अनुभव घ्याल. राशीच्या लाभातून व पंचमातून राहू-केतुचे भ्रमण होत असून स्वभावामध्ये धाडसीपणा वाढून निर्णय घ्याल. लॉटरी, पैज यांसारख्या गोष्टीतून लाभ होतीलृ मात्र या वर्षी गरोदर महिलांनी दक्षता घेतल्यास उत्तम राहिल. गुप्त विद्या, हितशत्रु व धार्मिक कार्याची आवड निर्माण होऊन त्यामध्ये रममाण व्हाल. बोलणे प्रभावी राहिल. हर्षलचे भ्रमण भाग्यातून, नेपच्युनचे भ्रमण सप्तमातून व प्लुटोचे भ्रमण पंचमातून होत असून भागीदारी करताना गोंधळ, गैरसमज होणार नाही याची दक्षता घ्या. संशोधन कार्यात यश मिळेल.

उपासना –

सूर्य उपासना, खंडोबा उपासना या देवतेची उपासना केल्यास उत्तम राहिल.

त्याचबरोबर सप्त धान्य व केळी यांचे दान केल्यास अडथळे दूर होतील.

शुभरंग –

नारंगी, सोनेरी

भाग्यरत्न –

प्रवाळ व डायमंड

शुभ दिनांक –

कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९, २८

भाग्यकारक वयोवर्षे –

२५, ३१, ३५, ३९, ४५, ५४

०००

कन्या रास – वास्तु, वाहन खरेदी होईल.

राशीचक्रातील सहावी रास असून आपला राशी स्वामी बुध आहे. पृथ्वीतत्वाची, द्विस्वभावी ही रास असून व्यवहारदक्ष व चिकित्सक असतात. आपल्या कार्यक्षेत्रात संपूर्ण विचार करून निर्णय घेतात. कामाच्या ठिकाणी नियोजन करणे, सुसुत्रता आणणे हे गुण आपणात असतात. चालणे, बोलणे, तोलुन मापून असते. हसण्यात मिश्किलपणा असणे, विचारात बालिशपणा, विचारांचा थांगपत्ता न लागणे, लाजाळु, भित्रा, आळसी, चिकित्सक, आत्मविश्वास कमी असणारी, हेवा करणारी, भावनेच्या भरात वाहत जाणारी, आतल्या गाठीची, माहिती काढणे, धरसोड वृत्ती, मस्करी करणे, स्वयंपाक व खाण्याची आवड असणे या राशीच्या व्यक्तींना शारीरीक कष्टाची आवड कमी असते. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा तपासणे अशा गोष्टी स्वभावात आढळतात. प्रत्येक गोष्टीत चिकित्सकता असल्यामुळे या व्यक्ती सहसा हसत नाही. तर अशा चिकित्सक, विद्वान मनाचा कल न जाणवू देणाऱ्या व्यक्तीचे चालु वर्ष कसे जाईल ते पाहु.

राशीच्या चतुर्थातून गुरूचे भ्रमण होत असून घर, जागा यांची प्राप्ती होईल. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने बदल, बदली मनासारखी होईल. परदेशगमन इच्छुकांना संधी प्राप्त होईल. मानसिक कष्ट झाले तरी यश प्राप्ती होईल. वडिलधाऱ्या व्यक्तींची व जेष्ठांची मदत मिळून त्यांचा सल्ला उपयोगी राहिल. मात्र आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. कला, संगीत यामध्ये आवड निर्माण होईल. विद्यार्थ्यांना कष्ट झाले तरी यश मिळेलच. राशीच्या पंचमातून शनिचे भ्रमण जानेवारी २०२० पासून होत असून स्वराशीतून भ्रमण होत असल्यामुळे शनिचे भ्रमण शुभकारक राहिल. दिर्घकाळासाठी गुंतवणुक करण्यासाठी कालखंड चांगला आहे. सहकारी संस्था, संघटना यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना मोठे मानाचे पद मिळेल. संतती विषयक प्रश्न मिटतील. खेळ स्पर्धांमध्ये यश मिळून पुरस्कार प्राप्त होतील. एकंदरीत शनिचे भ्रमण शुभ राहून दिर्घ काळाची कामे या वर्षी पूर्ण होतील. मात्र जुने आजार, उष्णतेचे विकार डोके वर काढतील. राशीच्या दशमातून राहूचे भ्रमण व चतुर्थातून केतूचे भ्रमण होत असून आपल्या चातुर्य व युक्तिबळावर राजकीय क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात यश प्राप्ती करून घ्याल. रेल्वे खाते, पोस्ट खाते या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आपल्या गुणांचा उत्कर्ष होईल. त्याचबरोबर मानसिक उदासिनता जाणवेल. हेकेखोर व्यक्ती, वितंडवादी व्यक्ती यांच्यापासून दूर रहा. विशेष करून आईच्या आरोग्याची व त्यांच्या भावनांची कदर ठेवा. राशीच्या अष्टमातून मंगळाचे भ्रमण, षष्ठातून नेपच्युनचे भ्रमण व चतुर्थातून प्लुटोचे भ्रमण होत असून प्रवास करताना रात्रीचा प्रवास टाळावा. सरकारी गुप्तहेर, बँकींग जनसंपर्काचे क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना गोंधळ, मनस्ताप होण्यासारख्या घटना घडतील. विशेष करून वर्षाचा उत्तरार्ध सुखकारक राहिल.

उपासना –

कृष्ण उपासना, विठ्ठल रूक्मिणी उपासना अनुकूल राहिल. विशेष करून दर गुरूवारी पिवळे वस्त्र व हरभरा डाळ दान केल्यास उत्तम राहिल.

शुभरंग –

पिवळा, पांढरा

शुभरत्न –

पांढरा पुष्कराज व आत्मविश्वास वाढविण्यासाठी पाचू या रत्नाचा वापर करावा.

शुभदिनांक –

कोणत्याही महिन्याच्या ५, १४, २३

भाग्यकारक वर्षे –

१५, २५, ३६, ४२, ५१, ६०

०००

तुळ रास – आपल्या कलाकौशल्याची प्रसिद्धी होईल.

राशीचक्रातील सातवी रास असून राशीस्वामी शुक्र आहे. पुरूष स्वभावी, चरवृत्ती, वायुतत्वाची रास असून या राशीचे चिह्न समान दोन तराजु आहे. या राशीच्या व्यक्ती उत्साही असून रूप, सौंदर्य व रसिकता यांचा आस्वाद घेणारी आहे. बोलण्यात, वागण्यात एकवाक्यता असते. आपल्या कार्यक्षेत्रात स्वत:चा तर्क-वितर्क लावून न्यायाने ते काम पुर्णत्वास नेतात. मनावर संस्कार करणाऱ्या इंद्रिय, मन व शरीर यांचा समतोल साधण्यात या व्यक्ती पारंगत असतात. शांत व समतोल माणूस. ‘सत्यम्, शिवम्, सुंदर्म’ शोधाणारे. न्यायप्रिय. वेळ पडल्यास राजालाही फाशी देण्यास मागे पुढे न पाहणारी. अशा व्यक्तिमत्वात गुण असणारे, मोठया मनाचे, परिपक्व तारूण्य, शुद्ध प्रेमाची आपुलकी असणारी, कला उपासक, वस्तुनिष्ठ, चिंतन करणारी, आनंदी, मित्रप्रिय, गर्विष्ठ, सत्वगुणी, परोपकारी, विषयी भावनाप्रदान खोटयाची चिड असणारी, सत्यप्रिय, चंचल, खर्चिक, सौंदर्यदृष्टी, शांत व शौक याची आवड असणारी, प्रतिष्ठा जपणारी, चुकीची कबुली देणारी, प्रवासाची आवड असणारी अशा तुळ राशीच्या व्यक्तीचे चालू वर्ष कसे राहिल ते पाहु.

राशीच्या तृतीय स्थानातून गुरूचे भ्रमण होत असून सारखे प्रवास घडतील, धार्मिक स्थळांना भेटी द्याल. लेखन, कला, संगीत, खेळ यांसारख्या क्षेत्रात मनासारखे यश मिळेल. प्रसिद्धी, पुरस्कार मिळतील, स्पर्धेमध्ये सहज यश मिळेल. सामाजिक हिताचे काम हातून होईल. भाऊ व बहिणीसाठी मोठा खर्च कराल, सभा संमेलन यामध्ये मानप्रतिष्ठा मिळेल, गुरूतुल्य व्यक्तीकडून आपले कौतुक होईल. वर्षाच्या उत्तरार्धात घर अथवा वाहन खरेदी कराल. छोटे प्रवास, मोठे प्रवास, विनात्रासाचे पार पडतील. वारसा हक्काचे प्रश्न सुटतील, कर्जाची कामे सहज होतील, मित्र सहकारी वर्गाकडून मदत, महत्वाची कामे होतील, नोकरदार वर्गाचे हे वर्ष आनंदी राहिल, परंतु हितशत्रूच्या कारवाईला बळी पडाल, उद्योग व्यवसाय करणाऱ्यांना आपला व्यवसाय विस्ताराच्या योजना सफल होतील. परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वर्गाला हे वर्ष विशेष करून शुभ राहिल. राशीच्या चतुर्थ स्थानातून शनिचे भ्रमण होत असून शनि हा आपल्या राशीला अत्यंत शुभकारक ग्रह असून तो स्वराशीत म्हणजे मकर राशीत जानेवारी २०२० ला प्रवेश करत आहे तरी आपल्या पत्रिकेत ‘शश’ नावाचा राजयोग होत असून आपल्याला सुखकारक गोष्टीची सुरूवात करत आहे. मानसिक कष्ट झाले तरी घर, जागा, वाहन यांची खरेदी होईल हे निश्चित. शेती विषयी कामे पूर्ण होतील. नोकरी व्यवसायात वरीष्ठ अधिकारी व्यक्तीशी वादविवाद टाळावा. जुने वादविवाद, कोर्ट कचेरीची कामे या मध्ये आपली सरशी होईल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपले मत मांडताना विशेष काळजी घ्या. बोलण्यामुळे गैरसमज होणार नाहीत याची दक्षता घेतल्यास उत्तम, राहू व केतूचे भ्रमण भाग्य व तृतीय स्थानातून होत असून खेळाडू क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना यश मिळेल, मोठं प्रदर्शन कराल. धाडसी निर्णय घ्याल. बहिण भाऊ यांच्याविषयी मनात विकल्प येईल. स्थावर इस्टेट, प्रॉपर्टी यांसारख्या प्रश्नावर मार्ग मिळेल. हर्षलचे भ्रमण सप्तम स्थानातून, नेपच्यूनचे भ्रमण पंचम स्थानातून व प्लूटोचे भ्रमण तृतीय स्थानातून होत असून अचानक टोकाचे निर्णय घेणे टाळावे नंतर पश्चाताप होईल. शेअर्स व्यवसायामध्ये अचानक मोठा लाभ व तोटा असे परिणाम दर्शवितात.

उपासना –

आपण कुलदेवी उपासना, महालक्ष्मी उपासना, उत्तम राहिल. त्याचबरोबर काळेउडीद व हरभरा डाळ दर शनिवारी व गुरुवारी दान केल्यास उत्तम.

शुभ रंग –

जांभळा, पांढारा,

भाग्यरत्न –

पाचू व डायमंडचा वापर केल्यास उत्तम राहिल.

शुभदिनांक –

कोणत्याही महिन्याच्या ६, १५, २४,

भाग्यकारक वयोवर्षे –

१६, २५, २८, ३२, ४०, ४७, ६२

०००

वृश्चिक रास – अच्छे दिन येतील.

राशीचक्रातील आठवी रास असून, जलतत्वाची, स्थिरवृत्तीची, स्त्रीस्वभावी रास असून या राशीचा स्वामी मंगळ आहे. जीवनातील अनुभवाचे, कर्माचे सार जतन करण्याचे स्थान, मनकोष दिसण्यास देखणी व्यक्ती पण स्पष्ट न बोलणारी मनात प्रत्यक्षात विसंगती, गुप्त, पाताळ यंत्री, महत्वाकांक्षी, सावध संधीसाठी दबा धरुन डंक मारणारी, रजोगुणी, रागीट, खुनशी, टोचुन बोलणारी, हजरजबाबी, राजकारी डावपेच, कारस्थान करणारी, हट्टी व लोभ अशा स्वभावाच्या राशीचे व्यक्तीमत्व असू शकते या राशींच्या व्यक्तींना दुसऱ्याच्या मनातील विचार चटकन समजतात. त्यांची भाषाशैली खोचक व अचूक मर्मावर घाव घालणारी असते. त्यामुळे या राशीच्या व्यक्ती सर्व क्षेत्रात चमकणाऱ्या दिसतात तर अशा महत्वाकांक्षी, चिकाटी, खलबुद्धी असणाऱ्या वृच्छिक राशीच्या व्यक्तीचे चालू वर्ष कसे जाईल ते पाहु.

राशीच्या धनस्थानातून गुरूचे भ्रमण होत असून अनेक गोष्टींसाठी अनुकूल राहील, कुटुंबात वृद्धी व चांगल्या घटना घडतील, आर्थिक आवक वाढेल. परंतु शिल्लक राहणार नाही. गुंतवणूक करताना सतर्क राहावे. आपल्या बोलण्याचा फायदा इतर लोकांना होईल. नोकरीमध्ये सहकार्य करणारे कर्मचारी, वरीष्ठ अधिकारी व्यक्ती यांची मदत, सहकार्य उत्तम राहील. वर्षाच्या मध्यानंतर नावलौकिक व प्रसिद्धी मिळेल. नवीन कर्ज मंजुरीची कामे, जुनी येणी विनात्रासदायक होतील. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीना प्रतिष्ठा व मानसन्मान वाढेल. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना एखादे महत्वाचे पदावर नियुक्ती होईल हे निश्चित. आपली लोकप्रियता वाढेल. शेअर्स व्यवसायात अधिक फायदा होईल. हितशत्रुंचा प्रभाव वाढेल. राशीच्या तृतीय स्थानातून शनीचे भ्रमण होत असून आपल्या राशीची साडेसातीची संपली आहे. हे वर्षे सुखकारक राहिल. संघर्षातून मार्ग मिळेल. मानसिक व शारीरिक स्वास्थ मिळेल. नव्या दिशा नवे मार्ग सापडतील. आत्मविश्वास वाढेल. कर्तृत्वाची संधी मिळेल. कला क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आर्थिक आवड वाढेल. आपली प्रतिमा लोकप्रिय होईल. नवीन घर, जमीन यांची खरेदी होईल. दुरावलेले नातेवाईक, मित्र, सगेसोयरे यांची जवळीक वाढेल. निर्णय क्षमता वाढेल. गुंतवणुक करण्यास हे वर्षे उत्तम आहे. एकंदरीत घरातील वातावरण आनंदी राहिल. राहू व केतूचे भ्रमण राशीच्या अष्टम व धन स्थानातून होत असून नोकरीमध्ये बदल, बदली, अथवा नवीन नोकरीसाठी काळ अनुकूल राहिल. मात्र आरोग्याची दक्षता घ्यावी लागेल. पायाची दुखणी या सारख्या आजाराकडे लक्ष द्यावे लागेल. मात्र अकल्पित धन लाभ होईल. अध्यात्म ज्ञानाची आवडनिर्माण होईल. हर्षलचे भ्रमण षष्ठ स्थनातून, नेपच्यूनचे भ्रमण चतुर्थ स्थानातून व प्लूटोचे भ्रमण धनस्थानातून होत असून डोळ्यांचे विकार, नेत्रविकार या सारख्या आजारांची दक्षता घ्यावी. वाहन जपून चालवावे. मोठे खर्च करताना काळजी घ्या. विशेष करून धर्मगुरू, संत व सल्लागार व्यक्तींना हे वर्षे शुभ कारक राहील.

उपासना –

शिवशंकर उपासना केल्यास उत्तम राहिल, सप्त धान्याचे दान दिल्यास आत्मविश्वास वाढेल.

शुभरंग –

गुलाबी, लालसर, मरून

भाग्यकारक रत्न –

आपण पुष्कराज व माणिक रत्नाचा वापर केल्यास उत्तम राहिल.

शुभ दिनांक –

कोणत्याही महिन्याच्या १८, २१, २७

भाग्यकारक वयोवर्षे –

२०, २४, ३४, ४२, ४७, ५६

०००

धनु रास – मानसिक उन्नती होईल.

राशीचक्रातील ही नववी रास असून अग्नितत्वाची, द्विस्वभावी, पुरूषलक्ष्मी. या राशीचा स्वामी गुरू असून या राशीचे चिन्ह अश्वमानव असे आहे. अत्यंत संवेदनशील, सात्विक, न्यायप्रिय, परोपकारी, अंत:करणातील कोष सुप्तअवस्थेत असणारी, जीवनाबद्दल श्रद्धा, न्यायदेवतेच्या निर्णयाप्रमाणे कर्म करणारी, परोपकारी, अधिकारांची हौस असणारी, न्यायी व धार्मिकता जपणारी, मुलांसाठी अथवा कुटुंबासाठी सदैव खर्च करणारी, वास्तु व वाहनसौख्याची आवड असणारी, हसतमुख व समाधानी, धार्मिकतेची आवड असणारी, संमयसुचकता जपणारी हे गुण असल्यामुळे प्रमुख संघटक म्हणून आपण उत्तम प्रकारे नेतृत्व करू शकता. आपल्या विचारांचा ताळमेळ घालून आपला निर्णय घेऊन आपला कार्यभाग पुर्ण करता तर न्याय, कायदा, शिस्त यांचा ताळमेळ घालून प्रेमळ योद्धा म्हणून आपण समाजप्रिय होता. धनु राशींच्या व्यक्तींचे वृत्ती अध्यात्मक असून त्यांच्यातील स्वभाव सकारात्मक व नकारात्मक बाजूंचा विचार करून आपण प्रकाशमान होत असता. या राशींच्या व्यक्तींना एखादी लहानशी संधी सुक्ष्मदर्शक भिंगाप्रमाणे काम करू शकते हा त्यांचा मानस असतो तर अशा प्रेमळ व अजाद शत्रु असणाऱ्या धनु राशीच्या व्यक्तींचे चालू वर्ष कसे जाईल ते पाहू.

राशीच्या प्रथम स्थानातून गुरूचे भ्रमण होत असून मानसिक ताण वाढेल. अति खाण्याची आवड निर्माण होईल. (गोड पदार्थ) मात्र स्वभावात धार्मिक भावना वाढतील. घरातील व्यक्तीच्या बोलण्याला प्राधान्य द्यावे लागेल. विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील. मोठे प्रवास व तिर्थ यात्रा विना कष्टाचे होतील. भागीदारी मधील व्यवसायाला नवी दिशा व नवीन प्रोजेक्ट मिळतील. कोर्टकचेरीमध्ये यश मिळेल. शेअर्स व्यवसायामध्ये अचानक फायदा होईल. संततीची प्रगती व प्रसिद्धी होईल. विद्यार्थ्याना उच्च शिक्षणासाठी परदेशगमन होईल. धार्मिक संस्था मध्ये आपली विश्वस्त म्हणून निवड होईल. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना नवी संधी मिळेल.

राशीच्या धन स्थानातून शनिचे भ्रमण होत असून साडेसातीचा शेवटचा टप्पा चालू जानेवारी २०२० नंतर होईल. आरोग्यामध्ये सुधारणा होईल. एकटेपणा दूर होइ्रल. विवाहामधील अडथळे दूर होतील. मात्र कौटुंबिक समज-गैरसमज वाढणार नाहीत याची दक्षता घ्या. कुटुंबातील जेष्ठ व्यक्तींकडून फायदा होईल. जुनी येणी वसूल होतील. त्यामुळे आर्थिक नियोजन उत्तम होईल. दिर्घ काळची गुंतवणूक करण्यास कालखंड उत्तम जुने शास्त्र साहित्य, विमा एजंट, बँक कर्मचारी, सिव्हिल इंजिनिअर यासारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना हे वर्ष शुभ व आर्थिक उन्नतीकारक राहिल. पराक्रम व कर्तृत्वाची संधी प्राप्त होईल.

राशीच्या सप्तम स्थानातून राहूचे व प्रथम स्थनातून केतूचे भ्रमण होत असून आपल्या विवेकी, व तीव्र बुद्धी व कुटनीतीने शत्रू पक्षावर प्रभाव व वचक ठेवाल. मामाकडून फायदा होईल. विशेष करून महिला वर्गाला शारीरिक सौंदर्य प्रसादनांचा वापर करताना काळजी घ्या. ॲलर्जी अथवा दुष्यपरिणाम होणार नाहीत. राशीच्या पंचम स्थानातून हर्षल, तृतीय स्थानातून नेपच्यून व आपल्या राशीतून प्लूटोचे भ्रमण होत असून अनपेक्षित लाभ होतील, अध्यात्म व गुढ शास्त्रामध्ये आवड निर्माण होईल.

उपासना –

श्री दत्त उपासना व प्रदोष व्रत केल्यास उत्तम राहिल व काळे तीळ व काळे कापड याचे दान दिल्यास उत्तम.

शुभ रंग –

चमकदार पिवळा, लाल, डाळिंबी

भाग्य रत्न –

आपण माणिक रत्नाचा वापर केल्यास उत्तम.

शुभ दिनांक –

कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१, ३०

भाग्यकारक वयोवर्षे

१८, २२, ३४, ४३, ५४, ६३

०००

मकर रास – परदेशगमन मोठे प्रवास होतील.

राशीचक्रातील ही दहावी रास असून स्त्री स्वभावी, चर वत्तीची ही रास आहे. या राशीचा स्वामी शनि असून, या राशीचे चिन्ह अर्धा भाग मगर व अर्धा भाग हरिण असून असे संयुक्त रूप आहे. या राशीचे वैशिष्टय म्हणजे सतत कार्यमग्न राहणे. गांभीर्य ओळखून कर्तव्याचे पालन करणे. अशा मनाला परावृत्त करणारी कर्म भोगासाठी लागणाऱ्या आयुष्याच्या मनाला निमंत्रण करणारी, देहाला गती देणारी, करारीपणा, शांत, थंड, तडफ, साहस, चैतन्यवादी कष्टाळू, वैराग्य धारण करणारी, राजकारणी, चिंताग्रस्त, लहरी, दिर्घसुत्र, आत्मसात करणारी, भावना व्यक्त न करणारी, न्याय निष्ठुर, धडपडी, व्यापार वृत्तीची या राशीतील व्यक्तींचे हे गुण आढळतात. तसेच कामाची आखणी, सुसूत्रता असल्यामुळे त्यांची कामे इतरांच्यापेक्षा विनाअडथळे पूर्ण होतात तर त्यांचे ज्ञान सगळ्या लौकिक व्यवहाराच्या पलीकडचे असते. या राशींच्या व्यक्ती कामात, व्यवहारात किंवा संसारात कोणताही अयोग्य मार्ग निवडत नाहीत. त्यांचे वागणे, बोलणे न्यायाला धरून असते. या राशींच्या व्यक्ती निर्णय करताना कोणतेही घाई गडबड न करता शांतपणे, चतुर, व्यवहारी असणाऱ्या मकर राशीचे चालू वर्ष कसे राहिल ते पाहू.

राशीच्या व्ययस्थानातून गुरूचे भ्रमण होत असून तो स्वराशीतून होत असून परदेशगमन, मोठे प्रवास निश्चित होतील. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. दान, धर्म होईल. हितशत्रूंचा बिमोड होईल. कर्जाची कामे सहज होतील. नोकरीमध्ये सकारात्मक बदल होऊन वरिष्ठांची शाबासकी मिळेल. नवीन घर, वस्तु घेण्याचे योग दर्शवितात. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशगमन घरापासून दूर रहावे लागेल. एकंदरीत हे गुरूचे भ्रमण मोठी तिर्थयात्रा परदेशगमन मोठी कर्जे यांसारख्या गोष्टींमध्ये गुरूचे भ्रमण शुभ राहिल. शनिचे भ्रमण आपल्याच राशीतून होत असून साडेसातीचा दुसरा टप्पा चालू होत असून पहिल्या टप्प्यापेक्षा हा टप्पा सुखकारक राहिल. जानेवारी २०२० नंतर आत्मविश्वास वाढून आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल. आपल्या कष्टाचे चीज होईल. राजकीय क्षेत्रात मानाचे पद प्राप्त होईल. व्यवसायात स्थैर्य मिळेल. नोकरीमध्ये बढती, प्रमोशन होईल. दीर्घकाळाची गुंतवणूक करण्यास हे वर्ष उत्तम आहे. त्याचबरोबर पायाची दुखणी, वात विकार, पाण्यापासून होणारे आजार या सारख्या आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील. राशीच्या षष्ठातून राहूचे व व्ययातून केतूचे भ्रमण होत असून आपले हाताखालचे सहकारी वर्ग त्यांच्यापासून फायदा होईल. आईच्या वारसा हक्काकडून आर्थिक लाभ होतील. पशु, पक्षी, गुरे, ढोरे यांचा व्यापार करणाऱ्या व्यक्तींना हे भ्रमण शुभकारक राहून आर्थिक उन्नती करणारे राहिल. राजकीय व्यक्तीपासून फायदा होईल. हातून धाडसी कामे करताना तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. राशीच्या चतुर्थातून हर्षलचे भ्रमण, धन स्थानातून नेपच्यूनचे भ्रमण व व्ययातून प्लुटोचे भ्रमण होत असून दंत रोग, नेत्रविकार यासारख्या आजारावरती खर्च होईल. तरूण तरूणींना प्रेम प्रकरणांमध्ये मनस्ताप होऊन वाद-विवाद होतील. मित्रांशी अति जवळीक महागात पडले.

उपासना –

आपण विष्णु उपासना, मारूती उपासना केल्यास उत्तम राहिल. त्याचबरोबर पिवळ्या वस्तु, पिवळे पदार्थ यांचे दान केल्यास मनोबल उत्तम राहिल.

शुभरंग –

हलका ग्रे, विटकरी, पांढरा

भाग्यरत्न –

पाचु व डायमंड व नीलम रत्नाचा वापर केल्यास ठीक राहिल.

शुभदिनांक –

कोणत्याही महिन्याच्या ७, १७, २६

भाग्यकारक वयोवर्षे –

१४, २३, ३१, ४१, ५०, ५२, ६९

०००

कुंभ रास – लाभदायक वर्ष

राशीचक्रातील ही अकरावी रास असून स्थिर तत्वाची वायुराशी, पुरूष स्वभावी. या राशीचे चिन्ह खांद्यावर कुंभ घेतलेला घडा घेऊन निघालेला पुरूष असा आहे. या राशीचा स्वामी शनि असून उच्च प्रकारची ज्ञानलालसा, सत्याची आवड, कोणतीही गोष्ट मनात असून व तळमळीने करणे. कुटूंबावर, मित्रांवर आपण मनापासून प्रेम करता. आपली मते, ध्येयविचार स्थिर असून, विचाराचे, मूल्यांचे, तत्वांचे आपल्यावर जन्मत:च संस्कार झालेले असतात. चिंतन, मनन, विचार जन्माची शिदोरी या जन्मातील कर्मासाठी लागणाऱ्या प्रेरणा आहेत. हे आपण सिद्ध करता जीवनाचा अविष्कार हा पूर्ण कुंभ ज्ञानाचा, बुद्धी साठवण्याच्या, संशोधक अध्यात्मक ओढीचा शुद्ध ज्ञानाने नटलेली, परिपक्व, तारूण्याचे गांभीर्य, विकासाची परिसिमा, आत्मविश्वास, काटकसरी, समाजशील, वैचारीक, पुढारीपणा, निश्चयी, व्यवहारी दुरदृष्टी, मुत्सद्दी, वक्तशीर, मुददेसूद मांडणी आखणारा व्यक्ती कुंभ राशीच्या आढळतात. तर अशा व्यक्तिमत्व असणाऱ्या कुंभ राशींच्या व्यक्तींचे चालू वर्ष कसे जाईल ते पाहू.

राशीच्या लाभस्थानातून गुरूचे भ्रमण होत असून हे आपणास लाभदायक राहिल. आर्थिक उत्पन्नात मोठी वाढ होऊन सौख्याची प्राप्ती होईल. लेखन, कला, साहित्य या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना पदवी पुरस्कार प्राप्त होऊन आर्थिक लाभही होतील. विवाह इच्छुकांना मनपसंत जोडदार मिळून विवाह पार पडतील तसेच मित्रांची मदत मिळून रखडलेली कामे पूर्ण होतील. संततीकडून सुवार्ता कामी पडतील. विद्यार्थ्यांना प्रगतीचे वर्ष राहील. एकंदरीत कौटुंबिक व आर्थिक प्रवास यासाठी हे गुरूभ्रमण शुभ राहिल. राशीच्या व्ययस्थानातून शनिचे भ्रमण होत असून जानेवारी २०२० नंतर साडेसातीचा प्रारंभ होईल. परंतु भीतीचे कारण नाही. शनिचे भ्रमण स्वराशीतूनच होत असल्यामुळे मानसिक त्रास झाला तरी यश हे आपलेच आहे. परदेशगमनाची संधी अथवा नवीन नोकरीसाठी परदेशगमन किंवा नवीन प्रोजेक्टसाठी आपली निवड होईल. व्यावसायिकांना इंम्पोर्ट-एक्सपोर्टच्या व्यवसायात फायदा दर्शवितो. शिक्षक, सल्लागार किंवा ज्ञान देणाऱ्या व्यक्तींना दर्श राहण्याचा सल्ला कुटुंबातील जेष्ठ व्यक्ती, वृद्ध व्यक्ती यांच्यासाठी खर्च करावा लागेल. वाहन चालवताना दक्षता घ्यावी. जामीन राहणे, मध्यस्ती करणे या गोष्टीपासून मानसिक त्रास दर्शवितो. राशीच्या पंचमातून व लाभातून राहू-केतूचे भ्रमण होत असून आपल्या भावना इतर व्यक्तींना व्यक्त करताना सावध रहावे. गरोदर महिलांना विशेष काळजी घ्यावी लागेल. मात्र स्पर्धा परीक्षा, बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना शेवटच्या टप्प्यात यश मिळेल. कलाकौशल्याची आवड निर्माण होईल. फोटोग्राफी, ड्राँईंग, पेटींग इत्यादी गोष्टींची आवड निर्माण होऊन त्यात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न कराल. राजकृपा, अचानक धनलाभ यासरंख्या गोष्टी दर्शवितात. राशीच्या तृतीयातून हर्षलचे भ्रमण होत असून नेपच्यूनचे भ्रमण आपल्याच राशीतून व प्लूटोचे भ्रमण लाभातून होत असून हितशत्रूवर मोठा विजय मिळवाल. मनोबल वाढून, राजकीय, सामाजिक क्षेत्रात आपला प्रभाव राहिल. त्याचबरोबर आश्चर्यकारक घटनांचा अनुभवही घ्याल.

उपासना –

कुलदेवतेची उपासना केल्यास ठीक राहिल. शिवशंकर उपासना केल्यास व दर सोमवारी रूद्राभिषेक केल्यास मानसिक मनोबल वाढेल.

शुभरंग –

निळा, आकाशी, पांढरा

भाग्यरत्न –

आपण डायमंड रत्नाचा वापर केल्यास अथवा पांढरा पुष्कराज वापरल्यास उत्तम राहिल.

शुभदिनांक –

कोणत्याही महिन्याच्या ८, १७, २६

भाग्यकारक वयोवर्षे –

१५, २४, २५, ३६, ४२, ५१, ६०, ६४, ७२

०००

मीन रास – मान सन्मान प्रतिष्ठा वाढेल.

राशीचक्रातील ही शेवटची रास असून जलतत्वाची, द्विस्वभावी, स्त्रीराशी असून या राशीचा स्वामी गुरू आहे. या राशीचे चिन्ह विरूदध दिशेला तोंड असणारे दोन मासे आहेत. भावना प्रधान, मनाच्या हळव्या, यशाची गती उलटी सुलटी, मनाची चंचलता, भाऊकता, आपल्या स्वभावामध्ये जाणवते. गोरगरीबांची मदत, अनाथ लोकांची मदत करण्यासाठी आपण अग्रेसर राहता. या जन्मी केलेल्या कर्माचे पुढील जन्मी घ्यावयाचे बंध याच जन्मात मुक्तीचा अनुभव देणारे स्वरूप ज्ञान फल आपणास ज्ञात असते. जीवनातील आनंद समाधानाचे साधन, लवकर निर्णय न घेणारी, ‘ठेविले अनंते तैशी’ राहणारे व्यक्ती मीन राशीच्या आढळतात. असेल त्या परिस्थितीशी जुळवून घेणारी, विकार वश, ममताळु गुढविद्येची आवड असणारी, संशयी, परधन अभिलाशी, मित्रमैत्रिणींना अनुकूल असणारी अशी मीन रास आहे. परोपकारी, स्वत:च्या मनावर ताबा नसणारी, स्वप्नाळू, उदारमतवादी, शांत, सत्य, न्यायप्रिय असणारी मिळते-जुळते घेऊन कार्यभाग साधणारी स्वभावाच्या मीन राशीच्या व्यक्तींचे चालू वर्ष कसे जाईल ते पाहू.

राशीच्या दशमातून गुरूचे भ्रमण होत असून नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम राहून प्रमोशन बढतीची संधी मिळेल. आत्मविश्वास वाढेल. मोठ्या व्यक्तींची मैत्री संबंध घट्ट होतील. गुरू-हर्षल नव पंचम योगामुळे लॉटरी, शेअर्स यांसारख्या गोष्टीतून धनप्राप्ती होऊन कुटूंबातील आर्थिक स्थिती चांगली राहिल. कुटूंबात मंगलकार्य घडतील. या वर्षी आरोग्य उत्तम राहून जुन्या आजारावरती प्रभावी औषधे मिळतील. समाजामध्ये मान, प्रतिष्ठा वाढून नाव लौकिक वाढेल निवडणुका, राजकीय क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तींना निवडणूक जिंकाल. शत्रूचा बिमोड कराल. राशीच्या लाभातून शनिचे भ्रमण होत असून जानेवारी २०२० नंतर अनेक दृष्टीने फायदेशीर राहिल. स्थावर प्रॉपर्टी भागीदारीतील व्यवसाय यांसारख्या गोष्टींमध्ये आपल्या मनासारख्या घटना घडतील जुनी येणी, रेंगाळलेली कामे पूर्ण होतील बालपणाचे मित्रमैत्रिणी त्यांच्याबरोबर गेट टुगेदर, सहली यांचे नियोजन आनंद व मौजमजा कराल. कला, खेळ स्पर्धा यामध्ये यश मिळेल. मात्र संतती कडून मनाविरूदध मानसिक त्रास होईल अशा घटना घडतील. विद्यार्थी वर्गाला परीक्षेत यश मिळवताना गोंधळ, गडबड होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. राहूचे चतुर्थातून व केतूचे दशमातून भ्रमण होत असून सामाजिक किंवा धार्मिक कार्यासाठी संस्था किंवा ट्रस्ट यांसारख्या गोष्टी स्थापन कराल. शेती, जमीन-जुमला यांमध्ये वाढ होईल ज्या व्यक्तीचं वयोवर्षे ३६ ते ५४ आहेत त्यांना भरभराटीचा काळ राहिल. आर्थिक आवक उत्तम राहिल. त्याचबरोबर घर व घरगुती सुखात वाढ होईल. जीवन थाटामाटात जगाल तसेच राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना सुखसंपन्न वातावरण लाभेल. कार्यकर्त्यांमध्ये वाढ होईल. आपले विचार समाजास प्रभावी करतील. हर्षलचे भ्रमण आपल्या धनस्थानातून होत असून नेपच्यूनचे भ्रमण व्यय व प्लूटोचे भ्रमण दशमातून होत आहे. विमा प्रॉपर्टी या संदर्भातून धनसंचय होईल. कुटूंबात वाद-विवाद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागेल. रात्रीचे प्रवास टाळावेत. मोठे खर्च करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावेत.

उपासना –

आपण लक्ष्मीनाराण व गणपतीची उपासना केल्यास उत्तम राहिल तसेच दर मंगळवारी मसुर डाळ व गुळ किंवा सप्तधान्याचे दान केल्यास मानसिक शांतता लाभेल.

शुभरंग –

गुलाबी, निळसर, पोपटी

शुभरत्न –

प्रवाळ व पुष्कराज रत्नाचा वापर केल्यास ठीक राहिल.

शुभदिनांक –

कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१, ३०

भाग्यकारक वयोवर्षे –

९, १८, २६, ३६, ४४, ४५

ज्योतिष भास्कर – उमेश स्वामी

(ज्योतीष व वास्तू सल्लागार)

केशवनगर, कासारवाडी, पुणे ४११ ०३४.

मोबाईल नंबर – ९९२२३१११०४

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.