Bhosari News: अजितदादांना मुख्यमंत्री पदी बसलेलं बघायचंय – डॉ.अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी- चिंचवडसाठी अनेक गोष्टी दिल्या आहेत. ऋणातून उतराई होण्याची वेळ असते. अजित पवारांच्या कुशल नेतृत्वात आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली. आता आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दादांना काहीतरी देण्याची वेळ आली आहे. अजितदादांना मुख्यमंत्री पदी बसलेलं बघायचे आहे, हीच भावना ठेऊन त्यांच्या पाठीशी ताकद उभी करा, असे आवाहन शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. च-होलीत आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

माझ्यासाठी तुम्ही जीवाचे रान केले आहे. माझ्यासाठी पायाला भिंगरी लावून पळालात. आता मला तुमच्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आहे. शरद पवार हे पिंपरी- चिंचवडमध्ये लक्ष घालत आहेत. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला मिळतय ही भाग्याची गोष्ट आहे. पण त्यांना जर देशाच्या पंतप्रधानपदी शरद पवारांना पाहायचे असेल तर त्या माझ्या सर्वोच्च नेत्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालायला लागू नये. हीच गोष्ट राज्यपातळीवर अजित पवारांच्या बाबतीत आहे.

पिंपरी-चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजित दादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आता ऋण फेडण्याची वेळ आली आहे. तसेच देशाच्या पंतप्रधानपदी शरद पवारांना पाहायचं असेल तर त्या माझ्या सर्वोच्च नेत्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालायला लागू नये. यासाठी कार्यकर्त्यांची फळी, नेत्यांची मोट बांधून झुंजार अन् लढाऊ वृत्ती आपण साहेबांना दाखवून दिली पाहिजे, असे आवाहन डॉ. खासदार कोल्हे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.