ICC News : भारताचा विंडीजवर मोठा विजय

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) भारतीय संघाने दुबळ्या (ICC News)  विंडीज संघावर एक डाव आणि 141 धावांनी मोठा विजय मिळवत धुव्वा उडवला आहे. आपल्या पहिल्याच कसोटीत शानदार खेळी करून सर्वानाच प्रभावित करणाऱ्या यशस्वी जैस्वालला सामन्याचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले. दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाने 1/0 अशी आघाडी घेवून शानदार सुरुवात केली आहे.

त्याआधी कालच्या दोन बाद 312 या धावसंख्येवरुन पुढे खेळताना भारतीय संघाच्या यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली या जोडीने आजही शानदार खेळ सुरूच ठेवला. आज खेळ सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळात यशस्वीने आपले दीडशतक पूर्ण करून तो एकदा स्थिर झाला की मोठया खेळीकडे कूच करतो हे सिद्ध केले.

त्यानंतर थोड्याच वेळात कोहलीनेही आपले 29 वे अर्धशतक पूर्ण केले.हे दोघेही मोठी खेळी करतील असे वाटत असतानाच यशस्वी 171 धावांवर असताना अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर यष्टीमागे झेल देवून बाद झाला. त्याला द्विशतक करण्यात अपयश आले.

तो बाद होणारच नाही असे वाटत असतानाच तो चकला, पण खिलाडूवृत्ती साठी प्रसिद्ध असलेल्या मैदानावरील असंख्य प्रेक्षकांनी या अविस्मरणीय खेळीला उभे राहून टाळ्यांचा गडगडाट करत मानवंदना दिली. यशस्वीने कोहली सोबत तिसऱ्या गड्यासाठी 110 धावांची भागीदारी केली.

त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेला आज मात्र विशेष काही करता आले नाही अन तो केवळ तीन धावा करुन केमार रोचच्या गोलंदाजीवर एक अतिशय खराब फटका करुन बाद झाला. जागतिक कसोटी सामन्याच्या अंतिम सामन्यात चांगली कामगिरी केल्यानंतर थेट उपकर्णधार पदी नियुक्ती झालेल्या रहाणेला विंडीजच्या दुबळ्या गोलंदाजीपुढे एक मोठी खेळी करण्याची चांगली संधी होती, पण त्याला ती साधता आली नाही हेच खरे.

यानंतर जडेजा आणि कोहलीने डाव पुढे चालू ठेवताना चांगली फलंदाजी केली. ही खेळपट्टी टीपीकल विंडीज खेळपट्टीच्या तुलनेत खूपच वेगळी आणि खेळायला कठिण अशीच होती. त्यामुळे चेंडू मधेच वळत होता तर कधी कधी खूप खाली राहत होता.

किंग कोहली म्हणून आपल्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या कोहलीला आज मात्र शतकी खेळी करण्याची संधी साधता आली नाही. जबरदस्त मनोनिग्रह दाखवत त्याने झुंजार खेळी करत आपल्या शतकाकडे कूच केलीही होती, पण कॉर्नवेलने त्याला वैयक्तिक 76 धावांवर असताना बाद करुन त्याला शतकापासून रोखले.

खरेतर कोहली 50 च्या पुढे गेला की त्या खेळीचे तो शतकी खेळीत रूपांतर (ICC News) करतोच,पण आज मात्र त्याला तसे करण्यात अपयश आले. त्याची फटका मारण्याची चूक त्यालाच नडली आणि निराश होत त्याला तंबूत परतावे लागले.यानंतर जडेजाला साथ द्यायला आला तो आणखी एक कसोटी पदार्पण करणारा ईशान किशन.

जडेजाला त्याने साथ देत डाव पुढे सुरू ठेवला असतानाच कर्णधार रोहीतने एक अतिशय धाडसी पण संघाच्या हिताचा निर्णय घेत डाव घोषित करून ईशान सह सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला,ज्यामुळे सर्वच चकित झाले. यावेळी जडेजा 37 धावांवर तर किशन 1 धाव काढून खेळत होते.

खरे तर विंडीज मध्ये सामन्याच्या चौथ्या आणि 5 व्या दिवशी तुफानी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता(भारतीय हवामान खात्याने नाही)त्यामुळे वेस्ट इंडीजला कुठल्याही प्रकारची संधी देण्यात रोहितला रस नव्हता. भविष्यात भलेही या निर्णयाला टीकेला सामोरे जावे लागेलही,पण तो निर्णय संघाच्या दृष्टीने हितावह होता हे नक्की. 5 बाद 421 या धावसंख्येवर भारतीय संघाने आपला पहिला डाव घोषित केला.

271 धावांनी मागे असलेल्या विंडीज संघाला ही आघाडी तशीही फार मोठीच होती. याला कारण म्हणजे सध्याच्या संक्रमण अवस्थेतून जात असलेला विंडीज संघ. एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या विश्व कप स्पर्धा सलग दोन वेळा जिंकून क्रिकेट जगतावर जबरदस्त वर्चस्व प्राप्त करणारा विंडीज संघ यावेळी भारतीय उपखंडात होणार विश्व कप स्पर्धसाठी अपात्र ठरलाय याचे दुःख होणार असा क्रिकेट चाहता असूच शकत नाही.

आपल्या धडाकेबाज खेळासाठी आणि खिलाडूवृत्तीसाठी विंडीज संघ जगभर परिचीत आहे आणि प्रसिद्धही.पण मागील काही काळापासून त्यांच्या संघात जिंकण्यासाठीची ना इर्शा दिसून येते ना त्यांच्या संघात संघभावना.जगभरातल्या विविध टी-20 स्पर्धेत खेळून अमाप पैसा कमवण्याच्या नादात राष्ट्रीय संघासाठी खेळायची इच्छा त्यांच्या संघातल्या खेळाडूंकडे आहे की नाही हा खिन्न करणारा प्रश्न मनाला खूप यातना देऊन जातो.

त्यातच त्यांचे क्रिकेट बोर्ड स्टार खेळाडूंसोबत समन्वय साधण्यात नेहमीच अपयशी ठरले आहे,कदाचित याचमुळे विंडीज संघ आज असा रसातळाला जाताना दिसत आहे. कारणे काहीही असोत विंडीज संघ पुन्हा एकदा जागतिक क्रिकेट मध्ये आपल्या संपूर्ण ताकदीने लवकरात लवकर उतरो, इतकीच परमेश्वराकडे प्रार्थना.

विंडीजच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही खराब अशीच झाली.भारतीय संघाविरुद्ध नेहमीच घोरपडीसारखा खेळपट्टीला चिटकून मोठमोठी खेळी करणाऱ्या शिवनारायन चंद्रपॉलच्या मुलाला म्हणजेच तेजनारायण चंद्रपॉलला दोन्हीही डावात वडिलांच्या आसपास नेणारीही खेळी करता आली नाही, या डावात त्याला जडेजाने बाद केले अन यानंतर सुरू झाले ते रवीचंद्रन अश्विनचे प्रलयकारी अस्त्र.

त्याने कर्णधार ब्रेथवेटला रहाणेच्या हातून झेलबाद करून आपले दुसऱ्या डावातले पहिले यश मिळवले आणि नंतर त्याने आपल्या खतरनाक गोलंदाजीच्या जोरावर विंडीज संघाला पुरते नामोहरम करून संघाला मोठा विजय मिळवून दिला.अश्विनने 60 धावा देत 7 बळी मिळवून विंडीज संघाचे कंबरडेच मोडले.त्याने सामन्यात 12 बळी घेतले.एका डावात 5 वा त्याहून अधिक बळी मिळवण्याची अश्विनची ही 34 वी वेळ तर त्याने आठव्यांदा सामन्यात 10 वा त्याहून अधिक बळी घेण्याची मोठी कामगिरी केली.

जागतिक कसोटी सामन्याच्या अंतीम लढतीत भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याला डावलले होते,त्यावर भाष्य न करणाऱ्या अश्विनने आपल्या भेदक गोलंदाजीने संघाला मोठा विजय मिळवून देत तो निर्णय किती चुकीचा होता हेच सिध्द केले.त्याच्या फिरकीच्या जाळ्यात विंडीज खेळाडू असे अडकले की त्यांना काही उमजलेच नाही.

पहिल्या डावात प्रभावीत करणाऱ्या अथानेजने दुसऱ्या डावातही नेटाने खेळत सर्वाधिक 28 धावा केल्या.जेसन होल्डरनेही थोडीफार लढत देत नाबाद 20 धावा केल्या, पण त्याने काही खास फरक पडला नाहीच.पहिल्या डावात 150 धावा करणाऱ्या विंडीज संघाला दुसऱ्या डावात फक्त 130 धावाच करता आल्या.

ज्यामुळे भारतीय संघाने एक डाव असनी 141 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळाला.अश्विननर 60 धावा करत 7 तर जडेजाने 38 धावा देत 2 बळी मिळवले.

आपल्या पदार्पणाच्या कसोटीत 171 धावांची अविस्मरणीय खेळी करणारा यशस्वी जैस्वाल सामन्याचा मानकरी ठरला. मालिकेतली दुसरी आणि अंतीम कसोटी येत्या 20 तारखेला पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळवण्यात येईल.वेस्ट इंडीज जिद्दीने वापस परत येईल की भारतीय संघ त्यांचा अशाच फरकाने धुव्वा उडवेल हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

PCMC : पालिकेच्या रुग्णालयांत आयुर्वेदिक ओपीडी सुरु करा; आयुक्तांचा वैद्यकीय व्यावसायिकांशी संवाद

संक्षिप्त धावफलक
भारत
पहिला डाव
5 बाद 421 डाव घोषित
जैस्वाल 171,रोहित 103,कोहली 76,जडेजा नाबाद 37
कॉर्नवेल 32/1,रोच 50/1
विजयी विरुद्ध
वेस्ट इंडीज
पहिला डाव सर्वबाद 150
दुसरा डाव सर्वबाद 130
अथानेज 28,रायफर 11,डिसिल्वा 13,जोसेफ 15,होल्डर नाबाद 20
आर अश्विन 60/7,जडेजा 38/2,सिराज 16/1

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.