ICC T20 WC Champions: अखेर ऑस्ट्रेलियाने कोरले टी-ट्वेटी विश्वचषकावरही आपले नाव! आठ गडी राखून न्यूझीलंडवर केली मात

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) – आयसीसीच्या टी-ट्वेंटी वर्ल्डकप 2021 स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील आजपर्यंतचे सर्वात मोठे आव्हान मिळाल्यानंतरही न डगमगता  नियोजनबद्ध आणि आक्रमक खेळ करत ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंड संघावर आठ गडी आणि सात चेंडू बाकी ठेवून मोठ्ठा विजय मिळवला. त्याबरोबरच पहिल्यांदा 20/20 चे विश्वविजेतेपदही मिळवले. किवी संघाची मात्र पुन्हा एकदा निराशाच झाली. केन विल्यम्सनची तुफानी खेळीही दुर्दैवाने वांझोटी ठरली.

एकदिवसीय विश्व कप सर्वात जास्त वेळा (5 वेळा) जिंकलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचे 20/20 मधले मात्र हे पहिलेच अजिंक्यपद आहे. अनेक गोष्टीमुळे लांबत गेलेल्या 20/20 वर्ल्डकपला यावर्षी दुबईत सुरुवात झाली आणि बघता-बघता आज त्याचा अंतिम सामना सुद्धा झाला. अनेक भाकिते, भविष्यवाणी खोट्या ठरवत मोठमोठ्या संघाना धक्के देत केन विलीएम्सनच्या न्यूझीलंड संघाने आणि अरॉन फिंचच्या ऑस्ट्रेलिया संघाने अंतिम फेरीत धडक मारली.

शेजारी राष्ट्र असलेल्या या संघात नेहमीच चुरशीच्या लढती झाल्या होतात खऱ्या, पण 20/20 मधील अंतिम फेरीच्या सामन्यात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच भिडत होते. ऑस्ट्रेलिया याआधी एकदा 2010 मध्ये पोहचले होते, पण त्यांना विजेतेपदाने हुलकावणी दिली होती, ती हुकलेली संधी ते आज भरून काढणार की न्यूझीलंड संघ आपले पहिले विश्वविजेतेपद पटकवणार याकडे समस्त क्रिकेटविश्वाचे लक्ष्य लागून राहिले होते.

या महत्वपूर्ण सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि क्षणात अरॉन फिंचने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय  घेतला. कारण दुबईच्या या मैदानावर आतापर्यंत झालेल्या बारा सामन्यात 11 वेळा दुसऱ्या डावात फलंदाजी करणारा संघ जिंकला होता, तर एकमेव विजय न्यूझीलंडच्या खात्यावर होता, जो त्यांनी नामीबिया संघाविरुद्ध मिळवला होता.

उपांत्यफेरीत झुंजार खेळ करून संघाला विजय मिळवून देणारा कॉन्व्हे आज दुखापतीमुळे संघाबाहेर गेला,त्याच्या जागी टीम सिफर्ट आला तर ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या अखेरच्या विजयी संघात काहीही बदल केला नाही.

किवी संघाच्या डावाची सुरुवात नेहमीप्रमाणे मार्टिन गुप्टील व मिशेल यांनी तर ऑस्ट्रेलियन आक्रमकाची सुरुवात डावखुऱ्या मिशेल स्टार्क ने केली.पहिल्याच षटकात न्यूझीलंड  संघाने नऊ धावा काढत सुरुवात तर चांगली केली.पण किवी संघाच्या 28 धावा झाल्या असताना हेजलवूडने मिचेलला यष्टीमागे वेडच्या हातून वैयक्तिक  11 धावांवर बाद करून ऑस्ट्रेलिया संघाला पहिले यश मिळवून दिले.

त्याच्या जागी कर्णधार केन विल्यम्सन खेळायला आला. मात्र या जोडीला धावा जलदगतीने करता येत नव्हत्या, त्यामुळेच पहिल्या दहा षटकात केवळ 59 धावाच धावफलकावर लागल्या होत्या. अखेर 48 धावांची भागीदारी झाल्यानंतर मार्टिन गुप्टीलला झंपाने बाद करून ही जोडी फोडली. तो 35 चेंडूत 28 धावा काढून बाद झाला.

मात्र दुसऱ्या बाजूने जम बसलेल्या केनने नंतर मात्र आक्रमक अंदाजात खेळत आपली या वर्ल्डकप मधली पहिली अर्धशतकी खेळी केवळ 31 चेंडूत पूर्ण केली.त्याने मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर लागोपाठ दोन षटकार मारत ही ऐतिहासिक कामगिरी केली, ही अंतीम सामन्यातली आजपर्यंतची सर्वात वेगवान अर्धशतकी खेळी ठरली आहे. त्यामुळेच 14 व्या षटकात न्यूझीलंड संघाच्या 100 धावा पूर्ण होऊ शकल्या.

पहिल्या दहा षटकात 57 धावा आल्यानंतर नंतरच्या 5 षटकात 57 धावा आल्या होत्या. आता उरलेल्या पाच षटकात किवी संघ किती धावा जमवून ऑस्ट्रेलिया संघाला कितीचे लक्ष्य देणार याची उत्सुकता सर्वाना होतीच. आणि मिशेल स्टार्क या वेगवान गोलंदाजावर डावाच्या 16 व्या षटकात केनने 22 धावा काढून ऑस्ट्रेलियन संघात एकच खळबळ उडवून दिली.

त्याच्या हल्ल्यात ऑस्ट्रेलिया संघ पुरता लुटला जाईल, असे वाटत असतानाच हेजलवूडने एकाच षटकात केन विल्यम्सन आणि ग्लेन फिलिप्सला बाद करून पुन्हा आपल्या संघाला सामन्यात वापसी करून दिली. हीच 20/20क्रिकेटची गंमत आहे. एक खराब किंवा एक चांगले षटक सामन्याचा निकाल बदलवू शकते.

कर्णधार केनने मात्र 20/20 च्या अंतिम सामन्यातली एक सर्वोत्तम आणि ऐतिहासिक खेळी करताना केवळ 48 चेंडूत 85 धावा ठोकताना दहा चौकार आणि तीन षटकार मारले. मात्र कमिन्सने आणि शेवटच्या षटकात स्टार्कने बऱ्यापैकी चांगली गोलंदाजी करत न्यूझीलंड संघाचा डाव 172 धावांवर रोखण्यात यश मिळवले. कारण एकवेळेस केन मैदानावर असताना किवी संघ 190 ते 200च्या आसपास जाईल असे वाटत असतानाच हेजलवूडने एकाच षटकात दोन महत्वपूर्ण गडी बाद करून सामन्यात पुन्हा रंगत निर्माण केली.

ऑस्ट्रेलिया संघांला विजेतेपद मिळवण्यासाठी चांगली सुरुवात अपेक्षित होती, पण ती करुन देण्यात त्यांचा कर्णधार फिंच मात्र अपयशी ठरला. अर्थात त्याचा अप्रतिम झेल मिचेलने घेतला खरा, पण फिंच केवळ 5 धावा करून बोल्टची शिकार झाला.

त्याच्या जागी आलेल्या मिचेल मार्शने आत्मविश्वासपूर्वक सुरुवात केली, त्याने तीन चेंडूत चौदा धावा ठोकून ऑस्ट्रेलियन मनोवृत्तीची प्रचीती दिली. दुसऱ्या बाजूने डेविड वॉर्नरने पण त्याला चांगली साथ दिल्याने पहिल्या पॉवरप्लेअखेर ऑस्ट्रेलियाच्या सहा षटकात 1 गडी बाद 43 धावा झाल्या होत्या.

हाच धडाका नंतरही चालूच राहिला आणि दहा षटकानंतर ऑस्ट्रेलियाने एक गड्याच्या मोबदल्यात 82 धावा केल्या होत्या.त्यामुळेच ऑस्ट्रेलिया संघाला उरलेल्या 60 चेंडूत 91धावा हव्या होत्या, जम बसलेल्या वॉर्नरने केवळ 34 चेंडूत वेगवान अर्धशतकी खेळी करताना आपले नाणे खणखणीत सिद्ध केले.

हे त्याचे टी-20 मधील 22 वे अर्धशतक ठरले. ज्यामध्ये त्याने चार चौकार आणि तीन षटकार ठोकले. ही जोडी किवी संघाची वाताहत करेल असे वाटत असताना केनने बॉल आपल्या सर्वात विश्वासू गोलंदाजाकडे म्हणजेच बोल्ट कडे दिला आणि त्याने वॉर्नरला 53 धावांवर बोल्ड करून ऑस्ट्रेलियाला चांगलाच झटका दिला.

पण या धक्क्याने जराही विचलित न होता मिशेल मार्शने आपले वैयक्तिक सहावे आणि या स्पर्धेतले दुसरे अर्धशतक पूर्ण करताना आम्ही अजूनही सामन्यात आहोत असाच संदेश दिला. आणि तो नुसता दिलाच नाही तर जबरदस्त फलंदाजी करत संघाला विजयाचा मार्गही अधिक सोपा करून दिला.

मार्शच्या खेळीने प्रेरीत होऊन मॅक्सवेलने सुद्धा चांगला खेळ केला आणि हातातोंडाशी आलेली ट्रॉफी जातेय हे बघून न्यूझीलंड गोलंदाज निराश होत गेले आणि याचाच फायदा घेत या जोडीने ऑस्ट्रेलिया संघाला आठ गडी आणि 7 चेंडू राखून एक मोठा आणि ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

मार्श 77 तर मॅक्सवेल 28 धावा काढून नाबाद राहिले. मर्यादित षटकाच्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघांचा हा लागोपाठ तिसरा पराभव असल्याने न्यूझीलंड संघावर आपल्या चुका शोधण्याची वेळ नक्कीच आली आहे. आज तरी त्यांना हेजलवूडच्या त्या एका षटकातल्या दोन विकेट्सने आणि वॉर्नर, मार्शच्या भागीदारीने पराभूत केले आहे असे म्हटले तर ते अजिबात चुकीचे ठरणार नाही.

भलेही क्रिकेट रसिकांना मनात ऑस्ट्रेलिया संघाला न्यूझीलंड संघाइतकी जागा नसेलही (अर्थात जिंकण्यासाठी काहीही ही जी त्यांची वृत्ती आहे, तीच यामागे कारणीभूत आहे) पण मागील काही वर्षांत मोठमोठ्या खेळाडूंच्या निवृत्तीनंतर आणि स्मिथ वॉर्नरच्या त्या कटू इतिहासानंतर अरॉन फिंचने नव्या जुन्या खेळाडुची योग्य मोट बांधून आज जे दैदिप्यमान यश मिळवून दिले त्याबद्दल तो नक्कीच कौतुकास पात्र आहे, नाही का?

77 धावांची नाबाद आणि घणाघाती खेळी करणारा मिशेल मार्श ऑस्ट्रेलियन विजयाचा आणि सामन्याचा मानकरी तर स्पर्धेचा मानकरी डेविड वॉर्नर ठरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.