Pimpri: पक्षाने जबाबदारी दिल्यास शिरुरमधून लोकसभा लढविणार – महेश लांडगे

संतपीठामध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर तो विषय रद्द करावा

एमपीसी न्यूज – शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केवळ चर्चा झाली. कार्यकर्ते आणि पदाधिका-यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यावेळी उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. परंतु, पक्षाने जबाबदारी दिल्यास आपण लोकसभा लढविणार असल्याचे, भोसरीचे भाजप संलग्न आमदार महेश लांडगे यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच चिखलीतील संतपीठाच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला असेल. तर, तो विषय रद्द करावा. त्यात मी हस्तक्षेप करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चिंचवड अॅटो क्लस्टर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महापौर राहूल जाधव, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती स्वीनल म्हेत्रे, शिक्षण समितीच्या सभापती सोनाली गव्हाणे, उपस्थित होत्या.

यावेळी महेश लांडगे म्हणाले, शिरुर मतदारसंघातून पक्ष ज्या कार्यकर्त्याला उमेदवारी देईल. त्याला पूर्णपणे पाठिंबा देणार आहे. पक्षाने जबाबदारी दिल्यास आपण लोकसभा लढविणार आहे. निवडणूक लढताना मी कोणावरही आरोप करणार नाही. आजवर मी कोणावरही आरोप केले नाहीत आणि यापुढे देखील करणार नाही. निवडणूक लढविताना लोकांसमोर जाताना मी काय काम केल. पुढील काळात मी काय काम करणार आहे. त्याबाबत सांगणार आहे.

जो आरोप करतो त्याला जनता महत्व देत नाही. काम करणा-याला महत्व देते. माझ्यावर आरोप करण्याची अनेकजण संधी साधत आहेत. परंतु, मी कुणावरही आरोप करत नाही. ही माझ्या राजकारणाची ‘टेंडन्सी’ आहे. मी कोणाच्याही कामात डोकावणार नाही. अडथळे आणणार नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी लांडगे म्हणाले, संतपीठामध्ये जर भ्रष्टाचार झाला असेल. तर, तो विषय रद्द करावा. त्यात मी हस्तक्षेप करणार नाही. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जो निर्णय होईल तो योग्यच होईल. संतपीठाला सीबीएसई बोर्डाला जोडायचं आहे. त्यामुळे सीबीएसई बोर्डाचे जाणकार सुद्धा संतपीठासाठी तयार केलेल्या समितीमध्ये असायला पाहिजेत. कीर्तनकार इंग्रजीत बोलतील. इंग्रजीच्या माध्यमातून संत साहित्य आणि परंपरा जगभर पसरेल.

भोसरी येथील रुग्णालय चालू व्हाव, अशी माझी इच्छा आहे. ते महापालिकेने चालवाव अथवा खासगी संस्थेला चालवायला द्यावं हा महापालिकेचा विषय आहे. शास्तीकरावर ठरलेल्या वेळेत तोडगा काढला जाणार आहे. तोडगा काढणार असा काढला जाणार कि त्याबाबत कुणीही न्यायालयात गेला नाही पाहिजे, असेही ते म्हणाले.

  • लांडे-लांडगे या दोन घराण्यांचे चांगले संबंध!
    भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आणि महेश लांडगे यांच्यात दिलजमाई होणार का? याबाबत विचारले असता महेश लांडगे म्हणाले, माझं कुणाशीही व्यक्तिगत वैर नाही. लांडे – लांडगे या दोन घराण्यांचे चांगले संबंध असून आम्ही नातेवाईक आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.