Pune News : 7 जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’, राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

एमपीसी न्यूज : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  यामुळे महाराष्ट्रातील मराठवाडा, कोकण, विदर्भात तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे खबरदारीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यात राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे तर 10 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुलाब चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवेल. यामुळे 28 आणि 29 सप्टेंबरला विदर्भ, मध्य महाराष्ट्र , कोकणात मुसळधार पाऊस पडेल त्यामुळे नागरिकांना खबरदारी घ्यावी असं सांगितले आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2021 दरम्यान कोकण किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कोकण किनारपट्टी भागात 40 ते 50 आणि 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय समुद्र किनारपट्टीच्या भागातील गावांनाही सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

राज्यातील 7 जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

राज्यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव अशा सात जिल्ह्यांमध्ये २८ आणि २९ सप्टेंबरला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार आणि मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

10 जिल्ह्यांना ‘ ऑरेंज अलर्ट’

मुंबई, सिंधुदुर्ग, नंदुरबार, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या 10 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे 28 सप्टेंबरपासून पुढील 1 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळणार आहे. येथील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर बहुतांश ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.