Pune News : ‘मिशन कवच कुंडल’ मोहिम व्यापक स्तरावर राबवा : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

मिशन कवच कुंडल मोहिम यशस्वी करण्यासाठी सप्तपदी निश्चित

एमपीसी न्यूज – शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार 8 ऑक्टोबर 2021 ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रामध्ये लसीकरण न झालेल्या सर्व लाभार्थ्यांना पहिली मात्रा व देय असलेल्या लाभार्थ्यांना दुसरी मात्रा लवकरात लवकर देण्याकरीता ‘मिशन कवच कुंडल’ कोविड लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात करण्यात आले असून ही मोहीम व्यापक स्वरूपात राबवून अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

पुणे जिल्ह्यात ‘मिशन कवच कुंडल’ मोहिम प्रभावीपणे राबविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले, तालुकास्तरावर तालुकास्तरीय टास्क फोर्स यांची बैठक तात्काळ आयोजित करावी. यामध्ये सर्व विभागांचे अधिकारी विशेषतः शिक्षण, महिला व बालकल्याण, ग्रामविकास, महसूल, पोलीस आणि इतर आवश्यक विभागांचा सहभाग घेण्यात यावा. ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र हे नियोजनाचे केंद्र असावे. तालुका आरोग्य अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांनी गावनिहाय शिल्लक लाभार्थीप्रमाणे सुक्ष्म कृती आराखडा तयार करावा. एका गावाचे लसीकरण पुर्ण झाल्यानंतर दुसऱ्या गावाचे लसीकरण सुरु करावे.

मोहिमेचे आयोजन करीत असताना लसीकरण सत्राची व्यापक प्रसिध्दी  करण्यात यावी. आरोग्य विभागाने लसीकरण करण्याची जबाबदारी पार पाडावी आणि इतर विभागांनी शिल्लक लाभार्थ्यांना लसीकरण केंद्रांवर घेवून येण्याची आणि सत्र व्यवस्थापनाची जबाबदारी घ्यावी.

कोणत्याही परिस्थितीमध्ये या विशेष मोहिमेमध्ये मनुष्यबळाअभावी लसीकरण मोहिम पार पाडण्यास अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. मिशन कवच कुंडल मोहिम यशस्वी करण्यासाठी सप्तपदी निश्चित करण्यात आली असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.