Talegaon News : तळेगाव, चाकण मध्ये दोन अपघात दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – तळेगाव एमआयडीसी आणि चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी अपघात झाले. या दोन्ही अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शनिवारी (दि. 9) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

संभाजी गंगाराम गाडे (वय 38, रा. सुदुंबरे, ता. मावळ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी किशोर गंगाराम गाडे (वय 31, रा. सुदुंबरे, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे पावणे दोन वाजताच्या सुमारास मयत संभाजी गाडे हे तळेगाव चाकण रोड वरून  पायी चालत जात होते. ते इंदोरी टोलनाका येथे आले असता अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. यामध्ये संभाजी यांच्या डोक्याला, छातीला, पाठीला, हातापायाला व शरीरावर ठिकठिकाणी गंभीर जखमा झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

चाकण येथे मृत्यू झालेल्या पादचारी व्यक्तीची ओळख पटली नाही. वय अंदाजे 55 वर्ष आहे. प्रतिक शहाजी जाधव (वय 20, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास सुमारे 55 वर्षे वयाचा व्यक्ती इंडिया सुपर मार्केट, मेदनकरवाडी येथुन रस्त्याने पायी जात होता. त्या वेळी अज्ञात वाहनाने पादचारी व्यक्तीला वाहनाची जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.