PCMC: नवीन जिजामाता, थेरगाव, भोसरी, आकुर्डी रुग्णालयातील ‘ओपीडी’त वाढ; YCMH वरील ताण हलका

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोना काळात नव्याने सुरू केलेल्या चार रूग्णालयांमुळे संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयावरील ताण कमी झाला आहे. नवीन जिजामाता, थेरगाव, भोसरी आणि आकुर्डी या चारही रूग्णालयात दर महिन्याला उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

महापालिकेच्या वतीने शहरात 8 मोठी रूग्णालये तर 29 दवाखाने सुरू करण्यात आली आहेत. महापालिकेचे संत तुकारामनगर येथे महापालिकेचे वायसीएम हे सर्वात मोठे आणि विविध सुविधांनी सज्ज असे रूग्णालय आहे. त्यामुळे शहर, जिल्हा आणि महाराष्ट्रातील विविध भागातील रूग्ण याठिकाणी उपचार घेण्यासाठी येत आहेत. वायसीएम 760 बेड आहेत. मात्र, शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता वायसीएम रूग्णालयांवर दिवसेंदिवस ताण येत होता. वायसीएमवर येणारा ताण आणि रूग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने थेरगावात 200, आकुर्डीत ह. भ. प. कै. प्रभाकर मल्हारराव कुटे 130, पिंपरीत नवीन जिजामाता 120, भोसरीत नवीन भोसरी 100 बेड असे 550 बेडचे रूग्णालय उभारली. ही चारही रूग्णालये जून 2021 पासून सुरू करण्यात आली. या चारही रूग्णालयाचा कोरोकाळात शहरातील रूग्णांना चांगला फायदा झाला. या रूग्णालयात महापालिकेने विविध चांगल्या सुविधा उपलब्ध दिल्या आहेत.

Citizen perception survey : नागरिकांनी सिटीझन परसेप्शन सर्वेक्षणात सहभागी व्हावे; महापालिकेचे आवाहन

चारही रूग्णालय सुरू होण्यापूर्वी वायसीएम रूग्णालयात महिन्याता 40 हजार रूग्ण बाह्यरूग्ण विभागात तपासणीसाठी येत होते. ते आता 30 ते 32 हजारांवर आले आहे. त्या तुलनेत चारही रूग्णालये जून 2021 मध्ये सुरू केल्यानंतर 22 हजार बाह्यरूग्ण विभागात उपचारासाठी येत होते. ते आता सप्टेंबरअखेर तब्बल 59 हजार 773 एवढे रूग्ण उपचारासाठी येत आहेत. चारही रूग्णालयात बाह्यरूग्ण विभाग, अंतर रूग्ण विभाग, अति दक्षता विभाग, प्रसुती कक्ष, रक्त तपासणी, एक्‍स रे, सोनोग्राफी, किरकोळ व मोठ्या शस्त्रक्रिया अशा विविध सेवा आणि सुविधा दिल्या जात आहेत. नवीन जिजामाता, थेरगाव, भोसरी आणि आकुर्डी या चार रुग्णालयात मे महिन्यात 45 हजार 262, जून 50 हजार 754, जुलै 52 हजार 848, ऑगस्ट 56 हजार 213 आणि सप्टेंबर महिन्यात 59 हजार 773 रुग्ण दाखल झाले होते.

“नवीन थेरगाव रुग्णालयात सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातील या रुग्णालयात दररोज रुग्णांची मोठी संख्या असते. रुग्णालयात अत्यंत दर्जेदार उपचार केले जात आहेत. त्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे” असे थेरगाव रुग्णालयाचे प्रमुख डॉ.अभयचंद्र दादेवार यांनी सांगितले.

याबाबत बोलताना वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, “राज्यातील इतर महापालिकांपेक्षा पिंपरी-चिंचवड महापालिकेची रूग्ण सेवा उत्तम आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पालिकेच्या रूग्णालयात रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. लोकांना चांगली, दर्जेदार वैद्यकीय सेवा दिली जात आहे. थेरगाव, आकुर्डीतील ह. भ. प. कै. प्रभाकर मल्हारराव कुटे, पिंपरीतील नवीन जिजामाता, नवीन भोसरी रूग्णालयामुळे वायसीएम रूग्णालयावरच रूग्णांचा मोठा ताण कमी झाला आहे. या चारही रूग्णालयात उच्च दर्जाच्या सेवा-सुविधा देण्यात येत आहेत. त्यामुळेच या चार रूग्णालय परिसरातील रूग्ण स्थानिक रूग्णालयांना प्राधान्य देत असून दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.