India Corona Update : 24 तासांत 70,589 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 61 लाखांच्या पुढे

एमपीसी न्यूज – मागील 24 तासांत देशभरात 70 हजार 589 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून देशातील कोरोना बाधितांची संख्या 61 लाखांच्या पुढे गेली आहे. मागील 24 तासांत देशभरात 776 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 61 लाख 45 हजार 292 एवढी झाली आहे. त्यापैकी 9 लाख 47 हजार 576 एवढ्या सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आजवर 51 लाख 01 हजार 398 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात आजवर 96 हजार 318 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.

देशात मागील 24 तासांत ‌84 हजार 877 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 83.01 टक्के एवढा आहे तर, 1.56 एवढा मृत्यूदर आहे.

आयसीएमआरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 7 कोटी 31 लाख 10 हजार 041 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 11 लाख 42 हजार 811 नमूने सोमवारी (दि.28) तपासण्यात आले आहेत.

महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांत मागील 24 तासांत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. देशात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी 49 टक्के रुग्ण या पाच राज्यांतील आहेत. देशात सुरू असलेल्या अनलाॅक चारचा कालावधी येत्या 30 सप्टेंबरला पूर्ण होत आहे. 1 ऑक्टोंबर पासून सुरु होणाऱ्या अनलॉक पाचची नियमावली येत्या दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.